सावकारांकडून १०६ दस्त जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2020 12:23 AM2020-03-07T00:23:27+5:302020-03-07T00:23:40+5:30

अवैध सावकारी प्रकरणात दाखल तक्रारींनुसर जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत तीन पथकांनी शुक्रवारी सकाळीच धाडसत्र राबविले.

4 documents seized by lenders | सावकारांकडून १०६ दस्त जप्त

सावकारांकडून १०६ दस्त जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/केदारखेडा : अवैध सावकारी प्रकरणात दाखल तक्रारींनुसर जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत तीन पथकांनी शुक्रवारी सकाळीच धाडसत्र राबविले. भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, लोणगाव व परतूर शहरात ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत तिन्ही सावकारांकडून सावकारीतील विविध प्रकारचे १०६ दस्त ताब्यात घेण्यात आले आहेत.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथील राजू सांडू जाधव यांनी बी-बियाणे खरेदी करण्यासाठी विलास दामोदर जाधव (रा. केदारखेडा) यांच्याकडून १० हजार रूपये ३ टक्के दराने घेतले होते. त्याबदल्यात कोरा चेक दिला होता. मदन सांडू ठोंबरे (रा.जवखेडा ठोंबरी) यांनी विलास जाधव यांच्याकडून घराच्या बांधकामासाठी ५० हजार घेतले होते. त्याबदल्यात कोरे चेक दिले होते. मात्र, पैसे देऊनही चेक परत दिले नसल्याची तक्रार जालना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे वरील दोघांनी केली होती.
भोकरदन तालुक्यातील उमरखेडा येथील लक्ष्मण भगवान साळुक यांनी ३ टक्के दराने ५० हजार रूपये घेऊन एक एकरचे खरेदीखत करून दिले होते. सुखदेव तुकाराम गवई यांनी ३ टक्के दराने ५० हजार रूपये घेऊन १.२९ आर जमीन खरेदीखत करून दिली होती. तर अंकुशराव भुजंगराव फुके यांनी ३ टक्के दराने ५० हजार रूपये घेऊन दोन एकर जमिनीचे खरेदीखत करून दिले होते. या तिघांनी पैसे परत देऊनही उषाबाई समाधान मगरे, वसंता भिकाजी मगरे, विकास वसंता मगरे, प्रकाश मधुकर मगरे (सर्व रा.लोणगाव ता.भोकरदन) यांनी जमीन परत दिली नसल्याची तक्रार दिली होती.
घनसावंगी तालुक्यातील येवला येथील सोपानराव गणपतराव तांगडे यांनी नायाबराव तात्याराव वरकड, महादेव नायाबराव वरकड (दोघे रा. पोलीस चौकीजवळ, स्टेशनरोड, परतूर) यांच्याकडून ९५ हजार रूपये व्याजाने घेतले होते. या बदल्यात एक हेक्टर जमीन खरेदीखत करून दिली होती. पैसे परत देऊनही जमीन परत मिळत नसल्याची तक्रार तांगडे यांनी दिली होती.
वरील तक्रारदारांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथकांनी शुक्रवारी सावकारांच्या घरी धाडी मारल्या. कारवाईनंतर १०६ दस्त जप्त करण्यात आले असून, पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून सांगण्यात आले. दरम्यान, या कार्यालयाच्या पुढील कारवाईकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
५० कोरे चेक, ११ खरेदीखतासह इतर दस्त
तीन पथकाने केलेल्या कारवाईत ३ नोंदवह्या, ५० कोरे चेक, ७ सातबारे, ११ खरेदीखत, ३ कोरे बॉण्ड, फेरबाबत २ बॉण्ड, एक रजिस्टर, ९ नोंदवही, एक पॉकेट डायरी, एक पान, दोन अपील, ६ खरेदी करारनामा, २ शपथपत्र, दिवाणी न्यायालयातील दावे-२, सहा लेजर असे एकूण १०६ दस्त जप्त करण्यात आले आहेत. जप्त केलेल्या दस्तांची तपासणी सुरू असल्याचे सांगण्यात आले.
पथकात २८ अधिकाऱ्यांसह कर्मचा-यांचा समावेश
जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकप्रमुख तथा जालना येथील सहायक निबंधक पी. बी. वरखडे, अंबड येथील सहायक निबंधक पी. एच. बोरा, भोकरदन येथील सहायक निबंधक श्रीराम सोन्ने, परतूर येथील सहायक निबधंक पी. पी. वाघमारे यांच्यासह २८ अधिकारी, इतर कर्मचारी, पोलीस, महसूल, सहकार विभागाच्या कर्मचा-यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Web Title: 4 documents seized by lenders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.