ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून तंत्रज्ञानात नवनवे प्रयोग केले जात आहेत. माणसाच्या आयुष्यासारखेच तंत्रज्ञानातही दिवसेंदिवस बदल होतायत. गिरक्या घालणा-या पक्ष्यांप्रमाणे तुम्हाला घरेही गिरक्या घेताना दिसणार आहेत. दुबईमध्ये गिरक्या घालणारी एक इमारत बनवण्यात येणार असून, स्थापत्य कलेचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळणार आहे. या इमारतीमध्ये राहणा-या माणसांनाही झोपाळ्यावर बसण्याचा आनंद मिळणार आहे. 80 मजल्यांची ही इमारती 90 मिनिटांमध्ये 360 अंशांच्या कोनामध्ये फिरणार आहे. या इमारतीचा मजला एका मिनिटात जास्तीत जास्त 6 मीटर फिरणार आहे. अमेरिकेतल्या वर्ल्ड ट्रेड टॉवरच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या अनोख्या इमारतीत सुरक्षेबाबतही काळजी घेण्यात आली आहे.

इमारतीचा प्रत्येक मजला रिव्हॉल्व्हिंग ठेवण्यात येणार असून, खिडक्यांमधून तुम्हाला फिरत्या जगाचा आविष्कार पाहायला मिळणार आहे. जगातली ही पहिली फिरती इमारत दुबईमध्ये बनवली जाणार आहे. इमारतीची रचना वास्तूकार डेव्हिड फिशर यांनी तयार केली आहे. फिशर यांनी इमारतीचं मॉडेल न्यू यॉर्कमध्ये दाखवलं आहे. इमारतीच्या पहिल्या टप्प्यातील काम 6 महिन्यांमध्ये पूर्ण होणार असून, 2020पर्यंत तयार होणार आहे.

या इमारतीचा प्रत्येक मजला मजबूत सिमेंट बेसच्या माध्यमातून गिरक्या घेणार आहे. इमारतीतील लोकांना पर्सियन गल्फ आणि दुबईतल्या चहूबाजूंकडील सुंदर नजारे पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे ही इमारत विजेचीही निर्मिती करणार असून, ती वीज इमारतीतील लोकांना वापरता येणार आहे. रचनेनुसार प्रत्येक मजल्याच्या मधोमध पवनचक्की बसवण्यात येणार आहे. या इमारतीत जवळपास 58 पवनचक्क्या असणार आहेत. प्रत्येक पवनचक्की 3 मेगावॉट एवढी वीजनिर्मिती करणार आहे. या पवनचक्क्यामधून निर्माण होणारी वीज जवळपास 50 कुटुंबे वापरू शकणार आहेत. तसेच इमारतीला वादळी वा-यांपासून कोणतेच नुकसान होणार नाही.

कोण आहेत डेव्हिड फिशर ?

डेव्हिड फिशर हे इस्रायली-इटालियन वास्तुकार आहेत. त्यांनी या इमारतीची संकल्पना मांडली असून, रचना केली आहे. 2020पर्यंत ही इमारत पूर्ण करण्याचा त्यांचा मानस आहे.
(सौ. यू ट्युब)