भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये तीन रोहिंग्या मृत्युमुखी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 12:14 IST2017-09-11T12:12:36+5:302017-09-11T12:14:59+5:30
म्यानमारमधून वांशिक दंगलींना घाबरुन पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. पळून गेलेले रोहिंग्या पुन्हा म्यानमारमध्ये येऊ नयेत यासाठी म्यानमारच्या लष्कराने बांगलादेशाच्या सीमेवर भूसुरुंग पेरले आहेत.

भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये तीन रोहिंग्या मृत्युमुखी
ढाका, दि.11- म्यानमारमधून वांशिक दंगलींना घाबरुन पळून जाणाऱ्या रोहिंग्यांची स्थिती दिवसेंदिवस अधिकाधिक बिकट होत चालली आहे. पळून गेलेले रोहिंग्या पुन्हा म्यानमारमध्ये येऊ नयेत यासाठी म्यानमारच्या लष्कराने बांगलादेशाच्या सीमेवर भूसुरुंग पेरले आहेत. याच भूसुरुंगाच्या स्फोटामध्ये तीन रोहिंग्याचे प्राण गेल्याचे वृत्त ढाका ट्रिब्युन वर्तमानपत्राने प्रसिद्ध केले आहे. स्फोटाची ही घटना नायखोमगचारी य़ेथे झाली आहे.
हिंदुस्थानी रोहिंग्यांची ब्याद आताच संपवा! नगरमधील मुस्लिमांनी निषेध करावा हे भयंकरच - उद्धव ठाकरे
अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीने या घटनेचा तीव्र निषेध केला असून म्यानमारमधील रोहिंग्यांची स्थितीबद्दल तेथिल सरकारवर निशाणा साधला आहे. अराकान रोहिंग्या साल्वेशन आर्मीविरोधात आमची लढाई सुरु आहे अशी माहिती म्यानमार सरकारने दिली आहे. म्यानमार सरकारने अराकान आर्मीला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे.
1000s of #Rohingya from #Buthidaung on their hardest journey of exodus, need your help. #RohingyaMuslimspic.twitter.com/ZOkXc4aY14
— Aung Aung (@Aungaungsittwe) September 10, 2017
यूएनएचसीआरच्या माहितीनुसार म्यानमारमधील राखिन प्रांतातील तणावामुळे आता पर्यंत 2 लाख साठ हजार रोहिंग्यांनी बांगलादेशकडे पलायन केले आहे. यामुळे बांगलादेशातील सीमाप्रदेशातील व्यवस्था कोलमडली आहे. बांगलादेशाने रोहिंग्यांना सीमा खुल्या केल्या नसल्यामुळे आडवाटेने, जलमार्गाने लोक बांगलादेशात घुसत आहेत. बांगलादेश आणि म्यानमारमध्ये असणारी नैसर्गिक सीमा म्हणजे नेप नदीला ओलांडूनही रोहिंग्या बांगलादेशात जात आहेत. रात्रीच्या वेळेस धोका पत्करुन जाणाऱ्या या रोहिंग्यांच्या बोटी उलटण्याच्याही घटना घडल्या आहेत. त्यामुळेच गेल्या काही दिवसांपासून म्यानमारच्या लोकशाहीवादी नेत्या आंग सान सू ची यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यासाठी दबाव येत आहेत. म्यानमार लष्कराने रोहिंग्या राखिन प्रांतामध्ये तणाव निर्माण करत आहेत असे सांगून रोहिंग्या स्वतःच स्वतःची घरे पेटवून देत आहेत असेही म्हटले आहे.
रोहिंग्यांच्या प्रश्नाची तुलना आता रवांडा किंवा सेब्रेंनिका येथील वंशच्छेदाशी केली जात आहे. जगभरातील मानवाधिकार कार्यकर्ते या वांशिक दंगलींचा निषेध करत आहेत. भारतात घुसलेल्या 40 हजार रोहिंग्यांना पुन्हा म्यानमारमध्ये पाठवण्यात येऊ नये अशी याचिका ज्येष्ठ विधिज्ञ प्रशांत भूषण यांनी सर्वोच्च न्यायालयात केली आहे.