मलेशियाच्या राजाकडे विमानं, गाड्या.. किती?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 08:57 AM2024-02-05T08:57:08+5:302024-02-05T08:58:20+5:30

या राज्याभिषेकाच्या निमित्तानं इब्राहिम इस्कंदर आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा जगभर झडते आहे

The king of Malaysia has planes, cars.. how much? | मलेशियाच्या राजाकडे विमानं, गाड्या.. किती?

मलेशियाच्या राजाकडे विमानं, गाड्या.. किती?

पूर्वीच्या काळी जगात अनेक ठिकाणी राजे आणि राजघराणं यांचीच सत्ता होती. काळाच्या ओघात त्यांची ‘सत्ता’ गेली; पण त्यांचं रोजशाहीपण तसंच राहिलं. ब्रिटनसारख्या देशांतूनही राजेशाही गेली; पण त्यांचा मान मात्र तसाच राहिला. आपल्याकडेही अनेक संस्थानिक आणि राजघराण्यांना आजही राजासारखाच मान दिला जातो. जगात अनेक ठिकाणी आज लोकशाही प्रस्थापित झाली असली तरी काही ठिकाणी राजेशाही अजूनही टिकून आहे. 
मलेशियाचं नाव यासंदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात घेतलं जातंय. मलेशियाच्या जोहोर राज्याचे सुलतान इब्राहिम इस्कंदर नुकतेच मलेशियाचे नवे राजे बनले आहेत. देशाची राजधानी कौलालंपूर येथे बुधवारी शाही थाटात त्यांचा राज्याभिषेक समारंभ झाला. पुढच्या पाच वर्षांसाठी ते आता इथले राजे असतील. राजगादी परंपरेनं पुढे सरकणं, एकाकडून दुसऱ्याकडे जाणं, असे प्रसंग तिथे नवे नाहीत. परंपरेनं हा वारसा तिथं चालवलं जातो. मलेशियात राजेशाहीची एक अनोखी व्यवस्था आहे. मलेशियात १३ राज्यं आणि नऊ शाही राजघराणी आहेत. या राजघराण्यांचे प्रमुख दर पाच वर्षांनी आलटून- पालटून राजा बनतात. इब्राहिम इस्कंदर हे सुलतान अब्दुल्ला सुलतान अहमद शाह यांचे उत्तराधिकारी बनले आहेत. राजा म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करून पहांग या आपल्या गृहराज्याचं नेतृत्व करण्यासाठी ते आता पुन्हा आपल्या मूळ ठिकाणी परतले आहेत. 

या राज्याभिषेकाच्या निमित्तानं इब्राहिम इस्कंदर आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा जगभर झडते आहे. ६५ वर्षांचे इब्राहिम इस्कंदर शाही परिवारातले आहेत. ब्लुमबर्गच्या अहवालानुसार त्यांच्याकडे ५.७ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच सुमारे ४७४ अब्ज रुपयांची संपत्ती आहे. एवढंच नाही, याशिवाय त्यांच्याकडे किमान तीनशे लक्झरी कार आहेत. त्यातली एक कार तर त्यांना हिटलरनं भेट म्हणून दिली आहे. इब्राहिम इस्कंदर यांच्याकडे त्यांच्या स्वत:च्या मालकीच्या बोइंग ७३७सह अनेक खासगी जेट विमानं आहेत. त्यांची स्वत:ची प्रायव्हेट आर्मी आहे. मलेशियासह इतरही काही देशांत त्यांची मालमत्ता आहे. सिंगापूरमधील मोक्याच्या जागी किमान चार अब्ज रुपये किमतीची जमीन त्यांच्या नावे आहे. तिथल्या बोटॅनिकल गार्डनजवळही त्यांची मोठी जमीन आहे. मलेशियातील अनेक मोठमोठे उद्योग त्यांच्या मालकीचे आहेत. रिअल इस्टेटपासून ते खाणी, टेलिकम्युनिकेशन, पाम तेल अशा अनेक उद्योगांत त्यांची मक्तेदारी आणि भागेदारी आहे. त्यांचं अधिकृत निवासस्थान ‘इस्ताना बुकिट सिरीन’ हे तर त्यांच्याकडे असलेल्या बेसुमार संपत्तीचं प्रतीक मानलं जातं. त्यांच्या या राजवाड्यात तर प्रवेश करण्याचीही गरज नाही. नुसतं बाहेरून पाहूनच तिथल्या ऐश्वर्यानं सर्वसामान्यांचे डोळे दीपतात. आलिशान विमानं, लक्झरी कार्सचे तर ते शौकिन आहेतच; पण बाइक्सचेही ते दिवाने आहेत. अनेक अफलातून बाइक्स त्यांच्या संग्रही आहेत. त्यांच्या कार आणि बाइकचं नुसतं दर्शन व्हावं म्हणूनही मलेशियातली तरुणाई त्यांच्या राजवाड्याच्या इर्दगिर्द फिरत असताना दिसते!

मलेशियात राजाची निवड कशी केली जाते याची परंपरागत पद्धत आहे. तरीही याशिवाय गुप्त मतदान पद्धतीनं एक सोपस्कारही पार पाडला जातो. त्यात मतदान पत्रिकांचा वापर केला जातो. मतदान पत्रिकांवर त्या सुलतानाचं नाव लिहिलेलं असतं, ज्याची यावेळी राजा बनण्याची वेळ असते. प्रत्येक सुलतानाला सांगावं लागतं की, त्याच्या दृष्टीनं खरंच ही व्यक्ती राजा बनण्यासाठी लायक आहे की नाही? राजा म्हणून ज्याची निवड केली जाते, त्याला ‘बहुमत’ मिळणं गरजेचं असतं. निकाल घोषित झाल्यानंतर या मतपत्रिका नष्ट केल्या जातात. राजा बनल्यानंतर इब्राहिम इस्कंदर म्हणाले, केवळ नामधारी राजा बनण्यात मला कोणताही रस नाही. संसदेत केवळ २२२ खासदार आहेत; पण या संसदेच्या बाहेर देशात तीन कोटी जनता आहे. खासदारांसोबत नाही, तर मी जनतेच्या सोबत आहे. सरकारचं मी कायम समर्थन करीन; पण तोपर्यंतच, जोपर्यंत ते चांगलं काम करीत आहेत. थोडीशी जरी गोष्ट कुठे चुकीची होत असेल तरी मी त्याविरुद्ध उभा राहीन!..

राजपुत्र भारतीय लष्कराचा माजी कॅप्टन! 
राजे इब्राहिम इस्कंदर यांच्या पत्नीचं नाव जरीथ सोफिया आहे आणि त्याही शाही परिवारातील आहेत. ऑक्सफर्डमध्ये त्यांचं शिक्षण झालं असून, त्या लेखिका आहेत. लहान मुलांसाठी त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली आहेत. त्यांना पाच मुलं आणि एक मुलगी आहे. त्यांचा सर्वात मोठा मुलगा क्राऊन प्रिन्स टुकू इस्माइलचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय लष्करात त्यानं कॅप्टनपदही भूषवलेलं आहे. भारतीय लष्कराच्या एखाद्या युनिटचं प्रतिनिधित्व करणारा तो पहिला परदेशी नागरिक आहे.

Web Title: The king of Malaysia has planes, cars.. how much?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.