Sri Lanka declares state of emergency | श्रीलंकेत दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर, बौद्ध-मुस्लिमांमध्ये जातीय दंगल

ठळक मुद्देमागच्या वर्षभरापासून श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये वाढणाऱ्या तणावाने आता दंगलीचे स्वरुप घेतले आहे.म्यानमारमधून श्रीलंकेत आश्रयाला आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांविरोधातही श्रीलंकेत बौद्ध संघटनांनी विरोध प्रदर्शन केले होते. 

कोलंबो - जातीय हिंसाचाराचा वणवा पेटल्याने मालदीवपाठोपाठ श्रीलंकेमध्ये दहा दिवसांसाठी आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. श्रीलंकेच्या कँडी शहरात बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये जातीय दंगली सुरु असल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तातडीने आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारी सरकारच्या प्रवक्त्याने ही माहिती दिली.  

मागच्या वर्षभरापासून श्रीलंकेत बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये वाढणाऱ्या तणावाने आता दंगलीचे स्वरुप घेतले आहे. श्रीलंकेत जबरदस्तीने इस्लाममध्ये धर्मांतर सुरु असल्याचा आरोप काही बौद्ध संघटना करत होत्या तसेच प्राचीन बौद्ध स्थळांची नासधूसही करण्यात आली होती. त्याच खदखदणाऱ्या असंतोषातून संघर्षाची ही ठिणगी पडली. 

म्यानमारमधून श्रीलंकेत आश्रयाला आलेल्या रोहिंग्या मुस्लिमांविरोधातही श्रीलंकेत बौद्ध संघटनांनी विरोध प्रदर्शन केले होते. 
देशाच्या अन्य भागात हा हिंसाचार पसरु नये यासाठी आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीत दहा दिवसांसाठी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती सरकारचे प्रवक्ते दयासिरी जयासेकरा यांनी दिली. सोशल मीडिया फेसबुकच्या माध्यमातून या हिंसाचाराला चिथावणी देणाऱ्यांविरोधातही कठोर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.   

कँडीमध्ये जमावाने मुस्लिमांच्या दुकानांना आगी लावल्यानंतर सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी तिथे विशेष तुकडया पाठवल्या आहेत. सिंहली बौद्ध आणि अल्पसंख्यांक मुस्लिमांमध्ये संघर्ष टाळण्यासाठी तिथे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
 


Web Title: Sri Lanka declares state of emergency
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.