The side of the third American Donald Trump | दर तिसरा अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाजूचा

न्यूयॉर्क : मुस्लिमांना अमेरिकेत प्रवेशबंदी करावी या डोनाल्ड ट्रम्प यांच्या मताशी देशातील दर तिसरी व्यक्ती सहमती व्यक्त करीत असून ट्रम्प यांच्या लोकप्रियतेत गेल्या काही दिवसांत लक्षणीय वाढ झालेली दिसत आहे. दूरचित्रवाणी नेटवर्क ‘सीबीएस’ने याबाबत केलेल्या पाहणीत ही बाब समोर आली. शिवाय देशातील मुस्लिम नागरिकांची माहिती संकलित करून ठेवावी असे मत निम्मे अमेरिकन व्यक्त करीत आहेत.
कॅलिफोर्नियातील सन बेर्नाडिनो येथे दोन दहशतवाद्यांनी हल्ला केल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी वरील वादग्रस्त विधान केले होते, त्याला माध्यमांमधून जगभर प्रसिद्धी मिळाली व ते चर्चेच्या केंद्रस्थानी आले.
सीबीएस वाहिनीने रिपब्लिकन, डेमोक्रॅट व इतर नागरिक अशा सुमारे हजारभर लोकांची मते जाणून घेतली. यात बहुतेक जणांनी प्रवेशबंदीच्या विरोधात मत व्यक्त केले. ७३ टक्के डेमोक्रॅट अशाच मताचे आहेत, तर ३८ टक्के रिपब्लिकनांना बंदी घालू नये असे वाटते. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देतील, असे काही रिपब्लिकनांना वाटते. यापैकी ५४ टक्के बंदीच्या बाजूचे आहेत, तर ५१ टक्के जणांना अमेरिका ज्या तत्त्वांवर स्थापन झाली त्याचा भंग वाटतो.
आगामी अध्यक्षीय निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारीचे ट्रम्प कट्टर दावेदार मानले जातात. (वृत्तसंस्था)

लज्जास्पद, धोकादायक विधान
ट्रम्प यांनी वादगस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर बरीच टीका होत आहे. अध्यक्षीय निवडणुकीतील डेमोक्रॅ टिक पक्षाच्या दावेदार हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्प यांच्या विधानावर हसून प्रतिक्रिया दिली. ‘हे लज्जास्पद जसे आहे, तसेच धोकादायक आहे’ असे त्यांनी एबीसी वाहिनीवर सांगितले.

मुस्लिमांच्या बचावार्थ पिचाई सरसावले
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही ट्रम्प यांच्या विधानावर टीका केली. त्यांनी खुले पत्र लिहून मुस्लिामांच्या बाजूने प्रतिक्रिया दिली आहे. ‘आपल्या भीतीवर मूल्यांनी मात करायला नको’ असे मत व्यक्त करीत, खुले विचार, सहनशीलता व नव्या अमेरिकनांना स्वीकारणे ही अमेरिकेची सर्वात मोठी ताकत व गुण आहे, असे त्यांनी म्हटले आहे.