अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 19:55 IST2017-12-06T19:51:06+5:302017-12-06T19:55:48+5:30
अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथून सकाळीच आइस्क्रीम आणि पिझ्झाचं साहित्य इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचलं होतं.

अंतराळात झाली अशी पिझ्झा पार्टी, तुम्हीही व्हिडिओ नक्की पहा
व्हर्जिनिया : अंतराळात अंतराळवीराचं एक वेगळंच जग असतं. शुन्य गुरुत्वाकर्षणात राहणं म्हणजे काही सोपं काम नाही. तिकडे वस्तूच नव्हे तर अख्खा माणूस हवेत उडत असतो. त्यामुळे आपण ज्याप्रमाणे इथं पृथ्वीतलावर राहतो तसं त्यांना तिथं राहता येत नाही. आपण ज्याप्रमाणे आपल्याला हवं ते खातो, तसं त्यांना खाता येत नाही. परिणामी ते केवळ आपल्या आवडत्या पदार्थांची आठवण काढूनच आपलं पोट भरत असतात. मात्र सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. त्या व्हिडिओमध्ये अंतराळवीर पिझ्झा फस्त करताना दिसताएत. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे कसं शक्य आहे? पण अंतराळात सारं काही शक्य आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, इंटरनॅशनल स्पेस स्टेशनच्या अंतराळवीरांना आईस्क्रीम आणि पिझ्झा खाण्याची फार इच्छा झाली होती. पण तिथं पिझ्झा बनवणार कसा आणि साहित्य कसं पोहोचणार हा प्रश्न होता. मात्र अमेरिकेतल्या व्हर्जिनिया येथून रविवारी सकाळीच आइस्क्रीम आणि पिझ्झाचं साहित्य इंटरनॅशनल स्पेस स्टेशनपर्यंत पोहोचलं होतं. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये असलेले इटलीचे अंतराळवीर पाओलो नेस्पोली यांनी सांगितल्याप्रमाणे, एका लाईव्ह कार्यक्रमात त्यांच्या वरिष्ठांच्या हातात पिझ्झा टॉपिंग्स पाठवण्यात आली. त्यानंतर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे व्यवस्थापक किर्क शायरमैन यांनी पिझ्झासाठी लागणारे बाकीची साहित्य दाखवून सगळ्यांनाच आश्चर्यचकित केलं. आता शुन्य गुरुत्वाकर्षणात जिथं माणूसही धड उभा राहू शकत नाही, तिथं पिझ्झा कसा बनवायचा हा प्रश्न होताच. मात्र तरीही खव्वयांनी शून्य गुरुत्वाकर्षणात हा पिझ्झा बनवला. हा पिझ्झा बनवण्याचा व्हिडिओ नासाच्या जॉन्सन स्पेस सेंटरने अपलोड केला आहे. ज्या व्हिडिओमध्ये हवेत उडणारा पिझ्झा, तो पिझ्झा व्यवस्थित होण्यासाठी अंतराळवीरांचे परिश्रम दिसतात. पिझ्झा बनवून झाल्यावर सगळ्याच अंतराळवीरांनी दणक्यात पिझ्झा पार्टी साजरी केली. बऱ्याच दिवसांनी पिझ्झावर ताव मारायला मिळाल्याने सगळेच अंतराळवीर आनंदात होते.
आता प्रश्न उरतो तो म्हणजे शून्य गुरुत्वाकर्षणात बनवलेला पिझ्झा नक्की कसा झाला असेल? पण नेस्पोली यांनी सांगितलं की हा पिझ्झा अपेक्षेपेक्षाही चविष्ट होता, तर दुसरे अंतराळवीर रैंडी ब्रेन्सिक यांनीही या पिझ्झाच्या स्वादिष्टेचं कौतुक केलं आहे.
आणखी वाचा - बाहुबली सॅण्डविच जे पाहूनच पोट भरतं !