Like Pakistan, stop financial aid from Palestine - Warning of Trump | पाकिस्तानप्रमाणेच पॅलेस्टाइनचीही आर्थिक मदत बंद करू - ट्रम्प यांचा इशारा
पाकिस्तानप्रमाणेच पॅलेस्टाइनचीही आर्थिक मदत बंद करू - ट्रम्प यांचा इशारा

वॉशिंग्टन - शांतता प्रस्थापित करण्यासाठी पावले उचलण्याची इच्छा नसलेल्या पॅलेस्टाइनला अमेरिकेकडून मिळणारी मदत बंद करण्याचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे.
ट्रम्प यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, अमेरिका पॅलेस्टाइनला दरवर्षी ३०० दशलक्ष डॉलर्सहून अधिक रकमेची मदत करते. मात्र त्याबद्दल पॅलेस्टाइनच्या मनात अमेरिकेविषयी कृतज्ञता वा आदराची भावना असल्याचे दिसत नाही. इस्राएलशी शांतता करार करण्याच्या दृष्टीने चर्चा करावी, अशी पॅलेस्टाइनची इच्छाच नसावी. प्रदीर्घ काळ अशी चर्चा करण्याची मागणी होऊनही पॅलेस्टाइन दुर्लक्ष करीत आहे.
जेरुसलेमला इस्राएलच्या राजधानी मानून अमेरिका तिथे आपला राजदूतावास सुरू करेल अशी घोषणा ट्रम्प यांनी गेल्या वर्षी केली होती. त्यामुळे मध्य पूर्वेच्या देशांत व पॅलेस्टिनींमध्ये खळबळ माजली होती. मात्र मदत बंद करण्याबाबत पॅलेस्टिनी नेते मोहम्मद अब्बास म्हणाले की, मध्यपूर्व देशांमध्ये शांतता नांदावी म्हणून ट्रम्प हे महत्त्वाची भूमिका बजावत
आहे. पण पॅलेस्टिनची मदत बंद करण्याचा इशारा देऊन ट्रम्प
यांनी आपली विश्वासार्हता गमावली आहे. (वृत्तसंस्था)

उत्तर कोरियालाही धमकी
अण्वस्त्रांचे बटन माझ्या टेबलावरच आहे असा इशारा उत्तर कोरियाचे नेते किम जाँग ऊन यांनी नुकताच अमेरिकेला दिला होता. ट्रम्प यांनी मंगळवारी केलेल्या टिष्ट्वटमध्ये ऊन यांना प्रत्युत्तर देताना असे म्हटले आहे की, माझे अण्वस्त्र बटण हे कोणाहीपेक्षा मोठे व शक्तिशाली आहे.

ब्लॅकमेलला
बधणार नाही
जेरुसलेम आम्ही काही विकायला ठेवलेले नाही अशी तिखट प्रतिक्रिया पॅलेस्टाइनचे अध्यक्ष महमुद अब्बास यांचे प्रवक्ते नबील अबु रुदैना यांनी व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी आम्हाला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला तरी आम्ही त्याला बधणार नाही असेही रुदैना म्हणाले.
पाकिस्तानला
पुन्हा इशारा
पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देणे थांबवत नाही तोपर्यंत अमेरिकेकडून दिली जाणारी मदत थांबविण्याचा विचार आहे असे अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रसंघातील राजदूत निक्की हॅले यांनी म्हटले आहे.
अमेरिकेच्या
दबावाखाली नाही
दहशतवादी हाफीझ सईद याची जमात उद दवा ही संघटना तसेच फलाह-इ- इन्सानियत फाऊंडेशन या दोन संघटनांवरील बंदी अमेरिकेच्या दडपणामुळे घातलेली नाही असे पाकिस्तानने स्पष्ट केले आहे.


Web Title: Like Pakistan, stop financial aid from Palestine - Warning of Trump
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.