पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2024 03:39 PM2024-01-28T15:39:19+5:302024-01-28T15:39:42+5:30

नवाझ शरीफ यांना पाकिस्तानातील निवडणूक जाहीरनाम्यात केला भारताचा उल्लेख

Pakistan and India may have peaceful relations but Nawaz Sharif has a special condition | पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

पाकिस्तान अन् भारत यांच्यात शांतता नांदू शकते, पण..; नवाझ शरीफ यांनी ठेवली एक 'विशेष' अट

Pakistan India, Nawaz Sharif: पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारी रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहेत. देशातील जनतेला पक्ष विविध आश्वासने देत आहेत. या दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज (PML-N) ने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून, त्यात भारताचाही उल्लेख केला आहे. जाहीरनाम्यात भारतासोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. मात्र यासोबतच त्यांनी भारतासाठी एक अटदेखील ठेवली आहे.

भारतासाठी अट कोणती?

PML-N च्या जाहीरनाम्यात भारतासह इतर देशांसोबत शांतता प्रस्थापित करण्यावर भर देण्यात आला आहे. देशांना शांततेचा संदेश देण्याचे वचन दिले आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, जाहीरनाम्यात असे म्हटले आहे की, जम्मू-काश्मीर राज्यातील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय मागे घेण्याच्या अटीवर पाकिस्तानकडून भारताशी शांततेचे संबंध प्रस्थापित केले जातील. ऑगस्ट २०१९ चा निर्णय मागे घेतला तर पाकिस्तान भारताशी मैत्रिपूर्ण संबंध निर्माण करण्यास उत्सुक आहे, असे नमूद करण्यात आले आहे.

"जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग"

PML-N कडून जाहीरनाम्यात जरी अशा अटीचे आश्वासन देण्यात आले असले तरी ही अट भारत कधीच पूर्ण करणार नाही. एक-दोनदा नव्हे तर अनेक वेळा भारताने जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. २०१९ मध्ये भारतीय संसदेने कलम ३७० च्या तरतुदी रद्द करणे ही भारताची आणि राज्यघटनेची अंतर्गत बाब असल्याचेही म्हटले आहे. त्यामुळे ही अट ठेवणे PML-N साठी किती फायद्याचे ठरेल, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

PML-N च्या जाहीरनाम्यात आणखी काय?

जाहीरनाम्यात पाकिस्तानची ढासळती अर्थव्यवस्था सुधारणे, हवामान बदलाच्या परिणामांशी लढा देणे, लोकांना स्वस्त वीज उपलब्ध करून देणे, वीज बिलांत २० ते ३० टक्के कपात करणे, तसेच दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुता धोरण असे आश्वासनही देण्यात आले आहे. जाहीरनाम्यात देशाच्या प्रगतीवर भर देण्यात आला आहे. PML-N ने आपल्या अधिकृत X खात्यावर 'पाकिस्तान को नवाज दो' अशा नावाचा जाहीरनामा शेअर केला आहे.

Web Title: Pakistan and India may have peaceful relations but Nawaz Sharif has a special condition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.