नेपाळी शेरपाची तेवीस वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 06:18 AM2019-05-16T06:18:25+5:302019-05-16T06:18:46+5:30

जिगरबाज नेपाळी शेरपाने एक, दोनदा नव्हे, तर तब्बल २३ वेळा माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याचे दिव्य करीत जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला.

 Nepalese Sherpa's twenty-three-time-long upheaval on the Everest | नेपाळी शेरपाची तेवीस वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

नेपाळी शेरपाची तेवीस वेळा एव्हरेस्टवर यशस्वी चढाई

Next

काठमांडू : आयुष्यात एकदा का होईना, माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचे जगभरातील गिर्यारोहकाचे स्वप्न असते. हिमालयीन पर्वतरांगेतील वातावरण किंवा हिमस्खलन, आकस्मिक घटना वा तब्येतीने साथ न दिल्याने अनेकांना वारंवार प्रयत्न करूनही यात यश मिळत नाही.
जिगरबाज नेपाळी शेरपाने एक, दोनदा नव्हे, तर तब्बल २३ वेळा माऊंट एव्हरेस्टची यशस्वी चढाई करण्याचे दिव्य करीत जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ करण्याचा स्वत:चाच विक्रम मोडला.
‘द हिमालयन टाइम्स’च्या वृत्तानुसार मागच्या वर्षी शेरपाने २२ व्या वेळी एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम केला होता. त्याने बुधवारी अन्य साथीदार शेरपांसोबत ८,८५० मीटर उंचीवर शिखर सर केले.
तब्बल तेवीस वेळा माऊंट एव्हरेस्ट शिखर यशस्वीपणे ‘सर’ करणाऱ्या या नेपाळी गिर्यारोहकाचे नाव कामी रिता शेरपा आहे.
‘माय रिपब्लिका’ या नेपाळी वृत्तपत्रानुसार कामी रिता १९९४ पासून माऊंट एव्हरेस्टवर चढाई करतो. १९९५ मध्ये त्याचा साथीदार मोहिमेच्या वाटेवरच आजारी पडल्याने त्याला एव्हरेस्टवर चढाई करता आली
नव्हती.
२०१७ मध्ये कामी रिता शेरपा एकवीस वेळा माऊंट एव्हरेस्ट यशस्वीपणे सर करणारी तिसरी व्यक्ती ठरली होती. त्यावेळी त्याने अपा शेरपा आणि फूरबा ताशी शेरपा यांच्या विक्रमाची बरोबरी केली होती. २०१८ मध्ये सर्वाधिक वेळा माऊंट एव्हरेस्टवर यशस्वी चढाई करण्याचा विक्रम त्याच्या नावावर होता. (वृत्तसंस्था)

सकाळी ७.५0 वाजता शिखरावर चढाई
बुधवारी सकाळी ७ वाजून ५० मिनिटाला नेपाळच्या कामी रिता शेरपाने माऊंट एव्हरेस्टवर चढाई करून जगातील सर्वांत उंच शिखर ‘सर’ केले, असे वृत्त या वृत्तपत्राने सेव्हन समीट ट्रेक्स कंपनीचे अध्यक्ष मिंगमा शेरपा यांच्या हवाल्याने दिले आहे. कामी रिता शेरपा हा नेपाळच्या सोलीखुम्बू जिल्ह्यातील थमे गावचा आहे.

Web Title:  Nepalese Sherpa's twenty-three-time-long upheaval on the Everest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.