मादागास्करमध्ये प्लेगच्या साथीनं आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2017 05:54 PM2017-10-10T17:54:59+5:302017-10-10T17:55:07+5:30

आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असणा-या मादागास्कर बेटावर प्लेगची साथ पसरली आहे. ऑगस्ट महिन्यात पसरलेल्या या साथीत आजवर 23 जणांचा मृत्यू झाल्याचे व 230 जणांना प्लेगची लागण झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे.

In Madagascar, 23 people have died so far with the plague | मादागास्करमध्ये प्लेगच्या साथीनं आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू

मादागास्करमध्ये प्लेगच्या साथीनं आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू

googlenewsNext

मादागास्कर - आफ्रिका खंडाच्या पूर्वेस असणा-या मादागास्कर बेटावर प्लेगची साथ पसरली आहे. ऑगस्ट महिन्यात पसरलेल्या या साथीत आजवर 23 जणांचा मृत्यू झाल्याचे व 230 जणांना प्लेगची लागण झाल्याचे बीबीसीने म्हटले आहे. जागतिक आरोग्य संस्थेने मादागास्करमध्ये प्लेग पसरू नये म्हणून 10 लाखांहून अधिक प्रतिजैविक औषधे पाठवली आहेत.

28 ऑगस्ट रोजी मोरामंगा येथे या साथीतील पहिला मृत्यू नोंदवण्यात आला त्यानंतर प्लेगला बळी पडणा-या लोकांची संख्या वाढतच गेली. वास्तविक मादागास्कर बेटावर प्लेग हा रोग नवा नाही. दरवर्षी मादागास्करमध्ये प्लेगची 400 लोकांना लागण झालेले दिसून येते. मात्र ते सगळे ब्युबॉनिक प्लेगचे रुग्ण असतात, आता आलेली साथ ही न्युमॉनिक प्लेगची असून ती जास्त धोकादायक आहे. ही साथ पूर्व मादागास्कर आणि अँटनानारिवो प्रांतांमध्ये पसरलेली आहे. प्लेग रोखण्यासाठी मादागास्करचे पंतप्रधान ऑलिव्हर महाफेली सोलोंद्रासना यांनी सर्व प्रकारच्या सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदीचे आदेश दिले आहेत. ३० सप्टेंबरपासून विद्यापीठे व ५ ऑक्टोबरपासून सार्वजनिक उपक्रमातील शाळा बंद ठेवण्याचेही आदेश त्यांनी दिले आहेत.

जागतिक आरोग्य संस्थेचे मादागास्कर प्रतिनिधी शार्लोट दिये यांनी याबाबत बोलताना सांगितले, वेळेत लक्षात आलं तर प्लेग बरा होण्यासारखा आहे. 'प्लेगचा धोका असणा-या लोकांच्या मदतीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. प्लेगबाधितांसाठी जितक्या वेगवान हालचाली आम्हाला करता येतील तितके चांगले होईल.' 

प्लेग जगातून नाहीसा झाला असे वाटत असतानाच आजही आशिया, आफ्रिका आणि अमेरिकेत प्लेगच्या साथी डोके वर काढत असतात. मादागास्करमध्ये भारतीय जहाजांतून 1898 साली प्लेग गेल्याचे सांगण्यात येते. प्लेगचे संक्रमण रोखण्यासाठी मादागास्करने चांगले प्रयत्न केले असले तरी 2004-2009 या काळात जगातील प्लेगबाधितांपैकी 30% रुग्ण मादागास्करमध्ये होते, असे एका निरीक्षणातून नोंदले गेले आहे.

Web Title: In Madagascar, 23 people have died so far with the plague

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.