"चीनला काहीही बडबडू दे, आम्ही स्पष्टच सांगतोय अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2024 03:10 PM2024-03-29T15:10:54+5:302024-03-29T15:11:28+5:30

भारताचे पंतप्रधान मोदी अरूणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर गेल्यानंतर चीनी नेत्यांनी विरोध केला होता

Let China say anything, we are clearly saying that Arunachal Pradesh belongs to India says External Affairs Ministry | "चीनला काहीही बडबडू दे, आम्ही स्पष्टच सांगतोय अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर

"चीनला काहीही बडबडू दे, आम्ही स्पष्टच सांगतोय अरूणाचल प्रदेश भारताचाच"; पराराष्ट्र मंत्रालयाचे सडेतोड प्रत्युत्तर

Arunachal Pradesh, India vs China: भारत आणि चीन यांच्यातील राजकीय संबंध गेल्या काही वर्षांपासून तणावाचे बनले आहेत. चीन सातत्याने शेजारील देशांवर आपली सत्ता गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. भारतातही चिनी घुसखोरीचा प्रयत्न होताना सतत दिसतो. पण भारत सरकार आणि भारतीय लष्कर चीनचा प्रयत्न प्रत्येक वेळी हाणून पाडते. नुकताच भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने गुरुवारी चीनला जोरदार प्रत्युत्तर दिले. अरुणाचल प्रदेश हा भारताचाच हिस्सा आहे आणि तो कायम भारतातच राहिल, असे भारताने ठणकावून सांगितले. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की चीनने कितीही वेळा आपल्या बेताल दाव्यांची पुनरावृत्ती केली तरी, अरुणाचल प्रदेश आमचा भाग होता, आहे आणि नेहमीच राहील ही आमची भूमिका बदलणार नाही.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी पत्रकार परिषदेत चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला दावा सुरू ठेवल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ही माहिती दिली. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान यांनी सोमवारी चीनच्या दाव्याचा पुनरुच्चार केल्यानंतर काही दिवसांतच भारताकडून या दाव्याला प्रत्युत्तर देण्यात आले. चीनला प्रत्युत्तर देताना परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, अरुणाचल प्रदेशच्या मुद्द्यावर आम्ही वारंवार सांगितले आहे की, चीन आपले बिनबुडाचे दावे हवे तितक्या वेळा करू शकतो, आमचा मुद्दा बदलणार नाही. अरुणाचल प्रदेश भारताचा भाग होता, आहे आणि राहील. याआधीही भारताने एका निवेदनात म्हटले होते की, भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला चीनचा विरोध मूर्खपणाचा आणि निराधार आहे.

चीनने काय केला दावा?

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे उत्तर चीनच्या दाव्यानंतर दिले. चीनने अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे सांगितले होते. चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल झांग झियाओगांग यांनी १५ मार्च रोजी एक निवेदन जारी करून भारतीय नेत्यांच्या अरुणाचल दौऱ्याला विरोध केला होता. पंतप्रधान मोदींनी नुकतेच अरुणाचल प्रदेशमधील सेला बोगद्याचे उद्घाटन केले होते. त्यानंतर चीनचे हे वक्तव्य समोर आले होते. ज्यामध्ये चीनने म्हटले की, 'जिजांग (तिबेटचे चिनी नाव) हा चीनचा भाग आहे आणि चीन भारतीय नेत्यांचा तथाकथित अरुणाचल प्रदेश कधीही स्वीकारणार नाही आणि त्याचा कडक विरोध करेल.' मात्र, भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने चीनला जोरदार प्रत्युत्तर देत चीनचे असे दावे फेटाळून लावले आहेत.

Web Title: Let China say anything, we are clearly saying that Arunachal Pradesh belongs to India says External Affairs Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.