महिला खेळाडूंचे शोषण करणा-या लिंगपिसाट डॉक्टरला १७४ वर्षे कैद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 01:41 AM2018-01-26T01:41:40+5:302018-01-26T01:42:13+5:30

विद्यापीठापासून ते आॅलिम्पिकपर्यंतच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या अनेक महिला जिम्नॅस्टचे वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली, कित्येक वर्षे लैंगिक शोषण केल्याबद्दल लॅरी नास्सर या डॉक्टरला विविध गुन्ह्यांसाठी ४० ते १७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

 Jailed gynecologist who was exploiting women players for 174 years | महिला खेळाडूंचे शोषण करणा-या लिंगपिसाट डॉक्टरला १७४ वर्षे कैद

महिला खेळाडूंचे शोषण करणा-या लिंगपिसाट डॉक्टरला १७४ वर्षे कैद

Next

वॉशिंग्टन : विद्यापीठापासून ते आॅलिम्पिकपर्यंतच्या स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या अमेरिकेच्या अनेक महिला जिम्नॅस्टचे वैद्यकीय उपचाराच्या नावाखाली, कित्येक वर्षे लैंगिक शोषण केल्याबद्दल लॅरी नास्सर या डॉक्टरला विविध गुन्ह्यांसाठी ४० ते १७५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
मिशिगन राज्यातील लॅनसिंगच्या न्यायालयात डझनावारी महिला जिम्नॅस्टनी गेला आठवडाभर साक्षी देऊन डॉक्टर नास्सरच्या लिंगपिसाट वर्तनाचे प्रसंग विशद केले. या साक्षी ग्राह्य धरून महिला न्यायाधीश रोझमेरी अ‍ॅकिलिना यांनी या ‘धोकादायक’ आरोपीची शिक्षा जाहीर केली. निर्विकार चेहºयाने उभ्या असलेल्या आरोपीस शिक्षा सुनावताना न्यायाधीश म्हणाल्या, ‘आयुष्यात कधीही तुरुंगातून बाहेर पडण्यास तू लायक नाहीस. तू धोकादाक होतास आणि यापुढेही तुझा धोका कायमच राहील. तू जेथे कुठे जाशील, तेथे निष्पापांची आयुष्ये उद्ध्वस्त करशील!
नास्सरला याआधी बालकांचे लैंगिक शोषण केल्याच्या गुन्ह्याखाली ६० वर्षे कैदेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयात त्याने लैंगिक अत्याचाराच्या १० गुन्ह्यांची कबुली दिली. त्यापैकी सात गुन्ह्यांसाठी त्याला शिक्षा ठोठावली. बाकीच्या शिक्षा पुढील आठवड्यात सुनावल्या जातील. (वृत्तसंस्था)
१४० पीडित खेळाडूंची साक्ष-
शिडशिडीत देहयष्टीचा डॉक्टर नास्सर मिशिगन विद्यापीठात नोकरीला होता. त्याने अनेक वर्षे विविध स्तरांवरील महिला जिम्नॅस्ट्सचा डॉक्टर म्हणून काम केले. त्याच्या लैंगिक अत्याचारास रॅचेल जेनहॉलंडर हिने वाचा फोडली. तिच्या फिर्यादीवरूनच खटला उभा राहिला. ‘मी तुमच्यासारखी धाडसी व्यक्ती पाहिली नाही’, असे म्हणून न्यायाधीश अ‍ॅकिलिना यांनी रॅचेलचे कौतुक केले. त्यांनी खटल्याचे कामकाज रॅचेलच्या फिर्यादीपुरते मर्यादित न ठेवता ज्या या डॉक्टरच्या लैंगिक अत्याचारांना बळी पडल्या, त्यांनी पुढे येण्याचे आवाहन केले. त्यानुसार १४० खेळाडूंनी साक्षी दिल्या. यात सिमोन बाइल्स, अ‍ॅली रेझमन, गॅबी डल्गस व मॅक्कायसा मॅरोनी या आॅलिम्पिक सुवर्णपदे जिंकणा-या
खेळाडूंचा समावेश होता.
डॉक्टर नास्सरने गेल्या १७ नोव्हेंबर रोजी गुन्ह्यांची कबुली दिली. शिक्षा सुनावली जाण्याच्या आधी, न्यायालयात हजर असलेल्या पीडित खेळाडूंकडे वळून त्याने अत्यंत अजिजीच्या स्वरात माफी मागितली. माझ्या वर्तनाने तुम्हाला जो क्लेश सोसावा लागला त्या तुलनेत मला होत असलेला पश्चात्ताप काहीच नाही. कृत्यांबद्दल होत असलेला खेद व्यक्त करण्यास माझ्याकडे शब्द नाहीत, असे तो मानभावीपणे म्हणाला.
न्यायाधीश अ‍ॅकिलिना यांनी नास्सरला त्याचा पश्चात्ताप बेगडी असल्याचे सुनावले व त्याने न्यायालयास लिहिलेल्या एका पत्राचा हवाला दिला. गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर आरोपीने हे पत्र लिहिले होते. आपण कोणावरही लैंगिक अत्याचार केले नाहीत. ते डॉॅक्टर म्हणून केलेले वैद्यकीय उपचार होते, असा दावा त्यात त्याने केला होता.
तुम्ही जे केलेत ते उपचार नव्हते व वैद्यकीय उपचार तर नक्कीच नव्हते. मी माझ्या कुत्र्यालाही तुमच्याकडे पाठविणार नाही!
-रोझमेरी अ‍ॅकिलिना, न्यायाधीश,
मिशिगन न्यायालय
तुम्ही एवढे विकृत आहात की, तुमचे विचार मनात येतात, तेव्हा किती राग येतो हे मलाही सांगता येत नाही.
- अ‍ॅली रेझमन,
महिला जिम्नॅस्ट (कोर्टात आरोपीस उद्देशून)

Web Title:  Jailed gynecologist who was exploiting women players for 174 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.