गाझापट्टीत AIच्या मदतीने इस्रायल करतोय हवाईहल्ले?; एका पुस्तकात करण्यात आला दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2024 03:57 PM2024-04-06T15:57:15+5:302024-04-06T15:57:52+5:30

गॉस्पेल नावाच्या AI सिस्टमच्या आधारे टार्गेटची निवड केली जात असल्याचीही मिळतेय माहिती

Israel using ai to identify gaza targets un chief said in book hamas war | गाझापट्टीत AIच्या मदतीने इस्रायल करतोय हवाईहल्ले?; एका पुस्तकात करण्यात आला दावा

गाझापट्टीत AIच्या मदतीने इस्रायल करतोय हवाईहल्ले?; एका पुस्तकात करण्यात आला दावा

Israel Hamas War in Gaza Palestine: गेल्या सहा महिन्यांपासून गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, इस्रायल आपल्या शत्रूंची माहिती गोळा करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजेच AI चा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे आणि त्या आधारे टार्गेट निवडून त्यांचा नाश करत असल्याचे समोर आले आहे. इस्रायलच्या सुरक्षेशी संबंधित लोकांच्या मते, इस्रायलने गॉस्पेल नावाची एआय प्रणाली विकसित केली आहे. गॉस्पेल प्रणालीद्वारे, डिजिटल डेटा, ड्रोन फुटेज, उपग्रह प्रतिमा, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे उपलब्ध माहितीच्या आधारे टार्गेटची निवड केली जाते. एआय तंत्रज्ञानाद्वारे, एका दिवसात १०० जागांची टार्गेट निवडणे शक्य आहे, जे कोणत्याही सैन्यासाठी साधारणपणे अशक्य आहे. याशिवाय इस्रायलकडे लॅव्हेंडर आणि इतर एआय प्रोग्राम आहेत, जे सैन्य युद्धभूमीत वापरले जात आहेत.

पुस्तकामुळे इस्रायलची रणनीति झाली उघड

इस्रायलच्या सर्वात गूढ आणि शक्तिशाली इंटेलिजेंस युनिट – 8200 च्या प्रमुखाने लिहिलेले पुस्तक सध्या चर्चेत आहे. द ह्युमन मशीन टीम नावाने लिहिलेले हे पुस्तक युद्धातील कृत्रिम बुद्धिमत्तेबद्दल तपशीलवार वर्णन करते. इस्त्रायली इंटेलिजन्स चीफने हे पुस्तक २०२१ मध्ये लिहिले असले तरी सध्या इस्त्रायली लष्कराने एआयचा वापर केल्यानंतर सर्वांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे.

लेखक म्हणून त्यांनी आपले नाव ब्रिगेडियर जनरल वाय.एस. असे सांगितले आहे. हे नाव त्यांच्या खऱ्या नावाचे संक्षिप्त रूप आहे. इस्रायली इंटेलिजेंस चीफच्या म्हणण्यानुसार, टार्गेट निवडणारी AI मशीन आपल्या डेटामध्ये हे देखील ठरवते की कोणता व्यक्ती आपला मोबाइल फोन किंवा हँडसेट किंवा फोन नंबर वारंवार बदलत आहे, कोण वारंवार त्याचे स्थान किंवा पत्ता बदलत आहे. जर कोणताही संशयित व्यक्ती व्हॉट्सॲप ग्रुपशी जोडला गेला असेल तर तो संभाव्य टार्गेट होऊ शकतो.

दरम्यान, इस्रायली संरक्षण दलाचे म्हणणे आहे की एआय सिस्टीमने लक्ष्य निवडले असले तरी अंतिम निर्णय वरिष्ठ लष्करी अधिकारीच घेतात. अलीकडच्या काही दिवसांत, इस्रायली बॉम्बहल्ल्यात आंतरराष्ट्रीय संघटनांशी संबंधित कार्यकर्त्यांच्या हत्येनंतर, IDFच्या म्हणजेच इस्रायल सुरक्षा बल यांच्या संपूर्ण रणनीति आणि निर्णयांवर जगभरात प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे हा मुद्दा अधिक चर्चेत असल्याचे दिसत आहे. 

Web Title: Israel using ai to identify gaza targets un chief said in book hamas war

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.