मुलांना वाढवू, की मोबाइलची बिलं भरू?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 05:17 AM2021-08-11T05:17:45+5:302021-08-11T05:19:06+5:30

‘ग्रोइंग अप डिजिटल ऑस्ट्रेलिया’ या संस्थेनं  केलेला अभ्यास सांगतो. कोरोनाकाळात जवळपास ८० टक्क्यांपेक्षाही जास्त मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल किंवा डिजिटल डिव्हायसेस आले.

children started using smartphone in for education in corona crisis | मुलांना वाढवू, की मोबाइलची बिलं भरू?

मुलांना वाढवू, की मोबाइलची बिलं भरू?

googlenewsNext

शंभरातले ९९ पालक सांगतील, जेव्हापासून मुलांच्या हातात मोबाइल आला, दिला, तेव्हापासून ती बिघडली. त्यांच्या सवयी बदलल्या, वागणूक विचित्र झाली, त्यांचं अभ्यासावरचं लक्ष उडालं.. पण, याच पालकांनी स्वत:हून आपल्या मुलांना कधी नाइलाजानं तर कधी ‘गरज’ म्हणून स्मार्ट फोन्स घेऊन दिले. कोरोनाकाळात तर अगदी गरिबांसाठीही ती जणू सक्तीच झाली. कारण शाळा बंद झाल्यानं ऑनलाइन शिक्षणाशिवाय पर्याय राहिला नाही. जगभरातील कोट्यवधी पालकांना शिक्षणाची ही गरज भागवण्यासाठी मुलांना डिजिटल डिव्हायसेस घेऊन देणं सक्तीचं झालं आणि त्यासाठी त्यांना प्रचंड खर्चही करावा लागला.

‘ग्रोइंग अप डिजिटल ऑस्ट्रेलिया’ या संस्थेनं  केलेला अभ्यास सांगतो. कोरोनाकाळात जवळपास ८० टक्क्यांपेक्षाही जास्त मुलांच्या हातात स्वत:चे मोबाइल किंवा डिजिटल डिव्हायसेस आले. मोबाइल हाती येण्याचं वयही अतिशय खाली आलं. अगदी तीन ते चार वर्षांच्या मुलांच्याही हातात त्यांचा ‘स्वत:चा’ मोबाइल आला. कारण शाळाच आता माेबाइलवर आली होती!  बहुसंख्य मुलांच्या हाती तर एकापेक्षा जास्त म्हणजे तीन तीन डिजिटल डिव्हायसेस आले. त्याचा त्यांच्या जीवनशैलीवर परिणाम झाला नसता, तरच नवल! यामुळे ही भावी पिढी अक्षरश: अतिशय झपाट्यानं स्क्रीनच्या जाळ्यात ओढली गेली. मुलांच्या हाती मोबाइल येण्याचा सर्वांत जास्त वेग २०२० या वर्षी होता. तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे गणित, विज्ञान, भूगोल यासारख्या विषयांत विद्यार्थ्यांना फायदाही झाला असला, तरी हा फायदा करून घेणाऱ्या मुलांचं प्रमाण अतिशय कमी आहे. अनेक पालकांची तक्रार आहे, मोबाइल मिळाल्यापासून मुलांच्या शरीरिक क्रिया जणू बंद झाल्यातच जमा झाल्या आहेत आणि त्यांचा स्क्रीन टाइमही खूप वाढला आहे. त्याच्यावरचं त्यांचं अवलंबित्व नको इतकं वाढलं आहे. अनेक मुलं एखादा दिवस तर जाऊ द्या, पण काही तासही मोबाइलपासून दूर राहू शकत नाहीत, असाही या अभ्यासाचा निष्कर्ष आहे.

दुसरीकडं ब्रिटननंही नुकतंच एक सर्वेक्षण केलं आहे. त्या अभ्यासानुसार जग डिजिटल मार्गावर प्रवास करत असताना तंत्रज्ञान आणि ती उत्पादनं विकत घेण्यावरचा खर्चही प्रचंड प्रमाणात वाढतो आहे. पालकही त्यामुळे पार मेटाकुटीला आले आहेत. त्यांचं बजेट पार कोलमडलं आहे. मुलांच्या शिक्षणासाठी पूर्णपणे तंत्रज्ञानावर अवलंबून राहावं लागत असल्यानं त्यासाठीचा खर्च, तोही अचानक आणि एकदम करावा लागल्यानं त्यांची मजबुरी वाढली आहे. त्यात कोरोनाकाळानं अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर बहुतेकांचे पगार कमी झाले आहेत. केवळ दोन वर्षांपूर्वीचीच गोष्ट. पालकांना मुलांच्या शिक्षणासाठी तंत्रज्ञानावर अवलंबून राहण्याची सक्ती नव्हती आणि त्यासाठी त्या वेळी त्यांना केवळ ९७ पाऊण्ड‌्स (सुमारे दहा हजार रुपये) खर्च येत होता, पण आता त्यात कित्येक पटींनी वाढ झाली आहे. या अभ्यासाचा निष्कर्ष सांगतो, मूल सोळा वर्षांचं होत नाही, तोपर्यंत पालकांना त्याच्या केवळ शैक्षणिक तंत्रज्ञान सुविधांसाठी तब्बल ४० हजार पाऊण्ड‌्स (४१ लाख रुपये) खर्च करावे लागतात. बऱ्याचदा हा खर्च त्याच्या पुढेच जातो. हा झाला केवळ तंत्रज्ञानावरचा, उपकरणांवरचा खर्च. त्याशिवाय मुलांची शाळेची फी, कपडेलत्ते, ट्युशन्स, पुस्तकं, इतर ॲक्टिव्हिटीज् यावरचा खर्च वेगळाच! महिन्याच्या ठरावीक मिळकतीतून रोजचा दैनंदिन खर्च करायचा की मुलांच्या शिक्षणावर, असा यक्ष प्रश्न पालकांपुढे उभा राहिला आहे. काही गरीब पालकांनी तर मुलांच्या शिक्षणावरचा हा खर्चच थांबवून टाकला आहे. त्यामुळे मुलांचं शिक्षणही धोक्यात आलं आहे.

ज्यांची मुलं शाळेत जातात, अशा हजारो पालकांचा बारकाईनं अभ्यास करण्यात आला. त्यांना विविध प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांची आर्थिक मिळकतही जाणून घेण्यात आली. त्यातल्या जवळपास ७७ टक्के पालकांनी सांगितलं, मुलांना शाळेत पाठवणंही आम्हाला आता मुश्कील झालं आहे. त्यांच्यावरचा इतका खर्च आम्ही कुठून करायचा? आमची मुलं उच्च शिक्षण घेऊ शकतील की नाही, याचीच चिंता आता आम्हाला सतावते आहे. १७ टक्के पालकांनी सांगितलं, स्मार्टफोन, लॅपटॉपपासून तर इतर महागडी तंत्रउत्पादनं घेण्यासाठी शाळांकडूनही मोठा दबाव वाढतो आहे. तो आम्ही सहन करू शकत नाही. 

मुलांचं शिक्षण झालं अवघड! 
मुलांच्या शिक्षणावर केवळ तंत्रज्ञानासाठी पालकांना ४० हजार पाऊण्ड‌्स खर्च सोसावा लागतोय. कपडे, खाणं-पिणं, पॉकेट मनी यावरचा त्यांचा खर्च साधारण १५,५३६ पाऊण्ड‌्स (१६ लाख रुपये) तर प्रत्येक मुलामागचा किरकोळ खर्च २३३ पाऊण्ड‌्स (२४ हजार रुपये) आहे. एवढा पैसा आम्ही कुठून आणायचा, असा पालकांचा रास्त सवाल आहे. या अधिकच्या खर्चासाठी आम्हाला जास्त कमाई करावी लागेल, हे उघड आहे. त्यासाठी आमची तयारीही आहे; पण सध्याच्या काळात आहे ती नोकरी टिकविण्यासाठीही धडपड करावी लागत असताना पैसा कुठून आणि कसा कमवायचा, याचं उत्तर आमच्याकडे नाही, असंही पालक खिन्नपणे सांगतात.

Web Title: children started using smartphone in for education in corona crisis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.