मॉस्कोची अप्रतिम वाहतूक व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 05:25 AM2018-07-08T05:25:39+5:302018-07-08T05:26:13+5:30

मॉस्कोच्या मेट्रोने म्हणा किंवा त्यांच्याकडील बस, मोनोरेल, ट्राम आणि लोकलने फिरताना तेथील जनतेची होणारी सोय एकदम डोळ्यात भरते. मेट्रोची एकूण लांबी ४०० किमी, २४५ स्टेशन, त्यापैकी ८७ जवजवळ शंभर मीटर खोलीची, ११५ मध्यम खोलीची आणि उर्वरित जमिनीलगत आणि जमिनीपासून वर.

 The amazing transport system of Moscow | मॉस्कोची अप्रतिम वाहतूक व्यवस्था

मॉस्कोची अप्रतिम वाहतूक व्यवस्था

Next

- रणजीत दळवी

महानगर कोणतेही असो, कुठल्याही देशातले, त्याचा विकास, त्याची प्रगती, भरभराट होण्यासाठी जे प्रमुख आणि प्रभावी साधन आवश्यक असते, ते म्हणजे तेथील वाहतूक व्यवस्था. थोडक्यात त्याला ‘मास अँड रॅपिड पब्लिक ट्रान्सपोर्ट’ असे संबोधले जाते. बहुतांसाठी गतिमान प्रवासाचे साधन, दुसरे काय? रशियाची राजधानी मॉस्कोविषयी सांगावयाचे, तर त्यांच्याकडे मेट्रो सुरू झाली १९३५ साली! त्या आधी लंडनची ‘द ट्युब’ १८६३ मध्ये! रशियाने ब्रिटिशांच्या मदतीने ती सुरुवातीला उभारली. तसे आमचे राज्यकर्ते ब्रिटिशांचेही आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनीच तर आपल्याला मुंबईची लोकल व्यवस्था आणि देशभरातील रेल्वेचे जाळे नाही का दिले?

मॉस्कोच्या मेट्रोने म्हणा किंवा त्यांच्याकडील बस, मोनोरेल, ट्राम आणि लोकलने फिरताना तेथील जनतेची होणारी सोय एकदम डोळ्यात भरते. मेट्रोची एकूण लांबी ४०० किमी, २४५ स्टेशन, त्यापैकी ८७ जवजवळ शंभर मीटर खोलीची, ११५ मध्यम खोलीची आणि उर्वरित जमिनीलगत आणि जमिनीपासून वर. कमालीचा वक्तशीरपणा हे वैशिष्ट्य आणि स्वच्छता म्हणाल, तर कागदाचा कपटादेखील दिसत नाही
आणि महत्त्वाचे म्हणजे शिस्त. कोठेही उगाचच धावपळ, इतरांना त्रास, आरडओरडा असला प्रकारच नाही. आत पाहावे, तर बहुतेकांच्या हातात पुस्तके आणि नव्या पिढीच्या हातात मोबाइल. त्यातच ते मशगुल! पण त्या मोबाइलवर तुम्हाला बरेच काही करता येते. अगदी नवोदित, नवख्याला समजावा, असा नकाशा, कारण विस्तारलेल्या मेट्रोचे जाळे फारच गुंतागुंतीचे, चक्क १३ लाइन, शहराच्या वेगवेगळ्या भागांना जोडतात. बाकी वेळापत्रक, भाडेसूची आणि प्रवाशांना अन्य उपयुक्त माहिती. अगदी स्थानिकांनाही याची आवश्यकता भासते. कारण ही व्यवस्थाच तशी विस्तीर्ण आहे.
मॉस्कोची मेट्रो व्यवस्था चांगलीच सुरक्षित आहे. अर्थात, याला अपवाद हे असतातच. १९७७, २०००, २००४, २०१० साली बॉम्बस्फोटांनी मेट्रो हादरली. शंभराच्या वर माणसे दगावली. आमच्याकडे लोकलमुळे वर्षाला ३ ते ४ हजार मृत्यू होतात, या
तुलनेत हे फारच कमी. आजपर्यंत एक - दोन आगी आणि एकदाच ‘डीरेलमेन्ट’. तेव्हा मेट्रो किती सुरक्षित आहे, हे समजून यावे. प्रतिदिनी ७५ लाख प्रवासी ही संख्याही तशी मोठी. गर्दीच्या वेळी साधारण १० लाख प्रवासी एका वेळी असतात.
रशिया हा कष्टकऱ्यांचा देश, तेव्हा त्यांना आवश्यक असणारी प्रवासाची सुविधा सरकार देते. अगदी प्रचंड नुकसान सोसून आणि आम्ही? बेस्ट, एस.टी. महामंडळ, सारे काही तोट्यात! केव्हा
एकदा खासगीकरण करतो आणि झटकून टाकतो नागरी परिवहनाची जबाबदारी! पब्लिक ट्रान्सपोर्ट ही सरकारचीच जबाबदारी आणि ती कशी पार पाडावी, याचे शिक्षण द्यावे आमच्या सरकारी बाबू आणि राजकारण्यांना एकदाचे! जशी त्यांची तशी जनतेचीही जबाबदारी नाही का? वक्तशीरपणा, स्वच्छता, सुरक्षितता, उत्तम प्रशासन आपल्याकडील कोलकाता, मुंबई, दिल्ली, बेंगळुरू अशा महानगरातील मेट्रोमध्ये अवश्य पाहावयास मिळते,
हेही खरे! नाही म्हटले, तरी मुंबईची
लोकल व्यवस्था त्या महानगरीच्या
व्यापार - उदिमाला भरभराटीला कारणीभूत ठरले हेही खरे.
 

Web Title:  The amazing transport system of Moscow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.