झेडपी शाळेतील आवडत्या शिक्षिकेची बदली झाली, निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रु अनावर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2024 04:16 PM2024-03-02T16:16:19+5:302024-03-02T17:18:02+5:30

'मॅडम तुम्ही जाऊ नका, आमच्या शाळेतच रहा', असे म्हणत प्रत्येक विद्यार्थी रडत होता.

ZP school's favorite teacher gets transferred, students tear up as bid farewell | झेडपी शाळेतील आवडत्या शिक्षिकेची बदली झाली, निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रु अनावर

झेडपी शाळेतील आवडत्या शिक्षिकेची बदली झाली, निरोप देताना विद्यार्थ्यांना अश्रु अनावर

कळमनुरी(जि.हिंगोली) : तालुक्यातील केंद्रीय प्राथमिक शाळा वारंगा फाटा येथील शिक्षिका नागम्मा मोगलेकर यांची समायोजनाने बदली झाली. त्यानिमित्त त्यांना एक मार्च रोजी शाळेच्यावतीने निरोप देण्यात आला. आता यापुढे आपल्या आवडत्या शिक्षिका शिकविण्यास नसणार यामुळे निरोप समारंभानंतर भावनाविवश विद्यार्थी शिक्षिकेला पकडून धायमोकलून रडले. हा प्रसंग पाहून सहकारी शिक्षक, ग्रामस्थ देखील भावुक झाले.

सण 2022- 2023 या संच मान्यतेनुसार या शाळेवर नागम्मा मोगलेकर या शिक्षिका अतिरिक्त ठरल्या आहेत. त्यामुळे 29 फेब्रुवारी रोजी शिक्षण विभागाने त्यांची समायोजनाने चाफनाथ येथे बदली केली. यामुळे मोगलेकर यांना १ मार्च रोजी शाळेच्यावतीने निरोप देण्यात आला. आपल्या आवडीच्या शिक्षिका यापुढे शिकविण्यास नसणार ही कल्पना करून शाळेतील विद्यार्थी भावनिक झाले. निरोप समारंभ झाल्यानंतर विद्यार्थी मोगलेकर यांना पकडून रडत होते. 'मॅडम तुम्ही जाऊ नका, आमच्या शाळेतच रहा', असे म्हणत प्रत्येक विद्यार्थी रडत होता. यामुळे शाळेतील वातावरण भावुक झाले होते. 

नागम्मा मोगलेकर या शिक्षिका विद्यार्थी प्रिय आहेत. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडविले. बंधुभाव, एकता, आपलेपणाची भावना प्रत्येकाविषयी प्रेम, भेदभाव न करणे या बाबी त्यांनी  विद्यार्थ्यांना शिकविल्या. त्यांच्या सहवासात अनेक विद्यार्थी घडले.त्यांच्या व सहकारी शिक्षकांच्या योगदानातून वारंगा फाटा ही शाळा आदर्श शाळा म्हणून शासनाने निवड केली.विद्यार्थ्यांप्रती त्यांची चांगली आत्मीयता होती. पालकही ही शिक्षिका या शाळेतच राहाव्यात यासाठी मुख्याध्यापकांना सांगत होते. या शिक्षिका शिस्तप्रिय असून गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच त्पुढाकार होता.  

दरम्यान, दुपारच्या वेळेला मध्यंतराच्या वेळेत मोगलेकर शिक्षिका विद्यार्थ्यासोबत बसून जेवण करत. स्वच्छता, टापटीपणा आदी चांगल्या सवयी विद्यार्थ्यांना शिकविंल्या. 9 वर्षे त्यांनी येथे अध्यापनाचे चांगले कार्य केले. वेळेचे महत्व, दर्जेदार अध्यापन, शिस्तप्रिय असल्यामुळे या शिक्षिकेबद्दल सर्वच विद्यार्थ्यांमध्ये आपलेपणाची भावना होती. या शाळेत विविध उपक्रम त्यांनी राबविले. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढली पाहिजे यासाठी या शिक्षकेची तळमळ होती. यामुळेच विद्यार्थी, ग्रामस्थ आणि सहशिक्षक देखील मोगलेकर यांच्या बादलीने भावुक झाले आहेत. निरोप समारंभ प्रसंगी कैलास सूर्यवंशी, पंडितराव नागरगोजे, केशव वाघमारे, भास्कर देशमुख, शेख इकबाल, वैशाली गुंगे, बिरादार, लिंबाजी कदम, संतोष पतंगे, ओम पाटील ,अनिता बारमाडे, सुधाकर चव्हाण आदींची उपस्थिती होती.

Web Title: ZP school's favorite teacher gets transferred, students tear up as bid farewell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.