मैत्रिणीला बोलल्याने तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी; चार तासांत तिघांना बेड्या

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: March 11, 2024 07:23 PM2024-03-11T19:23:59+5:302024-03-11T19:24:38+5:30

चार तासांच्या थरारानंतर तिघांना ठोकल्या बेड्या; पोलिसांनी तरुणाची केली सुखरूप सुटका 

Young man kidnapped and demanded ransom for talking to his girlfriend; three arrested in four hours | मैत्रिणीला बोलल्याने तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी; चार तासांत तिघांना बेड्या

मैत्रिणीला बोलल्याने तरुणाचे अपहरण करून मागितली खंडणी; चार तासांत तिघांना बेड्या

हिंगोली : मैत्रिणीला बोलत असल्याने एकाचे अपहरण करून त्याच्या भावाला दहा लाखांची खंडणी मागणाऱ्या तिघांना सिनेस्टाईन पाठलाग करून पोलिसांनी पकडले. तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे शिवारातील माळावर हा थरार ११ मार्च रोजी घडला. पोलिसांनी आरोपींकडून एक खंजीर जप्त केले असून अपहरण झालेल्या व्यक्तीची सुखरूप सुटका केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील प्रमोद शेषराव पांडे यांचा भाऊ विनोद पांडे यांचे कोणीतरी अपहरण केले असून सुटका करण्यासाठी दहा लाखांची खंडणी मागितली होती. याची माहिती पोलिसांना ११ मार्च रोजी पहाटे ४ वाजता मिळाली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता आरोपींचा शोध घेऊन अपहरण झालेल्या विनोद यांची सुटका करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी पथकाला दिल्या. त्यानुसार हिंगोली ग्रामीणचे सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड, स्थागुशाचे सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, राजेश मलपिलू, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने डिग्रस कऱ्हाळे गाव गाठले. 

प्रमोद पांडे यांना सोबत घेत पोलिसांनी डमी १० लाखाची बॅग तयार केली. त्यानंतर दाटेगाव-लोहगाव परिसरात दाखल झाले. मात्र खंडणीखोर वेळोवेळी लोकेशन बदलत राहिला. शेवटी खंडणीराने केशव माळ या टेकडीवर दहा लाख रूपयांची बॅग ठेवण्यास प्रमोद यांना सांगितले. प्रमोद पांडे यास सोबत घेत पोलिसांनी शेतकऱ्यांच्या वेषात पैशाची बॅग केशव माळावर ठेवत झाडाझुडपात दबा धरून बसले. आरोपी पैशाची बॅग नेण्यासाठी येताच पाठलाग करून त्यास पकडले. चौकशी केली असता त्याने ओमकार उर्फ शुटर केशव मुखमाहाले असे नाव सांगितले. तसेच हनुमान उर्फ हंटर विश्वनाथ कऱ्हाळे, नितीन उर्फ जादू रामेश्वर कऱ्हाळे (सर्व रा. डिग्रस कऱ्हाळे) यांना सोबत घेत विनोद पांडे याचे अपहरण केल्याची कबुली दिली. 

अशी केली सुटका
आरोपी ओमकार मुखमाहाले यास ताब्यात घेतल्यानंतर विनोद पांडे यांना केशव माळावर ओलीस ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी माळाला वेढा देत आरोपींचा शोध घेतला. चार तासांच्या थरारानंतर अन्य दोन्ही आरोपींनाही बेड्या ठोकत विनोद पांडे यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आले. यावेळी आरोपींकडून एक खंजीर जप्त केले. 

मैत्रिणीला बोलल्याने केले अपहरण
विनोद पांडे हे आरोपी हनुमान उर्फ हंटर याच्या मैत्रिणीला बोलत होते. या कारणावरून त्यांचे अपहरण आरोपींनी केले होते. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड, राजेश मलपिलू, शिवसांब घेवारे, उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, मगन पवार, पोलिस अंमलदार किशोर सावंत, महादू शिंदे, विशाल खंडागळे, गजानन पोकळे, विठ्ठल काळे, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले,दिपक पाटील, असलम गारवे, होमगार्ड विशाल मोहिते, कोरडे यांच्या पथकाने केली.

Web Title: Young man kidnapped and demanded ransom for talking to his girlfriend; three arrested in four hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.