काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 11:54 PM2019-03-30T23:54:23+5:302019-03-30T23:54:38+5:30

लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

 On the whirlpool in Congress | काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : लोकसभा मतदारसंघात भाजपमधून आयात करून उमेदवार देण्याची वेळ आलेल्या काँग्रेसला अजूनही सद्बुद्धी आलेली दिसत नाही. उमेदवार सुभाष वानखेडे यांच्यासाठी रविवारी दुपारी साई रिसॉर्ट येथे आयोजित केलेल्या बैठकीला माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकरांनाच निमंत्रण नसल्याचा मुद्दा समोर आल्याने समर्थकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.
गुजरात राज्याच्या जबाबदारीमुळे खा.राजीव सातव यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचे राज्य असल्याने त्यांना पूर्ण वेळ मिळण्यासाठी पक्षाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जाते. मात्र सातव यांच्यानंतर दुसरा कोणी सक्षम उमेदवार समोर आला नाही. इतर अनेकांना विधानसभा निवडणूकच लढवायची आहे. त्यामुळे ऐनवेळी माजी खा.सुभाष वानखेडे यांना आयात करावे लागले. त्यांची निवड करताना लोकसभेत येणाऱ्या आघाडीच्या सर्व आजी-माजी आमदारांना विश्वासात घेतले. एवढेच नव्हे, तर निवडून आणण्याची जबाबदारीही दिली. या सर्व प्रकारांत हिंगोलीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर हे आघाडीवर होते. तसेच आ.प्रदीप नाईक, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर, माजी आ.माधवराव पाटील जवळगावकर, माजी आ.विजय खडसे यांनाही विचारणा झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष अशोक राव चव्हाण, खा.राजीव सातव यांनी वानखेडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. मात्र आता हिंगोली विधासनभेतच अडचण निर्माण झाली आहे. प्रचारयंत्रणा कामाला लावण्यासाठी खा.राजीव सातव यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीचे माजी आ.भाऊराव पाटील गोरेगावकर यांना साधे निमंत्रणही नाही. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी समाज माध्यमांवरून व्हायरल केलेल्या संदेशात त्यांचे नाव व छायाचित्रही नाही. त्यावरून आता गोरेगावकर समर्थक पुन्हा बुचकळ्यात पडले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जाईपर्यंत सर्व काही ठीक होते. आता अचानकच पुन्हा चित्र का बदलले, असा सवाल केला जात आहे.
काँग्रेसमधील गट-तट नेहमीच पराभवाला कारण ठरत असतात. मागच्या जि.प. निवडणुकीतही तोच अनुभव आला होता. आता पुन्हा लोकसभेला तेच चित्र निर्माण झाले आहे. भाजपमधून उमेदवारीसाठीच काँग्रेसमध्ये आलेल्या सुभाष वानखेडे यांना नीट काही कळायच्या आतच हे सगळे प्रकार घडून जात आहेत. त्यामुळे काँग्रेसचा या मतदारसंघात जोर असतानाही एकही मूळकाँग्रेसी का उभा राहिला नाही, यामागचे गणित त्यांना कळाले असेल. त्यांनी वेळीच सावरून न नेल्यास बळीचा बकरा ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र मतभेदांची ही भिंत तोडायची कशी, हा प्रश्नच आहे.

Web Title:  On the whirlpool in Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.