हिंगोलीच्या उद्यानात नाहीत सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2018 12:55 AM2018-07-02T00:55:53+5:302018-07-02T00:56:19+5:30

शहरातील नगरपालिकेच्या बाल उद्यानात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बालकांसाठी असलेल्या खेळणी साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानातील झोके व पाळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे उद्यान परिसरात स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे पालिका येथील सुविधांकडे खरेच लक्ष देईल का? हा प्रश्नच आहे.

 Hingoli garden facilities | हिंगोलीच्या उद्यानात नाहीत सुविधा

हिंगोलीच्या उद्यानात नाहीत सुविधा

Next

दयाशिल इंगोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : शहरातील नगरपालिकेच्या बाल उद्यानात आवश्यक सुविधा नाहीत. शिवाय बालकांसाठी असलेल्या खेळणी साहित्यांचीही दुरवस्था झाली आहे. उद्यानातील झोके व पाळण्यांची दयनीय अवस्था झाली आहे. विशेष म्हणजे उद्यान परिसरात स्वच्छतागृहही नाही. त्यामुळे पालिका येथील सुविधांकडे खरेच लक्ष देईल का? हा प्रश्नच आहे.
बालकांना खेळण्या-बागडण्यासाठी हिंगोली शहरात पालिकेचे बालउद्यान उभे राहिले. नव्यानेच उभ्या राहिलेल्या उद्यानात पूर्वी सुविधा होत्या. त्यामुळे नागरिकांच्याही तक्रारी नव्हत्या. परंतु मागील एक वर्षापासून उद्यानातील सुविधांबाबत नागरिकांच्या तक्रारीही वाढत आहेत. शिवाय परिसर स्वच्छतेबाबतही प्रश्न उभे केले जात आहेत. विशेष म्हणजे चिमुकल्यांच्या खेळणी साहित्यही मोडकळीस आले आहेत. शनिवारी उद्यानात आलेल्या नागरिकांशी ‘लोकमत’ने संवाद साधला. यावेळी नागरिकांनी येथील समस्यांना वाचा फोडली. ते म्हणाले, उद्यान परिसरात पिण्याच्या पाण्याची सुविधा केली आहे. परंतु येथे उपाहारगृहाची सुविधा नाही. त्यामुळे मुलांच्या हट्टापायी उद्यानाबाहेर जाऊन खाद्यपदार्थ आणावे लागतात. त्यामुळे येथे पूर्वीप्रमाणे हॉटेल सुरू झाल्यास गैरसोय होणार नाही. तसेच परिसरात हवी तशी स्वच्छताही नसते. त्यामुळे परिसर स्वच्छ असणे गरजेचे आहे. बाल उद्यानात येणाऱ्या महिलांची स्वच्छतागृहाअभावी कुचंबणा होते. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छतागृह उभे केले पाहिजे, उद्यान परिसरात स्वच्छता आणि तुटफूट झालेल्या खेळण्यांची दुरूस्ती करावी किंवा नवीन खेळणी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी आहे.
चिमुकल्यांचा होतोय हिरमोड...
सुट्टीच्या दिवशी लहान मुले खेळण्यासाठी उद्यानात घेऊन चला असा पालकांकडे हट्ट करतात. परंतु उद्यानात आल्यानंतर खेळण्यांची तूटफुट पाहून चिमुकल्यांचा हिरमोड होत आहे. त्यामुळे उद्यान असूनही याचा नागरिकांना आनंद लुटता येत नाही. उद्यानातील बदकाच्या आकराचे चक्री पाळणे, झोकेही तूटले आहेत. त्यामुळे उद्यानात आल्यानंतर खेळण्यांचे साहित्यच तुटलेले दिसताच चिमुकले निराश होत आहेत. खासगी शाळेतील उद्यानात विविध सुविधा आहेत. परंतु लाखो रूपये खर्च करून उभारलेल्या पालिकेच्या उद्यानात चिमुकल्यांसाठी साधी आवश्यक पुरेशी खेळणी नाहीत. तिकीट दर आकारूनही आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसतील तर पालिका हा पांढरा हत्ती का पोसत आहे? त्यापेक्षा एखादे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारून किस्सा का संपवत नाहीत, अशा उपहासात्मक प्रतिक्रियाही ऐकायला मिळत होत्या.
आकर्षक कारंजे; सीसीटीव्ही कॅमेरे बंद
उद्यानात सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. परंतु काही ठिकाणचे कॅमेरे बंदच आहेत. शिवाय येथील आकर्षक कारंजे बंदच असल्याचे दिसून आले. उद्यानात प्रेमी युगलांना अभय असल्याचे चित्र आहे. उद्यानातील असुविधेमुळे नागरिक दिवसेंदिव उद्यानाकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे येथे प्रेमी युगलांचा वावर वाढत चालल्याचे दिसून येत आहे. अनेकदा दोघांतील वादामुळे त्यामुळे इतरांना त्याचा त्रास होतो. अशावेळी पोलिसांना कळविले जाते. तीन दिवसापूर्वीच पोलिसांनी उद्यानातून प्रेमीयुगलांना ताब्यात घेतले होते.
उद्यानाची वेळ
बाल उद्यान नागरिकांसाठी दररोज सकाळी ९.३० वाजता उघडण्यात येते. तर सायंकाळी ६.३० वाजता उद्यान बंद केले जाते. सोय नसल्याने ते लवकरच बंद होते.
प्रवेश शुल्क पाच रूपये
बाल उद्यानात प्रवेशासाठी पाच रूपये शुल्क आकारला जातो. ऐरवी उद्यानात येणाºयांची संख्या कमी असली तरी सुट्टीच्या दिवशी या ठिकाणी गर्दी असते. उन्हाळ्यात शाळांना सलग सुट्या असतात. त्यामुळे उन्हाळ्यात उद्यानात गर्दीचे चित्र असते. मात्र आता येथील सुविधेवर प्रश्न उभे राहात असल्याने नागरिकांची उद्यानातील गर्दी वाढेल का?
रोपे, वृक्षांची निगा
४पालिकेतर्फे तीन वर्षाला लिलाव पद्धतीने बाल उद्यानाचे टेंडर दिले जाते. त्यामुळे येथील देखरेख करण्याची जबाबदारी संबधित टेंडरधारकावर सोपविली जाते. पालिकेच्या बाल उद्यानातील रोपांची निगा राखली असून वेळेवर वृक्षांना पाणी दिले जाते. कामगारांकडून वृक्षांचे संवर्धन केले जाते.

Web Title:  Hingoli garden facilities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.