गुरुजींच्या बदलीमुळे डोळ्यांच्या धारा खंडेनात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:58 PM2018-06-02T23:58:28+5:302018-06-02T23:58:28+5:30

अनादीकाळापासून गुरूला जीवनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. गुरुला ब्रह्म, विष्णू, महेश उगीच म्हटले नाही. मात्र कलियुगात पगारापुरतेच काम करणारेही काही असल्याने कधी-कधी ते चेष्टेचा विषयही बनतात.

 Guruji's transfer due to the volume of the section | गुरुजींच्या बदलीमुळे डोळ्यांच्या धारा खंडेनात!

गुरुजींच्या बदलीमुळे डोळ्यांच्या धारा खंडेनात!

Next

संतोष भिसे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : अनादीकाळापासून गुरूला जीवनात महत्त्वाचे स्थान राहिले आहे. गुरुला ब्रह्म, विष्णू, महेश उगीच म्हटले नाही. मात्र कलियुगात पगारापुरतेच काम करणारेही काही असल्याने कधी-कधी ते चेष्टेचा विषयही बनतात. औंढा तालुक्यातील गढाळा येथील मुख्याध्यापक उत्तम वानखेडे यांनी शाळाच नव्हे, तर गावही बदलला. आता त्यांच्या बदलीने अख्खे गावच अश्रू ढाळून बदली रोखण्यासाठी वाट्टेल ते करायची दाखवत आहे. मागील तीन दिवसांपासून ग्रामस्थ शाळेसमोर जमत असून काहींच्या डोळ्यांच्या धारा काही खंडत नाहीत, असे चित्र आहे.
गढाळा हे जेमतेम ५०० ते ६०० लोकसंख्येचे गाव आहे. पहिली ते पाचवीपर्यंत जि.प.ची शाळा येथे आहे. संपूर्ण आदिवासी भाग. अल्पभूधारक अथवा भूमिहीनांची संख्या मोठी. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, हे यांच्या गावी नव्हते. कुटुंबियांच्या पोटाची खळगी भरायची तर बाहेरगावी जावेच लागते. यात मुलांच्या शिक्षणालाही फाटा देणे क्रमप्राप्तच. मात्र ही परिस्थिती अचानक बदलली ती बारा वर्षांपूर्वी या शाळेत रुजू झालेल्या उत्तम वानखेडे या शिक्षकाने. ते रुजू झाले अन् ही परिस्थिती पाहून हबकलेच. सेनगाव तालुक्यातील हत्ता येथील शाळेत उपक्रमशील शिक्षक म्हणून नावलौकिक असताना येथे पदरी निराशा पडत होती. गावात शिक्षणाचे तीनतेरा असले तरीही राजकारण मात्र जोमात होते. गुरुजी कुणाच्या घरी चहा घ्यायला गेले तर तोही वादाचा विषय. मात्र यापासून अलिप्त होत वानखेडे यांनी गुणवत्तावाढीकडे लक्ष दिले. त्याचे परिणाम दिसू लागताच ग्रामस्थांच्या मनात वानखेडे गुरुंजींबद्दल आदर वाढला. मग शाळेला राजकारणापासून दूर ठेवून काही विकासाच्या बाबी मांडल्या. तर शाळेत मुक्कामी राहून मुलांचे शिक्षण न बुडविता आई-वडील कामाला जावू शकतात, हे पटवून दिले. एकप्रकारे निवासी शाळाच झाली. मुलांच्या गुणवत्तेची झळाळीही दिसू लागली. नवोदय, विविध क्रीडाप्रकारात मुलांचे नाव होत असल्याने पालकांनीही मुले पूर्णपणे वानखेडे गुरुजींच्या हवाली केली. तेच त्यांचे माय-बाप बनले. त्यांना साथ देण्यास सिद्धेश्वर रणखांब व रोहिणी रणखांब हे जोडपे तेथे आले. त्यानंतर ज्ञानेश्वर पारवे हे शिक्षक तेथे आले. वानखेडे गुरुजींएवढेच त्यांनीही झोकून दिले. मग या ज्ञानमंदिराची ख्याती आजूबाजूच्या गावातही पोहोचली. काहींनी तर शहरातील शाळेतून काढून मुले या शाळेत घातली. शाळेला साथ देताना गावकऱ्यांचीही मने सांधली अन् आज एकोप्याच्या बळावर शाळेवर लाखो रुपये खर्च होत आहेत. शासकीय मदतीची वाटही ग्रामस्थ पहात नाहीत.
...तरीही दुसºया दिवशी हजर
वानखेडे गुरुंजींनी शाळा व गावासाठी काय केले, याची हजारो उदाहरणे सांगता येतील. मात्र त्यांचे वडील वारल्यानंतर त्यांचा अंत्यविधी उरकून गुरुजी दुसºयाच दिवशी शाळेवर हजर झाले, ही आठवण सांगताना महिलांच्या डोळ्यांना धारा लागल्या होत्या. तर वानखेडे गुरुजींची बदली झाल्याची माहिती मिळाली तेव्हापासून महिलांनी चुलीच पेटविल्या नाहीत.
शिस्तही करडी
गुरुजींचा स्वभाव लोण्याच्या गोळ्यासारखा मऊ ; मात्र शिस्त तेवढीच करडी. मुले तर व्यसनापासून दूर राहतील. मात्र त्यांचे पालकही दूर राहावे म्हणून मुलांना दुकानावरुन तंबाखू किंवा पुडी, बिडी, सिगारेट आणायला सांगितल्यास तो आणणार नाही, ही शिकवण दिली. जर कोणी दबावच आणला तर दिलेल्या रक्कमेतून अर्ध्याची बिस्किटे व अर्धी रक्कम शाळेला दिली जाते.
कटू अनुभवही
सुरुवातीला गुरुजींच्या निवासी शाळेची खिल्ली उडवली जायची. काहींनी हा उपक्रम बंद पाडण्याचेही प्रयत्न केले. सकाळी ४ वा. उठून अभ्यास, सहा वाजता व्यायाम, सात वाजता जेवण याचा उपहास केला जायचा. मात्र विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची चुणूक टीकाकारांची तोंडे बंद करायला कामी आली. कोणताही विषय असो विद्यार्थी मागे सरणार नाही, असा शिक्षणाचा दर्जाही मात्र त्यासाठी राखावा लागला.
शाळेतच बनविले मंत्रालय
येथील शाळेत मंत्रालय बनविले असून, विद्यार्थ्यांची निवड केली. यामध्ये पंतप्रधान युवराज फोले, कामकाज मंत्री जीवन थोरात, पाणीपुरवठा मंत्री श्यामल थोरात, तंत्रज्ञान मंत्री वैभव थोरात, घंटामंत्री विनोद जोजार अशी पदे दिली. तर त्यांच्याही हाताखाली कामकाज पाहण्यासाठी चार- चार मुले दिली. यात शाळेच्या सफाईसह खुर्च्या धुणे आदी कामकाजाचे नियोजन करुन दिल्याचेही विद्यार्थ्यांनी सांगितले.
पहिल्यांदाच कुलूप
एका चॅनलच्या नावाप्रमाणे २४ तास शाळा असेच शाळेचे नामकरण केले. आजही या ठिकाणी एकदाही कुलूप लावलेले नाही. मात्र आता गुरुजींच्या बदलीमुळे शाळेला पहिल्यांदाच कुलूप लावले आणि ते परतल्यावरच कुलूप उघडू अन्यथा आम्ही शाळाच बंद करणार असल्याचे ग्रामस्थ पोटतिडकीने सांगत होते.
एकास हृदयविकाराचा धक्का
येथील ग्यानदेव असोले यांना गुरुजींची बदली झाल्याची माहिती मिळताच त्यांना हृदविकाराचा झटका आला. त्यांच्यावर हिंगोलीत उपचार सुरु आहेत. इतरही दोन ते तीन ग्रामस्थ अजूनही हैराण आहेत. वानखेडे गुरुजीच या मुलांचे खरे मायबाप आहेत, त्यांच्या बदलीमुळे या मुलांचे कसे, या भावनेतून ग्रामस्थांची व्याकुळता वाढीस जात आहे. ग्रामस्थ जे गावात येतील त्यांच्याकडे गुरुजींची मागणी करत आहेत.
आज गुणवत्ता सिद्ध करून आठ ते दहा मुले विविध ठिकाणी नवोदयला गेली आहेत. तर विविध क्रीडा स्पर्धांतही मुले चमकत आहेत. सोनाजी पोटे हा धावपटू औरंगाबाद येथील क्रीडाप्रबोधिनीत आॅलिम्पिक पात्रता फेरीसाठी तयारी करत आहे. वादविवादसह अनेक शालेय स्पर्धांत ही मुले मेडलवर मेडल मिळवत
आहेत. परमेश्वर पोटे हा पुणे येथे क्रीडाप्रबोधिनीत हॉकी संघाचा कर्णधार आहे.नवोदयसाठी सहा मुले पात्र ठरली. तर शिष्यवृत्तीधारक चार मुले आहेत. मुलांचा शैक्षणिक कल व विषय कल पाहून पाचवीनंतरही त्याची काळजी वानखेडेगुरुजी घेतात.
वानखेडे गुरुजींची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आता आक्रमक होत असल्याचे दिसून येत आहे. तेच शिक्षक न मिळाल्यास शाळाच बंद ठेवण्याचा इशारा देत आहेत.

Web Title:  Guruji's transfer due to the volume of the section

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.