पाच वेळा दृश्यम पाहून आई-वडिलांसह भावाचा काढला काटा; अपघाताचा बनाव उघडकीस

By चंद्रमुनी बाबूराव बलखंडे | Published: January 15, 2024 05:23 PM2024-01-15T17:23:47+5:302024-01-15T17:24:37+5:30

मुलगाच निघाला मारेकरी; प्रारंभी दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज होता.

Father-Mother and Brother killed after watching Drishyam movie five times; incident in Hingoli | पाच वेळा दृश्यम पाहून आई-वडिलांसह भावाचा काढला काटा; अपघाताचा बनाव उघडकीस

पाच वेळा दृश्यम पाहून आई-वडिलांसह भावाचा काढला काटा; अपघाताचा बनाव उघडकीस

हिंगोली : दुचाकी अपघातात आई-वडिलांसह भावाचा मृत्यू झाल्याचा बनाव करणाऱ्या आरोपीने तिघांचा खून करण्यापूर्वी पाच वेळा दृश्यम चित्रपट पाहिला. यातूनच त्याला तिघांचा खून करण्याची कल्पना सूचली. ही घटना तालुक्यातील डिग्रस वाणी शिवारात ११ जानेवारी रोजी उघडकीस आली होती. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून आणखी कोणी यात सहभागी आहे का? याचा तपास करीत आहेत.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील डिग्रसवाणी शिवारात एका नालीत ११ जानेवारी रोजी दुचाकीसह कुंडलिक श्रीपती जाधव (वय ७०), कलावती कुंडलिक जाधव (वय ६०) व आकाश कुंडलिक जाधव (वय २७ तिघे रा. डिग्रस वाणी) या तिघांचे मृतदेह आढळून आले होते. यात बासंबा पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून तपास सुरू केला. प्रारंभी दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज होता. मयत कुंडलिक जाधव यांचा दुसरा मुलगा  आरोपी महेंद्र जाधव याने सुद्धा हॉस्पीटलला जाताना तिघांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला असावा, अशी माहिती बासंबा पोलिसांना दिली.

पोलिसांनी महेंद्र जाधव यास अधिक माहिती विचारली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्याच्या बोलण्यावरून त्याचेविषयी संशय बळावला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तपासासाठी रवाना केले. पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, बासंबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी यांच्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली. पथकाने घटनास्थळी व मयतांच्या घरी भेट देवून पाहणी केली. यावेळी घरात एका ठिकाणी रक्ताचा डाग आढळून आला. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असल्याची खात्री पोलिसांना झाली. त्यावरून पथकाने महेंद्र जाधव यास चौकशीसाठी ताब्यात घेत पोलिसी खाक्या दाखविला. यात त्याने तिघांचा खून करून अपघाताचा बनाव केल्याची कबुली दिली.  

दृश्यम चित्रपटातून सूचली कल्पना
आई-वडिल व भाऊ हे पैसे देत नव्हते. नातेवाईकांमध्ये बदनामी करतात याचा महेंद्र जाधव याच्या मनात राग होता. यातूनच त्याने तिघांनाही संपविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने दृश्यम चित्रपट पाच वेळा पाहिला. तसेच क्राईम पेट्रोल मालिकाही पाहिली. यातूनच खून कसा करावा, याची त्याला कल्पना सूचल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. 

असा काढला काटा
९ जानेवारी रोजी आरोपी महेंद्र याने भाऊ आकाश जाधव यास झोपेच्या गोळ्या दिल्या. त्यानंतर त्यास विजेचा शॉक देवून डोक्यात रॉड मारून खून केला. त्याच रात्री मृतदेह गावाजवळील रोडलगत नाल्यात टाकला. त्यानंतर १० जानेवारी रोजी दुपारी आई कलावती जाधव यांना झोपेच्या गोळ्या देवून शेतात नेले. तेथे डोक्यात रॉड घालून खून केला व मृतदेह रोडलगत आकाश जाधव याच्या मृतदेहाशेजारी टाकला. परत घरी येऊन मध्यरात्री वडिलांना सुद्धा झोपेच्या गोळ्या देवून डोक्यात रॉड मारून त्यांचा खून केला. वडिलाचा मृतदेह दुचाकीवर टाकून आई व भावाच्या जवळ दुचाकीसह टाकून दिला. कोणाला संशय येऊ नये म्हणून दुचाकीचे हेडलाईट फोडून अपघात झाल्याचा बनाव केल्याचे आरोपी महेंद्र जाधव याने पोलिसांना सांगितले.  

विकास पाटील, शिवसांब घेवारे, विलास चवळी यांची विशेष कामगिरी
पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली तिहेरी खून प्रकरणाचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विकास पाटील, सहायक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे, बासंबा ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक गुलाब खरात, पोलिस अंमलदार नानाराव पोले, बाबाराव धाबे, राहूल तडकसे, उमर शेख, राजू ठाकूर, नितीन गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, आझम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने विशेष कामगिरी केली. 

झोपेच्या गोळ्या देणारे टार्गेटवर
आरोपी महेंद्र याने झोपेच्या गोळ्या वाशिम येथून आणल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार झोपेच्या गोळ्या देणारे डॉक्टर व मेडिकल चालक पोलिसांच्या रडारवर आहेत. तसेच या घटनेत आणखी कोणी सहभागी आहेत का? याचाही तपासही पोलिस करीत आहेत.

Web Title: Father-Mother and Brother killed after watching Drishyam movie five times; incident in Hingoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.