मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल

By विजय पाटील | Published: March 20, 2024 06:22 PM2024-03-20T18:22:14+5:302024-03-20T18:22:35+5:30

समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता.

Extreme step taken by youth in Malselu to demand Maratha reservation | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माळसेलू येथे युवकाने उचलले टोकाचे पाऊल

हिंगोली : तालुक्यातील माळसेलू येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी एका तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. हा प्रकार १९ मार्च रोजी रात्री उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली तालुक्यातील माळसेलू येथील विलास श्रीराम वामन (वय २८) हा पदवीधर असून, काही दिवसांपासून तो एका खासगी रुग्णालयात काम करीत होता. मराठा आरक्षणाच्या आंदोलनात तो सक्रिय होता. समाजाला आरक्षण मिळत नसल्याने तो मागील काही दिवसांपासून अस्वस्थ होता.

दरम्यान, १९ मार्च रोजी दुपारी चार वाजता तो वडिलांना हिंगोली तालुक्यातील कडतीफाटा येथे सोडण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नाही. त्याचे वडील रात्री घरी आल्यानंतर विलास घरी आलाच नसल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी तसेच ग्रामस्थांनी त्याचा शोध सुरू केला. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्याची दुचाकी शेतात आढळून आली. त्यानंतर परिसरात पाहणी केली असता त्याचा मृतदेह एका झाडाला गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक विजय रामोड, जमादार अनिल डुकरे, आकाश पंडीतकर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने विलास याचा मृतदेह खाली काढला. त्याच्या खिशात मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करीत असल्याची चिठी आढळून आली आहे. दरम्यान, मयत विलास याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.

Web Title: Extreme step taken by youth in Malselu to demand Maratha reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.