अबब ! जिल्हा परिषद शाळेत भरली सापांची शाळा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2018 12:14 PM2018-07-13T12:14:01+5:302018-07-13T13:18:27+5:30

वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये चक्क 60 साप आढळून आले.

Amazing! School of Zilla Parishad from vasmat filled with snakes | अबब ! जिल्हा परिषद शाळेत भरली सापांची शाळा 

अबब ! जिल्हा परिषद शाळेत भरली सापांची शाळा 

Next
ठळक मुद्दे पांगरा बोखारे येथील शाळेच्या किचनमध्ये आढळले चक्क 60 साप 

- प्रा. गंगाधर भोसले

वसमत( हिंगोली ) : वसमत तालुक्यातील पांगरा बोखारे येथील जिल्हा परिषद शाळेच्या किचनमध्ये चक्क 60 साप आढळून आले. या घटनेने घाबरून न जाता तेथील शिक्षक आणि ग्रामस्थांनी सर्पमित्राच्या सहकार्याने घोणस जातीच्या सापासह 60 पिल्लांना जीवदान दिले.

साप म्हटलं की अंगावर काटा येतो, मनात धडकी भरते तर सापाचे नाव काढले तरी अनेकांची बोबडी वळते़. एकदोन नाहीतर चक्क 60 साप एकाच ठिकाणी आढळून आल्यावर काय परिस्थिती निर्माण होईल, याचा अनुभव पांगारा बोखारे येथील शिक्षक आणि रहिवाशांनी घेतला. येथील जिल्हा परिषद शाळेत एवढ्या मोठ्या प्रमाणात सापांची पिल्लं आणि एक साप आढळून आल्यानंतर अनेकांना घाम फुटला.

घाईगडबडीत काही जणांनी साप मारण्यासाठी लाकडं, दगडं आणली. परंतु मुख्याध्यापक त्र्यंबक भोसले आणि भिमराव बोखारे यांच्यासह काही ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन साप न मारण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर वसमत येथील सर्पमित्र विक्की दयाळ आणि त्यांचा सहकारी बाळासाहेब भालेराव यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावण्यात आले. तोपर्यंत सापांनी बनवलेले घर पाहण्यासाठी सारा गाव जिल्हा परिषद शाळेत पोहोचला होता. दरम्यान, सर्पमित्रांनी दोन तास परिश्रम घेत साप बाटलीबंद केले. ग्रामीण भागात साप आढळणे ही फार मोठी गोष्ट नाही ,परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणात साप आढळून येणे आणि तेही शाळेत ही तालुक्यातील नव्हे तर जिल्ह्यातील पहिली घटना असावी, अशी चर्चा परिसरात रंगली होती. दरम्यान मोठ्या शिताफीने सर्प मित्रांनी साप आणि त्याच्या पिलांना पकडले. सर्पमित्रांच्या या धासी कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले.  
 

अत्यंत विषारी साप 
भारतातल्या चार प्रमुख सापांपैकी तिसरा जहाल विषारी साप असलेल्या घोणसाला इंग्लिशमध्ये 'रसेल्स व्हायपर' म्हणतात. संपूर्ण देशभर आढळणारा हा साप कमालीचा तापट आणि चिडका असतो. सहा फुटांपर्यंत वाढणारा हा घोणस साप दुर्मिळ आढळून येतो. 

"ही घोणस जातीच्या सापाची मांदी एका वेळी तिन दिवसांत 80 पिल्लांना जन्म देते तसेच ही पिल्ल जन्मानंतर लगेच सरपटायला लागतात "अशी माहिती सर्पमित्र विक्की दयाळ यांनी दिली.

मादीच्या पोटात असतात अंडी 
घोणस हा विषारी साप असून तीन ते पाच फूटापर्यंत त्याची लांबी असते. मानवी वस्तीच्या आसपास त्याचे वास्तव्य असते, मात्र तो सहसा घरांमध्ये प्रवेश करीत नाही. मे ते जुलै हा त्यांचा प्रजनन काळ असून एकावेळेला घोणस ६ पासून ९६ पर्यंत पिलांना जन्म देते. सापाची पिले अंडय़ातून जन्माला येतात. मात्र घोणस जातीच्या सापामध्ये अंडी मादीच्या पोटातच असतात. ती बाहेर टाकली जात नाहीत. तर पोटातच पिलाचा जन्म होऊन ते बाहेर पडते. कात्रजच्या सर्प उद्यानात घोणसने ७० ते ७२ पिलांना जन्म दिल्याच्या नोंदी आहेत. घोणस साप विषारी असला तरी सहसा तो थेट हल्ला करीत नाही. मात्र आपल्याला धोका आहे असे वाटल्यास प्रेशर कुकरच्या शिट्टीसारखा तो आवाज करतो. रात्रीच्या वेळी हा साप जास्त सक्रीय असतो, अशी माहिती एका सर्पमित्राने दिली

Web Title: Amazing! School of Zilla Parishad from vasmat filled with snakes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.