रेन वॉटर हार्वेस्टिंगला आधाराची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 10:08 PM2019-06-11T22:08:26+5:302019-06-11T22:09:07+5:30

योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे.

Support for Rain Water Harvesting | रेन वॉटर हार्वेस्टिंगला आधाराची गरज

रेन वॉटर हार्वेस्टिंगला आधाराची गरज

googlenewsNext
ठळक मुद्देलोक चळवळीसाठी हवाय पुढाकार : जिल्हा प्रशासनाने दखल घ्यावी

कपिल केकत।
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : योग्य नियोजनाअभावी दरवर्षी वाढतच चाललेली पाण्याची टंचाई येणारा काळ किती कठीण याची प्रचिती दाखवून देत आहे. आपल्या पूर्वजांनी केलेल्या नियोजनाचे फलीत आहे की आजच्या पिढीला पुरेसे पाणी मिळत आहे. त्यामुळे उद्याच्या पिढीसाठी पाणी राखून ठेवयाचे असेल तर आजच नियोजन करण्याची आवश्यकता असल्याचे जलतज्ज्ञ सांगत आहेत. अशात जल संवर्धनासाठी पावसाचे पाणी अडवून ठेवणे गरजेचे असून यावर रेन वॉटर हार्वेस्टिंग हाच एकमेव पर्याय आहे.
सध्या अवघ्या देशालाच पाणी टंचाईची झळ सहन करावी लागत आहे. दरवर्षी पाणी टंचाईची समस्या अधिकाधिक गंभीर होत चालली आहे. यावर दरवर्षी काहीतरी उपाय करण्याबाबत बोलले जाते, मात्र प्रत्यक्षात काहीच केले जात नाही. परिणामी पाणी दरवर्षी रडवू लागले आहे. पाण्याची निर्मिती शक्य नाही. मात्र पावसाचे पाणी अडवणे व जिरवणे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे आज हे सूत्र अंमलात आणण्याची गरज आहे. पावसाचे पाणी जमिनीत मुरायला शंभर वर्षांहून अधिक काळ लागतो. म्हणजेच, आज आपण वापरत असलेले पाणी कित्येक वर्षांपूर्वीचे असून ही आपल्या पूर्वजांची पुण्याई आहे.त्यांच्या नियोजनामुळे आज आपल्या पाणी मिळत असून आपण त्याचा नियोजनशून्यपणे वापर करीत आहोत. आज पाणी मिळत असले तरी उद्याच्या पिढीसाठी आपण आज पाण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. अशात पावसाचे पाणी अडवून त्याला जमिनीत मुरविण्याशिवाय दुसरा उपाय नाही.
परिणामी, रेन वॉटर हावेस्टींग हाच एकमेव यावर पर्याय आहे. त्यामुळे नागरिकांनी आतापासूनच पाण्याचे नियोजन केल्यास उद्याच्या पिढीला पाणी मिळणार. यासाठी सर्वांनी रेन वॉटर हार्वेस्टींगसाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
वर्धा नगर पालिकेचा स्तुत्य उपक्रम
खोलवर जात असलेली पाण्याची पातळी व पाणी टंचाईच्या समस्येचे गांभीर्य लक्षात घेत वर्धा नगरपालिकेने सावधानतेचा पवित्रा घेतला आहे. पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नगर परिषदेने कंबर कसली असून पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात जिरविण्यावर जोर दिला जात आहे. यात शहरवासीयांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याने त्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी नगर परिषदेने मालमत्ता करात दोन टक्के सवलत देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. नगर परिषदेनेही असाच उपक्रम हाती घेतल्यास गोंदियात त्यांचे चांगले परिणाम बघता येणार यात शंका नाही. एवढेच नव्हे तर जिल्हा प्रशासनानेही पुढाकार घेण्याची गरज आहे.
दंडात्मक कारवाईची गरज
शहरासह जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ बसत आहे. अशात प्रशासनाकडून पाण्याचा जपून करण्याबाबत आवाहन केले जात आहे. असे असतानाही मात्र कित्येकांकडून मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय केला जात आहे.मात्र सामान्य नागरिक यावर काहीच करू शकत नाही. अशात जिल्हा प्रशासनाने विशेष फिरते पथक गठीत करून अशा प्रकारांवर नजर ठेवण्याची गरज आहे. पाण्याचा अपव्यय करताना कुणीही दिसल्यास त्याला लगेच दंड आकारल्यास नक्कीच अशांना पाण्याचे मोल कळणार असेही सुज्ञ नागरिक बोलत आहेत.

Web Title: Support for Rain Water Harvesting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.