जिल्ह्यात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2018 09:21 PM2018-09-06T21:21:47+5:302018-09-06T21:22:52+5:30

विदर्भात स्क्रब टायफस आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. नागपुरात या आजाराने आत्तापर्यंत तीन ते चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यानंतर जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन गावात स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Scrub typhus was found in the district | जिल्ह्यात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळला

जिल्ह्यात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळला

Next
ठळक मुद्देसंशयित रुग्णांचा शोध सुरू : आरोग्य केंद्रांना औषधाचा पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : विदर्भात स्क्रब टायफस आजाराने पाय पसरण्यास सुरूवात केली आहे. नागपुरात या आजाराने आत्तापर्यंत तीन ते चार रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यानंतर जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील बोंडगाव सुरबन गावात स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याला उपचारासाठी नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्हा आरोग्य विभागाने सुध्दा दुजोरा दिल्याने स्क्रब टायफस आजाराने जिल्ह्यात प्रवेश केल्याने जिल्हावासीयांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
बोंडगाव सुरबन येथील एका १७ वर्षीय मुलीला १५ दिवसांपूर्वी ताप आला होता. दरम्यान तिला डोखेदुखी, मळमळ, हातपाय दुखणे आदीचा त्रास होत असल्याची लक्षणे आढळली. त्यानंतर तिला गोठणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र तिथे काहीच निष्पन्न न झाल्याने तिला नवेगावबांध येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रुग्णांकडे दुर्लक्ष केल्याने तिला ब्रम्हपुरी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तिची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने डॉक्टरांनी तिला नागपूर येथे दाखल करण्याचा सल्ला दिला. नागपूर येथे तिच्या रक्ताचे नमुने तपासणी केले असता तिला स्क्रब टायफस आजाराची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. सध्या तिच्यावर नागपूर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे. सदर मुलीला स्क्रब टायफसची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर स्थानिक आरोग्य प्रशासनात खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाने तातडीने बोंडगाव सुरबन येथील नागरिकांच्या रक्ताचे नमुणे तपासण्यास सुरूवात केली आहे.
जिल्हा आरोग्य विभागाला माहिती द्या
जिल्ह्यात स्क्रब टायफसचा रुग्ण आढळल्यानंतर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संशयित रुग्णांची तपासणी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहे. तसेच डॉक्सी सॉयक्लीन या स्क्रब टायफसवरील औषधांचा पुरवठा सर्व ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्राने केला. या आजाराचा संशयिता रुग्ण आढळल्यास त्वरीत याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाला देण्याचे निर्देश दिले आहे.
धानपिकांमुळे सर्वाधिक धोका
गोंदिया जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे उत्पादन घेतले जाते. स्क्रब टायफस हा आजार प्रामुख्याने धानपिकांवरील किटकांच्या चाव्यांमुळे होतो. त्यातच या आजाराने आता जिल्ह्यात शिरकाव केल्याने नागरिकांना काळजी घेण्याची गरज आहे. या आजाराची लक्षणे दिसताच वेळीच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जावून उपचार घ्यावा.
जनजागृतीचा अभाव
स्क्रब टायफस आजाराने विदर्भात शिरकाव केल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात या आजाराविषयी जनजागृती मोहीम सुरू केली होती. तसेच आजाराची कोणती लक्षणे आहेत, नागरिकांनी कोणती काळजी घ्यावी याची माहिती दिली. मात्र जिल्ह्यात जनजागृती मोहीमेचा अभाव दिसून आला.

जिल्ह्यातील बोंडगाव सुरबन येथे स्क्रब टायफसचा एक रुग्ण आढळला असून त्याच्यावर नागपूर येथे उपचार सुरु आहे. या पार्श्वभुमिवर संशयीत रुग्ण तपासण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. तसेच सर्व आरोग्य केंद्राना डॉक्सी सॉयक्लीन या औषधाचा पुरवठा करण्यात आला असून उपाय योजना सुरू केल्या आहेत.
- श्याम निमगडे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

Web Title: Scrub typhus was found in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य