क्रीडांगण बनले वाहनतळ अन् गोठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:35 AM2019-03-24T00:35:03+5:302019-03-24T00:35:52+5:30

ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडांगण उपलब्ध करुन देऊन त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून जिल्हा आणि तालुकास्तरावर क्रीडागंण तयार केले.

Playgrounds become vehicles and cottages | क्रीडांगण बनले वाहनतळ अन् गोठा

क्रीडांगण बनले वाहनतळ अन् गोठा

Next
ठळक मुद्देखेळाडूंची अडचण : क्रीडा विभाग झोपेत, प्रवेशद्वारासमोर बांधली जातात जनावरे

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडांगण उपलब्ध करुन देऊन त्यांच्यातील क्रीडा गुणांचा विकास करण्यासाठी शासनाने लाखो रुपये खर्चून जिल्हा आणि तालुकास्तरावर क्रीडागंण तयार केले. मात्र क्रीडा विभागाच्या अनागोंदी कारभारामुळे या क्रीडागंणाचा वापर वाहनतळ आणि जनावरांना बांधण्यासाठी केला जात असल्याचा प्रकार गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथे उघडकीस आला आहे.
गोरेगाव तालुक्यातील हिरडामाली येथे जिल्हा क्रीडा विभागाने क्रीडा संकुल तयार केले आहे. या क्रीडा संकुलावर या परिसरातील ३० ते ४० खेळाडू व्हॉलीबाल व इतर खेळांचा सराव करतात. मात्र मागील काही महिन्यांपासून क्रीडा विभागाने या ठिकाणी एका चौकीदाराची नियुक्ती केली आहे. हा चौकीदार क्रीडांगणावर सराव करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंशी असभ्य वर्तणूक करीत असल्याचा आरोप खेळाडूंनी केला. सदर चौकीदारावर फौजदारी गुन्हे सुध्दा दाखल असून क्रीडा विभागाने यानंतरही त्याची नियुक्ती कशी केली हे एक कोडेच आहे.क्रीडागंणावर दररोज सराव करण्यासाठी येणाऱ्या खेळाडूंनी याची तक्रार तालुका क्रीडा अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्याकडे केली. मात्र त्यांनीच कुठलीच कारवाही केली नाही. त्यामुळे या खेळाडूंनी पुन्हा जिल्हाधिकारी, तहसीलदार व स्थानिक ग्रामसेवकाकडे लेखी तक्रार करुन कारवाही करण्याची मागणी केली. मात्र चौकीदारावर अद्यापही कुठलीही कारवाही करण्यात आली नाही. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी क्रीडा विभागाचे कार्यालय आहे त्याच्यासमोरच जनावरांना बांधले जाते. तर चौकीदार आपल्या मर्जीने क्रीडांगणाचा वापर खासगी वाहनाने उभी ठेवण्यासाठी करीत आहे. त्यामुळे क्रीडागंणाचा वापर खेळाडूंसाठी कमी आणि वाहनतळासाठी अधिक होत आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार तालुका क्रीडा अधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर सुरू असताना सुध्दा कुठलीच कारवाही करण्यात आली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अनेक अनागोंदी कारभार पुढे येत असताना आता हिरडामाली येथील नवीनच प्रकार उघडकीस आल्याने या विभागाची पुन्हा पोलखोल झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी खेळाडूंनी केलेल्या तक्रारीची दखल घेवून कारवाही करणार का याकडे लक्ष लागले आहे.
खेळाडूंचे नुकसान
हिरडामाली येथील क्रीडागंणावर खेळाडू पहाटे व सायंकाळी सराव करण्यासाठी दररोज जातात. यात तरुणीेंचा सुध्दा समावेश आहे. मात्र चौकीदार त्यांना शिवीगाळ करीत असून त्याच्यावर कुठलीच कारवाही करण्यात आली नाही. त्यामुळे बऱ्याच खेळाडूंनी सराव करण्यास जाणे बंद केले आहे. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान होत आहे.
कारवाई करण्यास कुचराई का
हिरडामाली येथील क्रीडा संकुलावर वाहने सर्रासपणे उभी ठेवली जातात. क्रीडा संकुलाच्या प्रवेशद्वारासमोरच जनावरे बांधली जातात.याचे पुरावे सुद्धा खेळाडूंनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना देऊन सुद्धा याप्रकरणी कारवाई करण्यास क्रीडा विभाग का कुचराई करीत आहे हे मात्र न उलगडणारे कोडेच आहे.
जिल्हा क्रीडा विभागही वाऱ्यावर
तालुकाच नव्हे तर जिल्हा क्रीडा विभागाचा सुध्दा अनागोंदी कारभार पुढे येत आहे. अद्यापही जिल्हा क्रीडा अधिकाऱ्याचे पद रिक्त असून प्रभारी अधिकाऱ्यावर कामकाज चालविले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंचे सुध्दा नुकसान होत आहे.

Web Title: Playgrounds become vehicles and cottages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.