मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सत्तांतरनंतर राजकीय चर्चेला उधाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2022 04:33 PM2022-07-02T16:33:31+5:302022-07-02T16:38:39+5:30

आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके यापैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

MLA Vijay Rahangdale, Vinod Agarwal, Parinay Phuke, which of the following will won the ticket for Ministerial | मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सत्तांतरनंतर राजकीय चर्चेला उधाण

मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सत्तांतरनंतर राजकीय चर्चेला उधाण

googlenewsNext
ठळक मुद्देभाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, मुंबईकडे लक्ष

गोंदिया : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी राजीनामा दिल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या. शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची तर भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यानंतर शिंदे मंत्रिमंडळात कोणाला संधी मिळते याची चर्चा सुरू आहे. भाजपकडून कुणाला संधी दिली जाणार याची चर्चा आहे. आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल, परिणय फुके यापैकी कुणाला मंत्रिपदाची लॉटरी लागते याकडे जिल्हावासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडीच वर्षांतच कोसळले. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातून कुणालाच संधी मिळाली नव्हती. पालकमंत्री सुद्धा बाहेरचा देण्यात आला होता. त्यामुळे जिल्हावासीयांमध्ये नाराजीचा सूर होता. जिल्ह्यातील आमदाराला मंत्री केल्यास जिल्ह्यातील प्रश्न अधिक प्रभावीपणे मार्गी लावता येतील, असा सूर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे भाजप मंत्रिमंडळ स्थापन करताना या गोष्टीचा विचार करण्याची शक्यता आहे. आ. विजय रहांगडाले, विनोद अग्रवाल व परिणय फुके यांच्यापैकी नेमकी कुणाला संधी मिळते हे महत्वपूर्ण ठरणार आहे.

माजी पालकमंत्री परिणय फुके हे फडणवीस यांच्या जवळचे समजले जातात. त्यामुळे या नवीन सरकारमध्ये फुके यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तिरोडा विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांना मंत्रिमंडळात अथवा महामंडळावर नियुक्ती दिली जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. मात्र, याबाबतचा निर्णय भाजपचे वरिष्ठ नेते घेणार आहेत. या सर्व घडामोडींमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नगर परिषद निवडणुकांवर होणार परिणाम

राज्यातील सत्तातंराचे परिणाम जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या नगर परिषद निवडणुकांवर होण्याची शक्यता आहे. सत्तांतरामुळे भाजपच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, या निवडणुकांसाठी आता ते अधिक जोमाने कामाला लागण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीच्या गोटात शांतता

राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये शांतता आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या सर्व घडामोडींवर कुठलेही भाष्य न करता वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यानुसार काम करणार असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे जो आदेश देतील त्याचे पालन करू

महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील नवीन सरकार स्थापन होणार असल्याने राज्यात नवीन समीकरणाला सुरुवात होणार आहे. याच पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे समर्थक शिवसैनिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यासंदर्भात शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्क प्रमुख मुकेश शिवहरे यांना विचारणा केली असता पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो मान्य राहील, असे सांगितले.

Web Title: MLA Vijay Rahangdale, Vinod Agarwal, Parinay Phuke, which of the following will won the ticket for Ministerial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.