Gondia's 16th Raking in Amrit City Scheme | अमृत शहर योजनेत गोंदियाला १६ वे रॅकिंग

ठळक मुद्दे११०० नागरिकांनी डाऊनलोड केले स्वच्छता अ‍ॅप : केंद्राची चमू करणार निरीक्षण

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : राज्य सरकारने १ लाख लोकसंख्येवरील शहरांचा समावेश अमृत शहर योजनेत केला. या शहरांमध्ये शुध्द पाणी, स्वच्छता आणि इतर दर्जेदार सुविधा देणाºया नगर परिषद आणि महानगरपालिकांना रॅकिंग दिले. यात गोंदिया शहराला १६ वे रॅकिंग प्राप्त झाले आहे.
गोंदिया शहराची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १ लाख ३२ हजार ८१३ आहे. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने १ लाख लोकसंख्येवरील शहरात शुध्द पाण्याची व्यवस्था,पाणी पुरवठ्याच्या सोयी आणि स्वच्छता व्यवस्थेत सुधारण्यासाठी अमृत शहर योजना सुरू केली. या सर्व सुविधांचे निरीक्षण करुन त्या शहरांना रॅकिंग दिले जात आहे.
नगर विकास विभागाचे राज्यातील विविध महानगर पालिका आणि नगर परिषदेची रॅकिंगची यादी नुकतीच जाहीर केली. यात गोंदिया शहराला १६ रॅकिंग मिळाले. त्यामुळे गोंदिया शहराला पाणी पुरवठा योजना व स्वच्छतेकरिता अतिरिक्त निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्र सरकारने ४ जानेवारीपासून स्वच्छता सर्वेक्षणाला २०१८ सुरूवात केली आहे. यातंर्गत काही दिवसात केंद्र सरकारची एक चमू शहराचे सर्वेक्षण करण्यासाठी येणार आहे. नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागृत करण्यासाठी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याची मोहीम सुरू केली होती. यातंर्गत स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करणाºया नागरिकांच्या संख्येवरुन रॅकिंग देण्यात आले.
यात गोंदिया नगर परिषदेला मंगळवारी (दि.२) ११३ वे रॅकिंग जाहीर करण्यात आले. एकूण लोकसंख्येच्या दीडपट लोकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करणे अनिवार्य आहे. नगर परिषद कर्मचाºयांनी मागील काही दिवसांपासून स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड करण्याची मोहीम सुरू केली आहे.
आतापर्यंत शहरातील ११७३ नागरिकांनी स्वच्छता अ‍ॅप डाऊनलोड केले आहे. याच आधारावर शहराला यामध्ये ११३ वे रॅकिंग मिळाले आहे. नगर परिषदेने शहरात स्वच्छता विषयक मोहीम राबविण्यासाठी आत्तापर्यंत कोणत्या उपाय योजना केल्या याची माहिती नगर विकास मंत्रालयाने मागविली होती.
त्या आधारावर नगर परिषदेला १६३० पैकी ११८९ गुण प्राप्त झाले आहे. स्वच्छता अ‍ॅपच्या माध्यमातून नगर परिषदेला ४ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहे. या तक्रारींचे निवारण करण्याचे काम नगर परिषदेने सुरू केले आहे.