ठळक मुद्दे१० वर्षांपासून योजना बंद मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश

मोहन भोयर ।
आॅनलाईन लोकमत
तुमसर : पाणी हे जीवन असले तरी कोट्यवधी रूपयांची देव्हाडी पाणी पुरवठा योजना मागील ८ ते १० वर्षांपासून धूळखात पडून आहे. महाराष्ट जीवन प्राधिकरण विभागाने देव्हाडी येथील पाणी पुरवठा योजना पुनर्जिवीत करून त्याचा मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश करण्यात आला आहे. प्रत्यक्षात ही योजना कार्यान्वित होणार की भंगारात जमा होणार असा प्रश्न पडला आहे.
सुमारे ८ ते १० वर्षापूर्वी तीन कोटी रूपये खर्च करुन दहा गावाकरिता ही योजना महाराष्टजीवन प्राधीकरणने पूर्ण केली. सन २००३-०४ मध्ये ही योजना पूर्ण झाली. देव्हाडी, ढोरवाडा, चारगाव, हिंगणा, हसारा, खापा, परसवाडा (दे), तुडका, तामसवाडी आदी गावाकरिता ही योजना आहे. योजना पुर्णत्वास आल्यानंतर १० वर्षांपासून बंद आहे. योजना पूर्णत्वास आल्यानंतर ती चालवणार कोण असा प्रश्न उपस्थित झाला होता.
जिल्हा परिषदेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे ही योजना बंद स्थितीत होती. या योजनेत लाभ घेणाऱ्या गावांनी शिखर परिषद तयार करून पाणीपट्टी वसूली करून ही योजना चालविण्याचा अधिकार संबंधित गावांना देण्यात आला, परंतु आमदनी अठण्णी व खर्चा रूपय्या अशी या योजनेची स्थिती असल्याने येथे कुणीही तसा प्रयत्न केला नाही. सर्वच अपवाद वगळता ग्रामपंचायतीच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. त्यामुळे या योजनेकडे दुर्लक्ष करण्यात आले.
या योजनेची पाईपलाईन गळती, नविन पाईपलाईन घालणे, लिकेज दुरुस्ती करणे, पंप दुरुस्ती करणे येथे करण्याची गरज आहे.
सन २०१४-२०१५ मध्ये तशी कामे करण्यात आली. मुख्यमंत्री पेयजल योजनेत ३१ डिसेंबर २०१६ मध्ये समावेश करण्यात आला. तसे प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. जिल्हा स्तरावर पाणीपूरवठा योजनेचे स्वतंत्र कार्यालय असून अभियंते व इतर कर्मचारी आहेत.
यासंदर्भात संबंधित विभागाचे उपविभागीय अभियंता ए. जी. जिभकाटे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
मुख्यमंत्री पेयजल योजनेत समावेश झाल्यानंतर पाणी पुरवठा केव्हा केला जाईल असा प्रश्न उपस्थित होत आहे. या योजनेसंदर्भात आमदार डॉ.परिणय फुके यांच्याकडे परसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ता राकेश सिंगाडे यांनी निवेदन देऊन ही योजना सुरू करण्याची मागणी केलेली आहे.


पाणी पुरवठा योजनेला शासनाने प्राधान्यक्रम देऊन योजना तात्काळ कार्यान्वित करण्याची गरज होती. मुख्यमंत्र्यांचे नाव या योजनेला दिले आहे. निदान पेयजल योजना तरी शासनाने मार्गी लावावी.
- के. के. पंचबुध्दे, जि.प. सदस्य देव्हाडी


मुख्यमंत्री पेयजल योजनेत देव्हाडी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचा समावेश होऊन एक वर्ष लोटत आहे. परंतु अद्याप कारवाई झाली नाही. आ. परिणय फुके यांनी भेटून पाठपुरावा करणार आहे.
- राकेश सिंगाडे, सामाजिक कार्यकर्ता, परसवाडा (दे.)