डांबर प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 09:19 PM2019-05-08T21:19:42+5:302019-05-08T21:21:02+5:30

निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत.

Environmental threat due to Asphalt project | डांबर प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका

डांबर प्रकल्पामुळे पर्यावरणाला धोका

Next
ठळक मुद्देपरवानगीबाबत तर्कवितर्क : विदेशी पक्षी व वन्यजीवांच्या मुक्तसंचारात अडथळा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : निसर्गाने मुक्त उधळण केलेल्या सिरेगावबांधच्या रम्य परिसरात हॉट मिक्सींग डांबर प्लांट बसविण्यात आले. यामुळे सिरेगावबांध तलावातील जैवविविधता, विदेशी पक्ष्यांचा मुक्तसंचार व नजीकच्या पहाडावरील वन्यप्राण्यांचे पाणवठा स्थानाला अडथळे निर्माण झाले आहेत. निसर्गरम्य ठिकाणी या प्लांटची निर्मिती हा परिसरात चर्चेचा विषय आहे.
सोमलपूर-गंगेझरी येथील गट क्रमांक-१०६ लगत सिरेगावबांध तलाव आहे.या तलावाशेजारी आमराई आहे. या तलावात दरवर्षी मोठ्या प्रमाणात हिवाळ््यात विदेशी पक्षांचे आगमन होते. लागूनच पहाड व जंगल परिसर असल्याने जलाशयाच्या पाणवठ्यावर वन्यप्राण्यांचा संचार असतो. हा परिसर सानगडी-नवेगावबांध मार्गावर आहे. नवेगावबांध व्याघ्र प्रकल्प व इटियाडोह धरण बघण्यासाठी येणारे पर्यटक या निसर्गरम्य ठिकाणी थांबले नाही तर नवलच! अशा या निसर्गदत्त ठिकाणी एक महिन्यापूर्वी हॉट मिक्स डांबर प्लांट उभारण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाने शतकोटी वृक्षलागवडीचा संकल्प केला आहे. या उद्दिष्टपृूर्तीसाठी गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. मात्र दुसरीकडे जागा बळकावून त्या जागेवरील झाडांची सर्रास कत्तल केली जात आहे. याठिकाणी वृक्ष लागवड योजनेंतर्गत आंबा, जांभुळ व इतर वृक्ष लागवड करण्यात आली होती असे गावकरी सांगतात. आज त्याठिकाणी लागवड केलेले वृक्षच दृष्टीस येत नाही. या वृक्षांची कत्तल झाली की ते जगलेच नाही हा खरा प्रश्न आहे. एक मात्र खरे की, या ठिकाणी असलेली झुडपे नष्ट झाली आहे, हे वास्तव आहे.
या ठिकाणी प्लांट उभारणीसाठी शासकीय विभाग व ग्रामपंचायतने परवानगी अथवा नाहरकत प्रमाणपत्र दिलेच कसे? हा संशोधनाचा विषय आहे. परवानगी दिली नसेल तर महसूल व वनविभाग मूग गिळून गप्प का आहे?याची शहानिशा करणे गरजेचे आहे.
या प्रकारामुळे पक्षी अभ्यासक कमालीचे निराश झाले असून पक्ष्यांचे आश्रयस्थान व मुक्तसंचार धोक्यात आल्याची बाब त्यांना खटकत आहे. यामुळे पुढील वर्षी कदाचित या परिसरात विदेशी पक्षांचा मुक्तसंचार न्याहाळण्याची संधी उपलब्ध होणार नाही ही भीती त्यांच्या मनात घर करुन आहे. प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.
तो डांबर प्लांट हटवा- तरोणे
सिरेगावबांध हे तालुक्याचे वैभव आहे. परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. दरवर्षी हिवाळ्यात याठिकाणी मोठ्या प्रमाणावर सातासमुद्रापलीकडून विदेशी पक्षी हजेरी लावतात. या काळात पर्यटकांना एक पर्वणीच असते. मात्र या प्लांटमुळे येथे धूळ होईल. वाहनांच्या आवागमनामुळे ध्वनी प्रदूषण होईल शिवाय विदेशी पक्षी व वन्यप्राण्यांच्या दैनंदिन मुक्तसंचारात अडथळे निर्माण होतील. शिवाय नैसर्गिक जैवविविधता नष्ट होईल. आमराईतील गावरान आंब्याच्या आस्वादापासून ग्रामस्थांना वंचित व्हावे लागेल शिवाय पर्यावरणाला धोका निर्माण होईल, अशी भीती जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे यांनी व्यक्त केली. प्रशासनाने हा प्लांट तातडीने हटविण्याची मागणी त्यांनी जिल्हाधिकारी,उपवनसंरक्षक, सार्वजनिक बांधकाम विभाग,विभागीय आयुक्त व पर्यावरण विभागाकडे केली आहे.

Web Title: Environmental threat due to Asphalt project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.