मृत घोषित केलेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 09:38 AM2018-10-16T09:38:04+5:302018-10-16T09:46:05+5:30

मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला.

Claiming to be alive, the child declared dead | मृत घोषित केलेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा

मृत घोषित केलेल्या बालकाला जिवंत करण्याचा दावा

Next
ठळक मुद्देसर्पदंशाने मृत्यू घोषित अंत्यसंस्कारासाठी गेलेला मृतदेह परत आणला

- दिलीप चव्हाण 

गोंदिया : गोरेगाव तालुक्याच्या घोटी येथील आठ वर्षाच्या बालकाला १४ आॅक्टोबरला सकाळी ११.३० वाजता सर्पदंश झाला. त्या मुलाला उपचारासाठी गोंदियाच्या बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात आणले. परंतु गंगाबाईच्या बालरोग तज्ज्ञांनी त्याला मृत घोषित केले. परंतु त्या मृत मुलाला जिवंत करण्याची हमी बालाघाट येथील डॉक्टरांच्या चमूने दिल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी जाणारा मृतदेह स्मशानघाटावरून घरी आणण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घोटी येथे सोमवारी (दि.१५)उघडकीस आला.
आदित्य सुमेश गौतम (८) रा. घोटी असे मृत घोषित करण्यात आलेल्या बालकाचे नाव आहे. रविवारी सकाळी ११.३० वाजता त्याला सर्पदंश झाल्याने तासाभरानंतर त्याच्यावर गोरेगावच्या ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर गोंदिया येथील बाई गंगाबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. १४ आॅक्टोबरला दुपारी १.३० वाजता बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील बालरोग तज्ज्ञ डॉ. अर्पण चव्हाण यांनी त्याला मृत घोषित केले. आदित्य शिशू मंदिर येथील दुसऱ्या वर्गाचा विद्यार्थी होता. सर्पदंशाची घटना वाऱ्यासारखी तालुक्यात पसरताच म्हसगाव येथील एका इसमाने सर्पदंश झालेल्या इसमावर बालाघाट येथील डॉ. नवीन लिल्हारे (साईधाम) हे उपचार करतात अशी माहिती दिली. यावर गौतम कुटुंबीय व नातेवाईकांनी डॉ. लिल्हारे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून घडलेली घटना सांगितली. डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य गौतम यांच्या हाताची नस कापा असे सांगितले. हाताची नस कापली असता रक्त बाहेर आले हे सांगताच डॉ. नवीन लिल्हारे यांनी आदित्य जिवंत असल्याचे सांगत २४ तासात जिवंत करण्याचा दावा केला. त्यामुळे आदित्यला स्मशानभूमीतून घरी परत आणण्यात आले. आदित्यचे वडील सहा वर्षांपूर्वीच मृत्यू पावले आहे. आई शीला गौतम मजुरीचे काम करते. आदित्यला पाहण्यासाठी हजारो लोकांची गर्दी होत आहे.

उपचार करणाऱ्या चमूत पंधरा डॉक्टर
सर्पदशांमुळे आदित्यचा मृत्यू झाल्याच्या घटनेला आता ३५ तासांचा कालावधी पूर्ण होत आहे. मात्र यानंतरही तो जिवंत असल्याचे समजून त्याचा मृतदेह उपचारासाठी घरीच ठेवण्यात आला. मध्य प्रदेशातील १२ डॉक्टरांची चमू त्याच्यावर उपचार करणार असल्याचे सांगितले जाते. सध्या या चमूतील दोघेजण गोरेगाव येथे येऊन परत गेले असून सोमवारी रात्री उशिरा ते गोरेगाव घोटी येथे येणार असल्याची माहिती आहे.

मृत घोषित करताना चार डॉक्टरांची उपस्थिती
बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयाच्या बालरोग अतिदक्षता कक्षात सर्पदंश झालेल्या आदित्यवर उपचार करीत असताना तेथे डॉ. अर्पण चव्हाण, डॉ. माळी, डॉ.सागर सोनवाने व स्वत: बालरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख डॉ.मनिंदरसिंग जुनेजा उपस्थित होते. त्यांच्यासमोरच आदित्यला मृत घोषित करण्यात आले.

आदित्यवर उपचार झाल्यानंतर तो जिवंत नसल्याचे लक्षात आल्यानंतरही एक तास डॉक्टरांनी वाट पाहिली. त्यानंतरच मृत घोषित करण्यात आले. ज्यांनी मृत घोषित केले ते एमडी डॉक्टर आहेत.
- डॉ.मनिंदरसिंग जुनेजा
बालरोग तज्ज्ञ विभाग प्रमुख बीजीडब्ल्यू गोंदिया.

आदित्यला बीजीडब्ल्यू येथील डॉक्टरांनी रविवारी मृत घोषित केले. एकदा मृत झालेली व्यक्ती जिवंत होऊ शकत नाही. हा प्रकार अंधश्रद्धा वाढविणारा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यानुसार जिवंत व्यक्तीवर उपचार करताना कारवाई करण्याची तरतूद आहे. मात्र मृत व्यक्तीवर उपचार करणा-यावर कारवाई करण्याची तरतूद नाही. त्यामुळे सदर दावा आणि उपचार करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठी कायद्यात काय तरतूद आहे याचा शोध घेतला जात आहे. सदर व्यक्तींवर निश्चित कारवाई केली जाईल.
- जितेंद्र बोरकर, ठाणेदार गोरेगाव पोलीस स्टेशन

मृत घोषित केलेला मुलगा जिवंत असून त्याच्या नाकातून रक्तस्राव सुरू आहे. या मुलावर उपचार करून त्याला उद्या (दि.१६) पर्यंत जिवंत करणार.
- डॉ.नवीन लिल्हारे

Web Title: Claiming to be alive, the child declared dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.