नगर परिषदेची थाप अन् नागरिकांना मनस्ताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 09:51 PM2018-07-16T21:51:08+5:302018-07-16T21:51:52+5:30

यंदा नगर परिषदेने शहरात मॉन्सूनपूर्व सफाईची कामे केली नाही. परिणामी रविवारी (दि.१५) रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील नाला आणि नाल्या चोक होवून अनेक वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. याचा फटका बीजीडब्ल्यू रुग्णालयाला बसला.

City Council shutdown and civilians have trouble | नगर परिषदेची थाप अन् नागरिकांना मनस्ताप

नगर परिषदेची थाप अन् नागरिकांना मनस्ताप

Next
ठळक मुद्देमुसळधार पावसाने वस्त्या जलमय : घरांची पडझड, पावसाळ्यापूर्वी सफाई अभियान न राबविल्याचा शहराला फटका

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : यंदा नगर परिषदेने शहरात मॉन्सूनपूर्व सफाईची कामे केली नाही. परिणामी रविवारी (दि.१५) रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील नाला आणि नाल्या चोक होवून अनेक वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. तर काही नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने त्यांना रात्र जागून काढण्याची वेळ आली. याचा फटका बीजीडब्ल्यू रुग्णालयाला बसला. या रुग्णालयाच्या महिला वार्डात दुसऱ्यांदा पाणी साचल्याने रुग्णांची गैरसोय झाली. नगर परिषदेने शहरात मॉन्सूनपूर्व कामे करण्याची थाप मारल्याने शहरवासीयांना मनस्ताप सहन करावा लागला.
पावसाळ्याला सुरू होण्यापूर्वी नगर परिषदेतर्फे शहरात सफाई अभियान राबविले जाते. त्यामुळे पावसाळ्यात नाल्या चोक होवून वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याची समस्या निर्माण होत नाही. मात्र यंदा पावसाळ्याला सुरूवात होवून महिनाभराचा कालावधी लोटला तरी, नगर परिषदेने शहरातील मुख्य नाला आणि नाल्यांमधील गाळाचा उपसा केला नाही. परिणामी रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील नाल्या चोक होवून शास्त्रीवार्ड, लोहीयावार्ड, हड्डीटोली, कंटगी, कुडवा, राजाभोज कॉलनी, एकता कॉलनी, सिंधी कॉलनी व नमाद महाविद्यालयाच्या परिसरातील वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे रात्रभर या नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. सोमवारी (दि.१६) सकाळी ८ वाजतापर्यंत पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे शहरातील वस्त्यांना पुराचे स्वरुप प्राप्त झाले होते. तर जसा जसा पावसाचा जोर वाढत होता तस तशी शहरवासीयांची काळजी वाढत होती. पावसाचे पाणी घरांमध्ये शिरायला लागल्याने अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सकाळी ११ वाजतानंतर पाणी थांबून वस्त्यांमध्ये साचलेले पाणी ओसरायला लागल्यानंतर शहरवासीयांना थोडासा दिलासा मिळाला. मात्र केवळ चौवीस तासात झालेल्या पावसामुळे शहराची दानादान झाल्याने नगर परिषदेच्या विकास कामांचा सुध्दा बोजवारा उडाला. शहरात २० कोटी रुपयांची कामे सुरू करुन शहराला नंबर बनविण्याचे स्वप्न दाखविणाºयांची सुध्दा पोलखोल झाली. नगर परिषदेने पावसाळ्यापूर्वी राबविण्यात येणाºया कामांचे नियोजन करुन ती सुरू न केल्याने त्याचा त्रास शहरवासीयांना सोसावा लागला. त्यामुळे शहरवासीयांनी नगर परिषदेवर तीव्र रोष व्यक्त केला. तसेच हाच का नगर परिषदेचा पारदर्शक कारभार अशी टीकादेखील शहरवासीयांकडून केली जात आहे.

रिंगरोड परिसराला तलावाचे स्वरूप
मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका शहरातील कुडवा चौक व रिंगरोड परिसराला बसला. याच परिसरातून मोठा नाला वाहत असून या नाल्याचे पाणी चोक झाल्याने ते पाणी वस्त्यांमध्ये आणि रस्त्यावर साचले होते. त्यामुळे रिंगरोड परिसराला तलावाचे स्वरुप प्राप्त झाल्याचे चित्र होते.
नागरिकांच्या सर्तकतेने वाचला जीव
सोमवारी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास चौरागडे मेडीकल चौक परिसरातील रस्त्यावर एक व्यक्ती रेल्वेस्थानकाकडे जात असताना त्याचा तोल गेल्याने ते पाण्यात पडल्याने वाहून जात असताना तिथे असलेल्या नागरिकांनी धावून जात त्यांना सुखरुप बाहेर काढले. याभागातील नाले ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी साचले होते.
वस्त्यांमधील घरांची पडझड
शहरात रविवारी रात्रीपासून बरसलेल्या मुसळधार पावसामुळे नाल्या चोख होवून शास्त्रीवार्ड, लोहीयावार्ड, हड्डीटोली, कंटगी, कुडवा, राजाभोज कॉलनी, एकता कॉलनी, सिंधी कॉलनी, पुनाटोली, कन्हारटोली, गजानन कॉलनी, शिवनगर, चौरागडे मेडीकल चौक व नमाद महाविद्यालयाच्या परिसरातील वस्त्यांमध्ये गुडघाभर पाणी साचले. तर काही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी साचल्याने २५ ते ३० घरांची भिंत कोसळून घरांचे अशंत: नुकसान झाले. त्यामुळे या वार्डांमधील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. सोमवारी दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास: सोडला.
बाई गंगाबाई रुग्णालयात साचले पाणी
पंधरा दिवसापूर्वी शहरात दोन तास बरसलेल्या पावसामुळे शहरातील सिव्हिल लाईन परिसरातील बाई गंगाबाई महिला रुग्णालयाच्या महिला वार्डात गुडघाभर पाणी साचले होते. या वार्डात दाखल असलेल्या महिला रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची चांगली गैरसोय झाली. याची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेत जिल्हा प्रशासनाला फटकारले होते. मात्र त्यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने उपाय योजना करण्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी रविवारी (दि.१५) रात्रीच्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा रुग्णालयाच्या महिला वार्डात पाणी साचले. त्यामुळे नगर परिषद अग्निशमन विभागाला पाचारण करुन साचलेल्या पाण्याचा उपसा करण्यात आला. मात्र या सर्व प्रकारामुळे रुग्णांचे हाल झाले.
भरपावसातही शाळा सुरूच
शहरात अतिवृष्टी झाल्यानंतर रस्त्यावर पाणी साचलेले असतानाही शहरातील खासगी शाळांनी सुट्टी जाहीर केली नाही. शाळेच्या बसेस पाठवून विद्यार्थ्यांना शाळेत नेण्याची घाई सुरू असल्याचे चित्र होते. तर शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाºया काही आॅटो चालकांनी रस्त्यावर पाणी साचले असताना त्यात आॅटो टाकून विद्यार्थ्यांची वाहतूक करीत होते. दरम्यान या प्रकाराची काही नागरिकांनी जिल्हाधिकाºयांशी संपर्क साधून माहिती देण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. त्यामुळे उपविभागीय अधिकारी अनंत वालस्कर यांच्याशी संर्पक साधून या प्रकाराची माहिती दिली. तेव्हा त्यांनी रस्त्यावर पाणी असताना विद्यार्थ्यांची वाहतूक करणे चुकीचे असल्याचे सांगितले. दरम्यान पावसाची परिस्थिती पाहुन विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा व्यवस्थापनाने सुटी जाहीर करण्याची गरज होती.
पावसाळ्यात सुरू केली कामे
नगर परिषदेने शहरात मॉन्सूनपूर्व सफाईची कामे न केल्याने शहरावासीयांना त्याचा फटका बसला. यामुळे शहरवासीयांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. नागरिकांचा वाढता संताप पाहुन नगर परिषदेने मागील दोन तीन दिवसांपासून सफाई अभियान सुरू केल्याची माहिती आहे.
वीज पुरवठा खंडित
रविवारी रात्री पासून सुरू झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागातील वीज पुरवठा सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत खंडीत होता. त्यामुळे नागरिकांना रात्र जागून काढावी लागली. पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड होवून विद्युत तारा तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याची माहिती आहे. तर मुसळधार पावसाचा दूरध्वनी सेवेला सुध्दा फटका बसला. सोमवारी सायंकाळी ५ वाजपेपर्यंत शहरातील सर्व दूरध्वनी सेवा ठप्प झाली होती त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागला.

Web Title: City Council shutdown and civilians have trouble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.