सायबर गुन्ह्यांबाबत जागरुक राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:05 AM2018-01-25T00:05:28+5:302018-01-25T00:07:07+5:30

इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

Be vigilant about cyber crime | सायबर गुन्ह्यांबाबत जागरुक राहा

सायबर गुन्ह्यांबाबत जागरुक राहा

Next
ठळक मुद्देराजकुमार बडोले : सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : इंटरनेट व संगणकाचा वापर होत असल्यामुळे जग इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आले आहे. त्यामुळे सायबर गुन्हे देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. वाढत्या सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्र प्रकल्पांतर्गत गोंदिया पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कारंजा येथील पोलीस मुख्यालयाच्या प्रेरणा सभागृहात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियान कार्यक्रम मंगळवारी (दि.२३) आयोजित करण्यात आला होता या वेळी ते बोलत होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भूजबळ, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सायबर तज्ज्ञ पियूष वर्मा व आयसीआयसीआय बँकेचे क्षेत्रीय व्यवस्थापक कमलेश वालदे उपस्थित होते.
बडोले पुढे म्हणाले, ट्रान्सफॉर्मिंग महाराष्ट्रच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत होईल. समाजाला सायबर गुन्हेगारी विषयी जागरुक करण्याची गरज आहे. त्यामुळे होणारी फसवणूक टाळण्यास मदत होईल. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील अतिदुर्गम व नक्षलग्रस्त क्षेत्रातील मुलांनी पोलीस विभागाच्या मदतीने मुंबई येथे आंतरराष्ट्रीय मॅराथॉन स्पर्धेत सहभाग घेतला, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. पोलीस अधीक्षक डॉ.भूजबळ यांच्या नेतृत्वात पोलीस विभाग चांगले काम करीत आहे. मागास व दुर्गम भागातील मुलामुलींमध्ये चांगली जडणघडण करण्याचे काम पोलीस करीत असून त्यांच्यामध्ये आत्मविश्वास सुध्दा निर्माण करुन त्यांना यशाचा मार्ग दाखिवण्यात येत आहे. मुलांचे करियर घडविण्याचे काम पोलीस विभाग करीत आहे, ही अत्यंत महत्वाची बाब असल्याचे बडोले यांनी सांगितले.
वालदे म्हणाले, बँकेत इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पैशाचा व्यवहार होत असतो. त्यासाठी नागरिकांनी बँकेत व्यवहार करताना सदैव जागरूक रहावे. सोशल मिडियावर आपली वैयक्तिक माहिती देवू नये, जेणेकरुन आपली फसवणूक होणार नाही. यासाठी सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या वेळी त्यांनी इंटरनेट बँकींग, फिशींग, मोबाईल बँकींग, स्मीशिंग, युपीआय, ई-वॅलेट, युएसएसडी, कार्ड, युपीआय याबाबत माहिती दिली.
डॉ.भूजबळ म्हणाले, सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती अभियानामुळे बँकींग व्यवहाराबाबत होणारी आॅनलाईन फसवणूक, सोशल मिडियाबाबत होणारे गुन्हे याबाबतची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
या वेळी रामअवतार अग्रवाल, आदेश शर्मा व पोलीस निरीक्षक दासुरकर यांनी बँकींग फ्रॉड व्यवहाराबाबत काही प्रश्न विचारले. वालदे यांनी त्यांच्या प्रश्नांचे निराकरण केले. सायबर जनजागृती कार्यशाळेला उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते, मंदार जवळे, पोलीस उपअधीक्षक (गृह) खन्ना, पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचारी, पोलीस मित्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी व महाविद्यालयीन विद्यार्थी उपस्थित होते.
संचालन पोलीस उपनिरिक्षक राधिका कोकाटे यांनी केले. आभार जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी मानले.

Web Title: Be vigilant about cyber crime

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.