Baldandi Morcha on Congress's Tehsil office | काँग्रेसचा तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा
काँग्रेसचा तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

ठळक मुद्देवाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
अर्जुनी-मोरगाव : अर्जुनी-मोरगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शनिवारी (दि.३) वाढती महागाई आणि केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढण्यात आला.
येथील दुर्गा चौकातून बैलबंडी मोर्चाला सुरूवात झाली. मोर्चात तालुक्यातील शेतकरी बांधव व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते. यावेळी मोचेकऱ्यांनी सत्तारूढ सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच वाढती महागाई आणि शेतकरी विरोधी धोरणाचा तीव्र निषेध नोंदविला.
शहरातील मुख्य मार्गावर हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चाचे रुपातंर सभेत झाले. सभेला पदाधिकाऱ्यानी मार्गदर्शन केले.
त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भागवत नाकाडे, गिरीष पालीवाल, राजेश नंदागवळी, नगराध्यक्ष पौर्णिमा शहारे, राजू पालीवाल, वंदना शहारे, उर्मिला जुगनाके, शीला पटले, सुनील लंजे, कृष्णा शहारे, इंद्रदास झिलपे, सोमेश्वर सौंदरकर, नितीन भालेराव, इंजि. आनंदकुमार जांभूळकर, सुभाष देशमुख, संजय नाकाडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनातून देशात पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत असल्याने महागाईत वाढ होत आहे.
त्यामुळे पेट्रोल डिझेलच्या किंमती नियंत्रणात ठेवाव्यात.शेतकऱ्यांना उत्पादन खर्चासह ५० टक्के नफा जोडून हमी भाव देण्यात यावा. उज्वल गॅस जोडणी योजनेचा गाजावाजा केला जात असली तरी त्याचा लाभ लाभार्थ्यांना मिळत नाही.
शासनाच्या धोरणामुळे किंमती वाढ व जीएसटीची भर पडल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे शासनाने अन्यायकारक धोरणे रद्द करुन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा. अन्यथा विरोधात जेलभरो आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.


Web Title:  Baldandi Morcha on Congress's Tehsil office
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.