उमेदवार निवडीत सर्वच पक्षांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:50 PM2017-11-22T23:50:58+5:302017-11-22T23:51:13+5:30

शेवटी नगर पंचायत सालेकसाच्या प्रथम निवडणुकीचा बिगुल वाजला असून १८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे.

All the parties will be selected in the election | उमेदवार निवडीत सर्वच पक्षांची तारांबळ

उमेदवार निवडीत सर्वच पक्षांची तारांबळ

Next
ठळक मुद्देमोर्चेबांधणी जोरात : एकही अर्ज नाही, उमेदवार प्रतीक्षेत

विजय मानकर।
ऑनलाईन लोकमत
सालेकसा : शेवटी नगर पंचायत सालेकसाच्या प्रथम निवडणुकीचा बिगुल वाजला असून १८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. परंतु मागील चार दिवसांत कोणत्याही पक्षाचा कोणताच अर्ज दाखल झाला नाही. तर इतर कोणत्या स्वतंत्र उमेदवाराने सुध्दा नामनिर्देशन केले नाही. अर्थात आतापर्यंत सर्वच पक्ष तोडीचा उमेदवाराची निवड करण्यासाठी मंथन करुन मोकळे झालेले नाहीत. उमेदवार निवडीत सर्वच पक्षांची चांगलीच तारांबळ होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे इच्छुक उमेदवार विविध पक्षांच्या संर्पकात आहेत.
सालेकसा नगर पंचायतमध्ये एकूण १७ नगरसेवक, त्यासोबतच थेट मतदारांच्या माध्यमातून नगराध्यक्षाची निवडणूक होणार आहे. येत्या १३ डिसेंबर रोजी होणाºया मतदान कार्यक्रमात आपल्या पक्षाच्या उमेदवाराला नगराध्यक्षपदावर आरुढ होण्याची प्रथम संधी लाभावी, यासाठी भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना हे चारही पक्ष दमदार उमेदवार शोधत आहेत. त्यांच्यासमोर आलेल्या उमेदवारांच्या नावांपैकी कोणाला व कोणत्या वार्डातील उमेदवाराला नगराध्यक्षपदासह नगर पंचायतमध्ये आपले बहुमत येईल, याचे समिकरण तयार केले जात आहे. तसेच विरोधी पक्ष कोणाला उमेदवारी जाहीर करतो याची सुध्दा वाट बघितली जात आहे.
विशेष म्हणजे नगराध्यक्षपद अनुुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने एकीकडे सर्वसामान्य वर्गातील इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. त्यामुळे काही दिग्गज कार्यकर्ते या निवडणुकीला विशेष महत्व देत नसले तरी अनुसूचित जमातीचे कार्यकर्ते आपल्यासाठी सुवर्ण संधी मानून उमेदवारीसाठी आपला फिल्डींग लावीत आहे. एकूण १७ प्रभागामध्ये १७ नगरसेवक निवडून येतील. त्यात जाहीर केलेल्या सुधारित आरक्षणा प्रमाणे प्रभाग क्रमांक १, २, ६ आणि १५ हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. प्रभाग क्रमांक ३, ७, ९ व १६ हे अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
अनुसूचित जातीसाठी एकच जागा राखीव आहे. प्रभाग क्रमांक ८ मध्ये अनुसूचित जातीची महिला नगरसेवक बनणार आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) पाच पद राखीव आहेत. त्यात प्रभाग क्रमांक ४, १२ व १७ हे ओबीसी महिलांसाठी राखीव आहेत. प्रभाग क्रमांक ११ व १३ ओबीसी सर्वसाधारणसाठी राखीव आहेत. तसेच प्रभाग क्रमांक ५, १० व १४ हे सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी असून प्रभाग १४ महिला सर्वसाधारणसाठी राहणार आहे. अशा एकूण १७ नगरसेवकांपैकी आठ अनुसूचित जमातीसाठी, एक अनुसूचित जातीसाठी, पाच ओबीसीसाठी आणि तीन पद खुल्या प्रवर्गासाठी ठेवण्यात आले आहेत.
सालेकसा नगर पंचायत ही वास्तविक तालुका मुख्यालयातील भागाच्या बाहेर आहे. या नगर पंचायतीत शहरीकरणाचा भाग कमी असून ग्रामीण भागाचा जास्त समावेश आहे. यात बाकलसर्रा, जांभळू, जुना, सालेकसा, मुरुमटोला व हलबीटोला या गावांचा समावेश आहे. यात बाकलसर्रा या गावात दोन प्रभाग, जांभळी गावात तीन प्रभाग, सालेकसात दोन प्रभाग, मुरुमटोला तीन प्रभाग आणि हलबीटोल्यात एकूण सात प्रभाग तयार करण्यात आले आहेत.
या पाच गावांतील १७ प्रभागातील एकूण मतदारांची संख्या दोन हजार ७१५ आहे. यात एक हजार ३७२ पुरुष आणि एक हजार ३४३ स्त्री मतदारांचा समावेश आहे. एकूण मतदारांची प्रभागनिहाय विभागनी केल्यावर प्रत्येक प्रभागात किमान १३५ ते कमाल १७९ एवढीच मतदार संख्या आहे.
त्यामुळे प्रत्येक उमेदवाराला सहजरित्या प्रत्येक मतदारासह संपर्क साधता येवू शकेल. तसेच निवडणूक जिंकण्याचा किंवा पराभूत होण्याच्या मतांमध्ये फार कमी अंतर राहणार आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अटीतटीची लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात आर्थिक घोडेबाजार सुध्दा होण्याची शक्यता असून त्यामुळे उमेदवारांची चांगलीच दमछाक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ही नगर पंचायत विखुरलेल्या गावांत असून नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला सर्वच प्रभागामध्ये संपर्क करताना मोठे परिश्रम घ्यावे लागेल. परंतु संपर्क अभियान तेवढे कठीण जाणार नाही. मात्र निवडणुकीचे मतदान होण्यापूर्वी त्यांना उमेदवारी मिळण्यास किती वेळ लागणार यावरही अवलंबून राहील. त्यानुसार उमेदवार कामाला लागतील.
नगर पंचायत निवडणूक कार्यक्रम
१४ नोव्हेंबरला जिल्हाधिकाºयांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. १८ नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र भरण्यासाठी वेबसाईट सुरु करण्यात आली. २४ नोव्हेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र रविवार सोडून दररोज सकाळी ११ वाजेपासून दुपारी ३ वाजेपर्यंत भरण्यात येतील. २५ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाणनी यादी प्रसिध्द होईल. ३० नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. १३ डिसेंबरला मतदान कार्यक्रम घेण्यात येणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल जाहीर करण्यात येईल. प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची वेळ सकाळी ७.३० पासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत राहील. तर मतमोजणीची वेळ सकाळी १० वाजेपासून करण्यात येईल.

Web Title: All the parties will be selected in the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.