गोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 01:59 PM2017-11-13T13:59:48+5:302017-11-13T14:01:56+5:30

गोव्यातील एकमेव सहकारी कारखाना : गत साली ४७,३८७ टन ऊस गाळप

Sanjeevani Co-operative Sugar Factory in Goa | गोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम

गोव्यातील संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा उद्यापासून गळीत हंगाम

Next

पणजी : गोव्यात सहकार क्षेत्रातील एकमेव संजीवनी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम मंगळवारपासून (14 नोव्हेंबर) सुरू होत आहे. या वर्षी गोव्यातील ५0 हजार टन आणि शेजारी कर्नाटकातील १ लाख टन मिळून दीड लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कारखान्याचे प्रशासक उमेशचंद्र जोशी यांनी ही माहिती ‘लोकमत’ला दिली.

गेल्या वर्षी ४७,३८७ टन ऊस गाळप झाले होते व त्यातून ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. ७ हजार टन स्थानिक ऊस आणि सुमारे ४0 हजार टन शेजारी राज्यातील ऊसाचे गाळप झाले होते. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी अलिकडेच कारखान्याचे आधुनिकीकरण लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते त्या पार्श्वभूमीवर कामेही सुरू झाली आहेत.

प्राप्त माहितीनुसार गत साली ऊस गाळपातून सुमारे ८.३८ टक्के इतका उतारा मिळाला आणि ३९,७२८ क्विंटल साखर उत्पादन झाले. यंदा रामनगर, हल्याळ, अळणावर, हेब्बाळ आदी भागांबरोबरच यावर्षी खानापूर येथूनही ऊस आयात करण्याचे ठरले आहे.

कोल्हापूरचे साखरतज्ज्ञ सल्लागार?
सरकारने ऊस उत्पादकांना आधारभूत दर प्रती टन ५00 रुपयांनी वाढवून दिला आहे. कारखान्याकडून १२00 रुपये तर सरकारकडून १८00 रुपये असे एकूण ३ हजार रुपये प्रती टन उत्पादकांना आता मिळतील. यापूर्वी सरकारकडून १३00 रुपये आणि कारखान्याकडून १२00 रुपये मिळून अडीच हजार रुपये दिले जात असत. कारखान्याच्या आधुनिकीकरणाचा प्रस्ताव आहे त्यासाठी नवी यंत्रसामुग्री आणली जाणार आहे. कोल्हापूर येथील साखरतज्ज्ञ बी. एन. पाटील यांची सल्लागार म्हणून नेमणूक करण्याचा विचार आहे. पाटील यांनी साखर क्षेत्रात केवळ भारतातच नव्हे तर केनियासारख्या देशातही काम केलेले आहे.

त्यांना या क्षेत्रात तब्बल ३४ वर्षांचा अनुभव आहे. कारखान्यातील यंत्रसामुग्री इतकी जुनी झाली आहे की त्याच्या देखभालीवरच वर्षाकाठी सुमारे दोन ते अडीच कोटी रुपये खर्च येतो, अशी माहितीही जोशी यांनी दिली. इथॅनॉल, बायोगॅसची निर्मिती करुन कारखाना नफ्यात आणता येईल, असे गेल्या भेटीवेळी मुख्यमंत्र्यांनी सूचविले आहे. कृषी खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २0१६-१७ च्या गळीत हंगामात राज्यात ४0,२३४ टन ऊस उत्पादन झाले आणि हा ऊस संजीवनी सहकारी साखर कारखान्याला पुरविण्यात आला. आधी अडीच हजार रुपये प्रति टन आधारभूत दर दिला जात होता त्यात आता ५00 रुपयांची भर पडली आहे.

शेजारी राज्यावरच अवलंबन
संजीवनी साखर कारखान्याची गरज गोव्यात उत्पादन होणा-या ऊसातून भागत नाही. त्यामुळे शेजारी कर्नाटक तसेच महाराष्ट्रातून ऊस मागवावा लागतो. गोव्यातील ऊस लागवड क्षेत्र गेल्या काही वर्षांच्या काळात स्थिर राहिलेले आहे. संजीवनी साखर कारखाना हा सहकार क्षेत्रातील एकमेव कारखाना आहे. मात्र या कारखान्याला पुरेसा ऊस मिळत नाही. ऊस उत्पादनवाढीसाठी वेगवेगळे प्रयोग केले जात आहेत. नवीन जागा लागवडीखाली आणण्यासाठी प्रती हेक्टर १0 हजार रुपयांपर्यंत अर्थसाहाय्य दिले जाते. मजूर खर्चावर हेक्टरी ५0 टक्के किंवा १0 हजार रुपये जी रक्कम कमी असेल ती दिली जाते. गळीत हंगामाच्या उद्घाटनासाठी उद्या स्थानिक आमदार तथा साधनसुविधा विकास महामंडळाचे अध्यक्ष दीपक पाऊसकर तसेच सांगेचे आमदार प्रसाद गांवकर उपस्थित राहणार आहेत.

Web Title: Sanjeevani Co-operative Sugar Factory in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.