वादग्रस्त मिकी पाशेको यांचा अटकेच्या भयाने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज  

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2018 02:46 PM2018-03-15T14:46:33+5:302018-03-15T14:46:33+5:30

आपल्या वक्तव्यामुळे आणि आक्षेपार्ह वागणुकीमुळे सतत वादग्रत राहिलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे निर्बधित असलेल्या किनारपट्टीवर बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत.

Mickey Pacheco's anticipatory bail application in court | वादग्रस्त मिकी पाशेको यांचा अटकेच्या भयाने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज  

वादग्रस्त मिकी पाशेको यांचा अटकेच्या भयाने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज  

Next

सुशांत कुंकळयेकर /मडगाव :  आपल्या वक्तव्यामुळे आणि आक्षेपार्ह वागणुकीमुळे सतत वादग्रत राहिलेले गोव्याचे माजी पर्यटनमंत्री मिकी पाशेको हे निर्बधित असलेल्या किनारपट्टीवर बेदरकारपणे गाडी चालविल्यामुळे पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. या प्रकरणात आपल्याला अटक होईल या भीतीने त्यांनी दक्षिण गोवा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. पाशेको यांच्या विरोधात भादंसंच्या 336 (जीवाला धोका पोहोचविणे) तसेच 504 व 506 (धमक्या देणे) या कलमाखाली वेर्णा पोलिसात दखलपात्र गुन्हा नोंद झाला असून पाशेको यांनी चौकशीसाठी पोलीस स्थानकावर हजर रहाण्यासाठी पोलिसांनी समन्सही जारी केले आहे. या पार्श्वभूमीवर पाशेको यांनी दाखल केलेला अटकपूर्व जामिनाचा अर्ज शुक्रवारी (16 मार्च) अतिरिक्त सत्र न्यायाधीश सायनोरा लाड यांच्यासमोर सुनावणीस येणार आहे.

मागच्या रविवारी ही वादग्रस्त घटना घडली होती. पाशेको आपली एसयुव्ही गाडी घेऊन दक्षिण गोव्यातील बेताळभाटी बीचवर आला होता. त्यावेळी त्याच्या गाडीचा धक्का बसून या भागात वॉटरस्पोर्टस्चा व्यवसाय चालविणा-या मिलरॉय डिसिल्वा याच्या पॅराशूटची नासधुस केल्याची तक्रार कोलवा पोलीस स्थानकावर दाखल झाली होती. त्यानंतर पाशेको किनारपट्टीवरुनच जवळच असलेल्या उतोर्डा बिचवर गेल्याचा आरोप असून त्याच्या या कृतीचे व्हिडीओ शूटिंग काढण्याचा प्रयत्न केला असता डिसिल्वा याला शिवीगाळ व धमक्या दिल्याच्या आरोपाखाली वेर्णा पोलीस स्थानकावरही गुन्हा नोंद झाला आहे. याच प्रकरणात आपल्याला अटक होईल या भीतीने पाशेको यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे.

या अर्जात पाशेको यांनी आपल्या विरोधात दाखल केलेला गुन्हा राजकीय हेतूने प्रेरित असून आपल्याला बदनाम करण्याचा हा डाव असल्याचे म्हटले आहे. यापूर्वीही राजकीय विरोधकांनी आपल्या विरोधात क्राईम ब्रँच व सीबीआयचा ससेमिरा लावला होता. मात्र  आपल्या विरुद्धचा  एकही गुन्हा आतापर्यंत सिद्ध होऊ शकलेला नाही असे त्यांनी म्हटले आहे. आपल्यावरचा व्हिडिओ सामाजिक माध्यमावर प्रसारित करुन तसेच हे वृत्त राष्ट्रीय वाहिन्यार्पयत पोहोचवून आपली बदनामी केल्याचा दावा पाशेको यांनी या अर्जात केला आहे. पाशेको यांच्या विरोधात यापूर्वी कित्येक गुन्हे नोंद करण्यात आले होते. त्यात ते पर्यटनमंत्री पदावर असताना आपल्या मैत्रिणीला रेटॉल प्राशन करण्यास भाग पाडून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याच्या आरोपाचाही समावेश होता. या प्रक़रणात पाशेको यांना तुरुंगवासही झाला होता. मात्र नंतर या प्रकरणात कुठलेही पुरावे न सापडल्याने पोलिसांनी हे प्रकरण ‘फायनल’ केले होते. पाशेको यांनी यापूर्वी एका वीज अभियंत्याच्या थोबाडीत मारल्याच्या आरोपाखाली त्यांना दोषी ठरविण्यात आले होते. या प्रकरणात त्यांना सहा महिन्याचा तुरुंगवासही भोगावा लागला होता.

Web Title: Mickey Pacheco's anticipatory bail application in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.