Mhadai water dispute will discuss Karnataka after the elections - Manohar Parrikar | म्हादई पाणीप्रश्नी निवडणुकीनंतरच कर्नाटकशी चर्चा करणार - मनोहर पर्रीकर 
म्हादई पाणीप्रश्नी निवडणुकीनंतरच कर्नाटकशी चर्चा करणार - मनोहर पर्रीकर 

पणजी : म्हादई पाणीप्रश्नी आपण कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यानंतरच कर्नाटकशी चर्चा करीन, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शुक्रवारी येथे सांगितले.
आल्तिनो येथे एका पायाभरणी सोहळ्य़ाला मुख्यमंत्री आले होते. पत्रकारांनी तिथे मनोहर पर्रीकर यांना विचारले असता मुख्यमंत्री म्हादईप्रश्नी जास्त काही बोलले नाहीत. आपण येडीयुरप्पा यांना लिहिलेले पत्र तुम्हा पत्रकारांना शुक्रवारीच दिले आहे. आपण भूमिका योग्य प्रकारे पत्रातून मांडली आहे. तथापि, कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका अगोदर होऊ द्या, मग आपण म्हादई पाणी वाटपाच्या कर्नाटकच्या मागणीबाबत चर्चा सुरू करीन, असे पर्रीकर यांनी नमूद केले. चर्चेसाठी तारीख ठरवली आहे काय असे पत्रकारांनी विचारले असता, कर्नाटकच्या निवडणुका झाल्यानंतरच आपण काय ते बोलेन, असा पुनरुच्चर पर्रीकर यांनी केला.

आम्ही भूमिका ठरवू : केरकर
म्हादई बचाव अभियानाच्या पदाधिका-यांची शुक्रवारी पणजीत पहिली अनौपचारिक बैठक झाली. निर्मला सावंत, अभियानाचे सचिव राजेंद्र केरकर आणि अविनाश भोसले यांनी मिळून ही बैठक घेतली व म्हादई पाणीप्रश्नी सरकारने आता अचानक घेतलेल्या नव्या भूमिकेविषयी चर्चा केली. केरकर यांनी लोकमतला सांगितले, की अभियानाची पुढील भूमिका आम्ही लवकरच ठरवणार आहोत. आम्ही पदाधिका-यांमध्ये अनौपचारिकपणो चर्चा सुरू केली आहे. डॉ. नंदकुमार कामत व अभियानाचे अन्य सदस्य मिळून आम्ही दुसरी बैठक लवकरच घेऊ. अभियानाने स्थितीवर लक्ष ठेवले असून लवकरच आमची भूमिका व पुढील कृती जाहीर केली जाईल.

जैसे थे स्थिती ठेवा : मगोप
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या मगोपनेही शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केली. म्हादई पाणी प्रश्नी गोवा सरकारने सध्या जी स्थिती आहे ती कायम ठेवावी. म्हणजेच पाणी तंटा लवादाचा निवाडा होईर्पयत जैसे थे स्थिती ठेवावी. एवढी वर्षे लवादासमोर हा विषय आहे. लवादाने काय तो निर्णय घेऊ द्या. लवादाचा निवाडा आल्यानंतर मग पुढील गोष्टींचा विचार करता येईल. आता जैसे थे स्थिती ठेवणो हे गोव्याच्या हिताचे आहे, असे मगोपचे अध्यक्ष दिपक ढवळीकर म्हणाले.


Web Title: Mhadai water dispute will discuss Karnataka after the elections - Manohar Parrikar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.