मनोहर पर्रीकरांचे हिकमती व्यक्तिमत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 01:38 AM2019-03-18T01:38:23+5:302019-03-18T01:40:09+5:30

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे आमचा मनोहर लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळा. जीवनात तो काही तरी वेगळे करेल व जे वेगळे करेल ते इतरांपेक्षा वेगळे असेल असे आम्हा सर्वांना खास करून आमच्या बाबांना नेहमी वाटत असे. जे बालपणी वाटत होते ते आज त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर, हिकमतीच्या जोरावर त्याने करून दाखवले.

Manohar Parrikar's Comprehensive Personality | मनोहर पर्रीकरांचे हिकमती व्यक्तिमत्त्व

मनोहर पर्रीकरांचे हिकमती व्यक्तिमत्त्व

googlenewsNext

- ज्योती कोटणीस
(मनोहर पर्रीकर यांच्या भगिनी)

‘मुलाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीप्रमाणे आमचा मनोहर लहानपणापासून इतर मुलांपेक्षा वेगळा. जीवनात तो काही तरी वेगळे करेल व जे वेगळे करेल ते इतरांपेक्षा वेगळे असेल असे आम्हा सर्वांना खास करून आमच्या बाबांना नेहमी वाटत असे. जे बालपणी वाटत होते ते आज त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर, हिकमतीच्या जोरावर त्याने करून दाखवले. मनोहरने आपले स्वप्न सत्यात उतरून दाखवले आहे. ज्याचा आम्हा सर्वांना अभिमान आहे. त्याने स्वत:ला देशसेवेसाठी वाहून घेतले आहे. त्यामुळे त्याच्यात ताकद असेपर्यंत तो आपले तन-मन देशासाठी वाहून देशसेवा करणार यात तिळमात्र शंका नाही.
प्रामाणिकपणा, तत्त्वनिष्ठा, व्यवहार हे गुण त्याने वडिलांकडून घेतले आहेत तर धडाडी, साहसी वृत्ती त्याला आईकडून मिळाली आहे.
मनोहराचा जन्म पर्रा येथे झाला. घरातील परिस्थिती सर्वसाधारण कुटुंबाप्रमाणे. घरात आम्ही पाच भावंडे. मी सगळ्यात मोठी. माझ्या मागे दुसरी बहीण लता. त्यानंतर अवधूत, मनोहर चौथा व सर्वात शेवटी सुरेश. आम्हा भावंडांत सरासरी एक-एक वर्षाचा फरक असल्याने ताई-माई किंवा इतर टोपणनावाने हाक मारायची सवय आम्हाला नव्हती. आई-बाबांनी जे नाव ठेवले होते त्याच नावाने हाक मारायचो.

कुशाग्रबुद्धी
मनोहर लहानपणापासूनच इतर मुलांपेक्षा तसेच आम्हा भावंडांत अतिशय हुशार. हळव्या मनाचा. सतत धडपडत राहणारा. बारीक-बारीक गोष्टीची माहिती जाणून ती गोळा करण्याची त्याची बालपणापासूनची जिज्ञासा. त्यामुळे कुठलाही विषय असो, तो त्याला सहजरितीने समजायचा किंवा तो समजून घ्यायचा.
माझ्या आईने सांगितल्याप्रमाणे मनोहरने जन्मानंतर ९ महिन्याचा असतानाच चालायला सुरुवात केली होती. १० महिन्याचा असताना तर वडील वापरत असलेल्या सायकलवर चढून त्यावर बसण्याचाही प्रयत्न केला होता. या प्रयत्नात सायकलसहीत खाली पडून त्याने स्वत:चा पाय फ्रॅक्चर करून घेतला होता. यावरून त्याची हुशारी व गती बालपणातच बऱ्याच वेळा आम्हाला दिसून आली, अनुभवली सुद्धा.
घरातील व्यापामुळे आई घरातील काम करून दुपारपर्यंत थकून जायची. त्यामुळे दुपारच्या वेळी तिला झोपायची सवय होती. ती झोपायला गेली की घरात भावंडे दंगा करतील, इतरांना त्याचा त्रास होईल म्हणून आई खोलीत स्वत:बरोबर अवधूत व मनोहराला बंद करून झोपी जायची. झोपताना दोघांनाही मस्ती न करण्याची सूचना द्यायची. मस्ती केली तर आपण मरून जाईन, असा घाबरून टाकणारा इशारा देत असे. हे करताना स्वत:चे तोंड व डोळे मिटून घ्यायची. दिलेल्या इशाऱ्यावर अवधूत घाबरून जायचा; पण मनोहर मात्र घाबरायचा नाही. तो आईच्या पोटाकडे बघून अवधूतला म्हणायचा बघ-बघ आईचे पोट हलत आहे म्हणजे ती जिवंत आहे. त्या वेळी मनोहर साधारण अडीच ते तीन वर्षाचा होता. असाच एक दिवस मनोहर घरामागील असलेल्या अरुंद अशा पण काहीशा खोल असलेल्या पाणी वाहून जाणाºया पाटात पडला. आम्ही व अवधूत त्या वेळी तिथेच होतो. पाटातून त्याला काही वर येता येईना व आम्हा दोघांना त्याला वर काढता येईना. आरडा-आरड केला तर आईचा मार खावा लागेल. शेवटी मनोहरने शक्कल लढवली. जवळ असलेल्या गवताच्या कुंडीचे गवत आणून पाटात टाकण्याची सूचना त्याने केली. मी व अवधूतने गवत पाटात टाकले. पाटात टाकलेल्या गवताच्या आधारे तो वर चढला.
मनोहरातील हा हटकेपणा, वेगळेपणा, हजरजबाबीपणा म्हणा किंवा अतिहुशारपणा म्हणा बालपणातच दिसून येता होता. त्याच्या मस्तीखोर स्वभावामुळे त्याच्या जाचाला कंटाळून मनोहराला अनेकदा आईकडून मार खावा लागत असे. आईचा मार चुकवण्यासाठी बºयाच वेळी तो माडावर किंवा झाडावर चढून बसायचा कारण त्याला माहीत होतं थोड्याच वेळात आईचा राग उतरेल व आपण तिच्या मारापासून वाचू.

मुक्काम पोस्ट म्हापसा
आम्हा सर्वांचं बालपण पर्रातील घरात गेलं. माझी दुसरी बहीण लता सोडल्यास आमचे सुरुवातीचे प्राथमिक चौथीपर्यंतचे शिक्षण पर्रा येथे पूर्ण झाले. त्यानंतरच्या शिक्षणानिमित्त म्हापसा येथे आजोळी शिवा कामत धाकणकर यांच्या घरी दाखल झालो. चौघे भावंडे आजोळी आल्याने घरात आईला राहावले नाही. त्यामुळे आम्हा मुलांच्या शिक्षणासाठी आईने बाबांसोबत म्हापशाला येण्याचा निर्णय घेतला.
सुरुवातीला म्हापसा-खोर्ली इथे भाड्याच्या घरात राहायला सुरुवात केली. नंतर स्वत:चे खोर्ली इथे घर घेतले. तेथेच आम्हा सर्वांना शाळेत घालण्यात आले. मनोहर हुशार असल्याने त्याची हुशारी बघून मास्तरांनी त्याला डबल प्रमोट केलं होतं. मनोहराहून एका वर्षाने ज्येष्ठ असलेला अवधूत व तो त्यामुळे एकाच वर्गात आले. डबल प्रमोटमुळे त्याने एसएससी इतरांपेक्षा एक वर्ष अगोदर १५ व्या वर्षी पूर्ण केली.
शाळेत किंवा स्कुलात असताना त्याने घरी येऊन अभ्यास केलेला कधी पाहिला नाही. तसेच मनोहर अभ्यास कर, असे म्हणण्याची पाळी कधीच आईवर आली नाही. जे शिकवले आहे तेच तो व्यवस्थित ग्रहण करुन डोक्यात साठवून ठेवायचा. त्याचे गणित तर अतिशय चांगले होते.
बालपणापासून त्याला वाचनाची भारी आवड होती. सकाळी दुकानावर गेलेले वडील दुपारी घरी आल्यानंतर त्यांच्या हातातील पेपर घेऊन तो वाचेपर्यंत त्याला चैन पडत नसे. एखाद्यावेळी रद्दीचा कागद मिळाला तरी तो हातात घेऊन वाचत बसायचा. वाचन करण्याची संधी त्याने कधीच सोडली नाही. वाचन करून स्वत:च्या ज्ञानात भर टाकायची. त्यातून माहिती गोळा करणे त्याला आवडत असे. वयाच्या सहाव्या वर्षापासून त्याला वाचनाचा छंद लागला.
बालपणापासून त्याने कपड्यावर कधी लक्ष दिले नाही. मिळेल ते पण स्वच्छ कपडे अंगावर चढवणे ही त्याची सवय. त्याची ही सवय आजही तशीच टिकून राहिली आहे. या सवयीबरोबर त्याला चहाची भारी आवड. दिवसाला किती चहा होतो याचा कधी हिशेब नसतो. वेळी-अवेळी तो आईकडून चहाची तल्लफ भागवण्यासाठी चहा मागवत असे. घरात आल्याबरोबर त्याला चहा लागत असे. स्वत:बरोबर संगतीत आलेल्या इतरही मित्रांना चहा करण्याची मागणीही तो करीत असे. केलेली मागणी आई लगेच पुरवीतही असे. नकार हा शब्द आईच्या तोंडी कधीच नव्हता. संघात असताना तर त्याच्या बरोबर घरी येणाऱ्यांना आई जेवण करून वाढायची. आईच्या हातच्या जेवणाची चव तर वेगळीच होती!
मनोहराच्या बालवयात सुरुवातीला वडिलांच्या हिशोबाचे लिखाण मी केले; नंतर बाबांनी मनोहरला हिशेबाचे काम हाताळण्याची सूचना केली. त्यामुळे कदाचित बालपणी त्याला कोणी विचारले तर तो आपण व्यावसायिक होणार असे सांगत असे. हिशेब लिहिताना वडिलांनी त्याला सल्ला दिला होता. आपल्या चुकीने आपले चार आणे दुसºयाकडे गेले तरी चालतील; पण आपण चूक करून दुसºयाचे चार आणे घेऊ नये. वडिलांनी दिलेला सल्ला आजपर्यंत त्याने ध्यानी-मनी ठेवला आहे.
मनोहरने एसएससी (त्यावेळेची ११ वी) वयाच्या १५ वर्षी पूर्ण केली. त्यानंतर इंटर पूर्ण करून आयआयटीला गेला. त्याची हुशारी बघून वडिलांना त्याने उच्च शिक्षण  घ्यावे व स्वत:चे नाव कमवावे असे मनापासून वाटत असे. मामांनी त्याला आयआयटीत पाठवण्याचा सल्ला वडिलांना दिला. आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत पास झाल्यानंतर पवई-मुंबईतील आयआयटीत त्याने प्रवेश मिळवला. पाच वर्षे त्याने तिथे राहून आपले शिक्षण पूर्ण केले.

मनोहरप्रेम
त्याच काळी म्हणजे मी २० वर्षांची असताना माझे लग्न झाल्याने मीही मुंबईला होते. मनोहर मुंबईला असल्याने तसेच त्याचे जेवण पवईत बाहेर होत असल्याने त्याला अधून-मधून माझ्या घरी जेवणासाठी येण्यास मी सांगितले होते. सुरुवातीला येताना तो २२ दिवसाच्या अंतराने यायचा. येताना स्वत:चे कपडेही धुण्यासाठी घेऊन यायचा. सुरुवातीला २२ दिवसांनी येणारा मनोहर नंतर १५ दिवसांनी व त्यानंतर दर आठवड्यात यायला लागला. मला वाटले याला बाहेर जेवून कंटाळा आला असेल परंतु, मनातून फार बरे वाटले; पण ज्यावेळी त्याच्या ८ दिवसातून एकदा येण्याचे खरे कारण समोर आले त्यावेळी मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. माझ्याबरोबर राहणारी माझी नणंद मेधा कोटणीस हिच्या प्रेमात तो पडला होता.
त्यांचे हे प्रेम प्रकरण सुरुवातीला मनोहरने मामांच्या (माझ्या मोठ्या नणंदेच्या) कानी घातले. नंतर ही गोष्ट इतर सर्वांना कळली. दोघानांही कोणाकडूनच विरोध नसल्याने २ जून १९७९ साली मनोहर २३ वर्षांचा असताना त्याचे लग्न मेधाशी जुळवून दिले. मेधाच्या बाबांनाही मेधा पे्रमात पडल्याचे ऐकून धक्का बसला होता. कारण मेधा ही स्वभावाने अत्यंत शांत व अबोल होती. लग्नापूर्वी त्यांनी काही काळ मुंबईत नोकरी सुद्धा केली; पण तेथे मन रमत नसल्याने मुंबई सोडून गोव्यात स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला.
स्कुलातील शिक्षण सुरू असताना त्याचा संघाशी संबंध आला. संघाच्या शाखेवर येणाऱ्या इतर मुलांबरोबर खेळायला मिळत असल्याने सुरुवातीला तो शाखेवर जायचा. त्याच्या अगोदर अवधूतने शाखेवर जाणे सुरू केल होते. नंतरच्या काळात त्याचा संबंध प्रमोद महाजनांशी आला. त्यांनी मनोहरातील गुण हेरले होते. मनोहरासारख्या हिऱ्याची देशाला गरज असल्याने महाजनांनी त्याला राजकारणात येण्याचा आग्रह केला.

राजकारणप्रवेश
मनोहरने राजकारणात प्रवेश करण्यास वडिलांचा सक्त विरोध होता. बाबाबरोबर मेधानेही मनोहरला राजकारणात प्रवेश करण्यास काहीअंशी विरोध केला होता. वडिलांना भ्रष्टाचार सहन होत नसे. आपल्या तत्त्वांना ते चिकटून राहायचे. राजकारण हे आपल्यासारख्या स्वच्छ प्रतिमेच्या सरळमार्गी चालणाºया लोकांसाठी नाही हे विरोध करण्याचे मूळ कारण होते. मेधाने केलेला विरोध अल्पसा असल्याने नंतर तिने स्वत:हून त्याला मदत करायला व समाजसेवेला सुरुवात केली.
मनोहरने वडिलांना दिलेला जबाब एका ज्ञानी तत्त्वनिष्ठ व्यक्तीला साजेसा असा होता. बाबा, ‘सगळे स्वच्छ प्रतिमेचे लोक राजकारणापासून दूर राहिले तर हे गढूळ झालेले राजकारण कसे सुधारणार? देशाची प्रतिमा कधी स्वच्छ होणार? त्यामुळे स्वच्छ प्रतिमेच्या लोकांनी राजकारणात प्रवेश करून त्यात सुधारणा करायला हवी. त्यातून देश सुधरायला हवा.’ मनोहराच्या राजकारणातील प्रवेशाला अप्रत्यक्षपणे आईचा पाठिंबा होता. तिने बाबांना समजावलं ‘त्याला करायचे ते करू द्या’, असा सल्ला दिला.

अपयश यशाची पायरी
मनोहरने लोकसभेची निवडणूक लढवून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. त्या वेळी त्याच्या झालेल्या पराभवाचे मनाला वाईट वाटले नाही. हरला तर हरला असा विचार आम्ही केला. राजकारणातील सुरुवातीच्या अपयशानंतर त्याने कधी मागे वळून बघितले नाही. यशाची पहिली पायरी सुरुवातीला मिळालेल्या अपयशातून त्याने चढायला सुरुवात केली होती.
ज्या वेळी तो विजयी झाला त्याच काळात सुरुवातीला १९९७ साली बाबांना व बाबांच्या १२ व्याला आईला देवाज्ञा झाली होती. त्यांच्या निधनानंतर अंदाजे अडीच वर्षाच्या कालखंडात त्याची कर्तृत्ववान पत्नी मेधा यांनाही देवाज्ञा झाली. तीन वर्षाच्या काळात आमच्या कुटुंबावर मोठा आघात करणाºया या तीन मोठ्या घटना होत्या. या घटनेतून स्वत:ला नंतर आम्ही सावरून घेतले होते.
मनोहर राज्याचा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाला, त्यावेळी आमचा आनंद गगनात मावेनासा झाला. तो शपथ घेताना डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या. आपल्या मुलाचे कौतुक बघायला आई-वडील हयात नव्हते. तसेच आपल्या पतीचे वैभव बघण्यास त्याची पत्नी मेधा सुद्धा हयात नव्हती. शपथविधी सोहळा बघताना तिघांच्या मूर्ती डोळ््यासमोर आल्या व नकळत डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. मेधा तर अगदी तरुण वयात गेल्याने तेही शल्य मनाला बोचत होतं. याच वेळी वडिलांचे उद्गार आठवले. मनोहर जे करेल ते इतरांहून वेगळे असेल व तो जे करणार त्याचा आपल्याला अभिमान वाटेल. आज त्याने काही तरी वेगळे करून दाखवले होते.
मुख्यमंत्री असताना रात्री-अपरात्री तो घरी यायचा. यायची वेळ निश्चित नसायची. येताना फायलींचा ढिगारा सोबत असायचा. फाईल बघून मनोहरला आम्ही ज्ञानेश्वरांच्या पोथी आणल्यास का असा शेरा कधी तरी थट्टेत मारायचो. रात्री एक वाजल्यानंतर तो झोपी जायचा व पहाटे पाच वाजता उठून परत कामाला लागायचा. विश्रांती हा शब्द त्याच्या शब्दकोशात नाही.त्याच्या या अति ताणाच्या काम करण्याच्या वृत्तीमुळे अनेक वेळा तब्येतीला जपून काम करण्याचा सल्ला मी त्याला दिला आहे.

मनोहराचा जन्म देशसेवेसाठी झाला आहे याचा मला अभिमान आहे. त्याला जेव्हा दिल्लीत केंद्रीय मंत्री होण्यासाठी बोलावणे आले त्यावेळी अगोदर विश्वास बसला नव्हता; पण त्यानंतर पक्की बातमी मिळाल्यानंतर मी स्वत:हून त्याला फोन करून विचारले. त्या वेळी त्याने त्याला पुष्टी दिली. मनोहर दिल्लीत जाणार याचा आनंद होताच; पण यावेळी मेधाची आठवण सतावू लागली. आज मनोहरला बघण्यासाठी मेधा असती तर.... पण या जर तरला काही अर्थ नाही. मेधाच्या आठवणीबरोबर त्याच्या दिल्लीतील जेवणाबाबत चिंता वाटू लागली. दिल्लीत मनोहरला संरक्षण मंत्रालय देण्यात आले आहे. त्याला दिलेल्या या मंत्रिपदामुळे त्याच्यासाठी मनात भरपूर आदर, मान-सन्मान आहे; पण माझ्यासाठी शेवटी तो माझा भाऊ मनोहरच आहे.
आजही तो आपली भाऊबीज कधी विसरत नाही. घरातील सोहळ््याला तो आवर्जून उपस्थित असतो; पण नेहमी माझ्या हृदयात असणाºया मनोहराशी, त्याच्या वाढलेल्या व्यापामुळे त्याच्याशी बोलणं कधी होत नाही. त्याच्या होणाºया दर्शनावर समाधान मानावं लागतं.
मनोहरला सगळे लोक आक्रमक स्वभावाचा म्हणतात; पण तो आक्रमक नाही. इतरांपेक्षा त्याची विषय समजून घेण्याची क्षमता जास्त आहे. विषय समजून घेतल्यानंतर त्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता जास्त आहे, त्यामुळे लोक त्याचा चुकीचा अर्थ लावून त्याला आक्रमक म्हणतात. आज मनोहर जो काही आहे तो त्याच्या हुशार बुद्धीमत्तेमुळे व शुद्ध आचरणामुळे व आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे. पत्नीच्या प्रेमामुळे व त्यागामुळे. माझी ईश्वर चरणी एकच प्रार्थना आहे मनोहरला देशसेवा करण्यासाठी चांगले आयुष्य, आरोग्य मिळो. 
- शब्दांकन : प्रसाद म्हांबरे

Web Title: Manohar Parrikar's Comprehensive Personality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.