'इफ्फी'च्या घराला घरपण कधी येणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 11:01 AM2023-11-25T11:01:33+5:302023-11-25T11:02:48+5:30

इफ्फीचे घर बांधून वीस वर्षे झाली आहेत, ते सजवण्यासाठी प्राधान्यक्रमाने पावले उचलली जाऊन घराला घरपण मिळेल, अशी आशा बाळगून आहोत.

international film festival of india iffi in goa and its consequences | 'इफ्फी'च्या घराला घरपण कधी येणार?

'इफ्फी'च्या घराला घरपण कधी येणार?

वामन प्रभू, ज्येष्ठ पत्रकार

घराला घरपण नसेल तर ते घर कितीही भव्य, शोभिवंत असले तरी 'घर' होत नाही. त्या वास्तुत जिव्हाळा, स्नेह, माया, प्रेम, वात्सल्य यांचा वावर असला पाहिजे, शिवाय हळुहळू का होईना घरात आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात घरप्रमुखाला यश आले पाहिजे. तसेच घरातले वातावरण घरपण येण्यास खूपच उपयुक्त ठरू शकते. आपलंच घर आहे या न्यायाने ही वास्तु उभारण्यासाठी सहाय्यभूत ठरलेल्या घटकांपैकी कोणीही यावे आणि आपलेच घर असल्याच्या थाटात हवा तसा धुमाकूळ घालून घरातल्या मंडळींवरच ते 'परके' वाटू लागण्याची वेळ आली, तर त्या घराचे घरपण टिकून राहण्याची अपेक्षा कोणी कशी करावी? गोव्यात मोठ्या कष्टाने दोनेक दशकांपूर्वी उभारलेल्या 'इफ्फी'च्या कायमस्वरूपी घराबाबतीत असेच काहीसे झाले आहे.

तब्बल ३४ वर्ष घराच्या शोधात घालवल्यानंतर भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला- 'इफ्फी'ला गोव्यात कायमचे हक्काचे घर मिळाले. तत्कालीन मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी परिश्रमाने 'इफ्फी'साठी हक्काच्या घराची उभारणी केली ती खूप अपेक्षा बाळगूनच. त्याला आज तब्बल वीस वर्षे झाली आहेत. वास्तविक या घराला एव्हाना घरपण यायला हवे होते. किंबहुना ते देण्यासाठी निदान प्रयत्न तरी व्हायला हवे होते, पण इफ्फीचा गोव्यातील विसावा अध्याय हक्काच्या घरात सुरू झाल्यानंतरही या घराला घरपण देण्यासाठी ठोस प्रयत्न होत आहेत का, या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मिळत नाही. 'घराला घरपण देणारी माणसे' ही टॅगलाइन असलेले पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांचे साम्राज्य पूर्णपणे कोसळले असले तरी त्यांची ही जाहिरात आजही स्मरणात आहे. आज गोव्यात आपले हक्काचे घर बांधून वीस वर्षे होऊनही घरपण आलेय का, असा साधा प्रश्न सिनेमाक्षेत्रातील कोणा सर्वसामान्यालाही विचारल्यास त्याचे उत्तर नकारार्थीच येईल.

इफ्फी सुरू होऊन पाच सहा दिवस उलटले आहेत, अजून तीन चार दिवस हा महोत्सव सुरू असेल. गोव्यात हक्काच्या घरात दोन दशकांपूर्वी झालेल्या प्रवेशाचा वर्धापनदिन साजरा करावा, अशा थाटात हा महोत्सव साजरा केला जात आहे, असे माझ्यासारख्याला वाटले तर नवल नाही. यंदा तर धकधक गर्ल माधुरी दीक्षित पहिल्याच दिवशी दाखल झाल्याने एकूण वातावरण अधिकच फिल्मी होण्यास मदतच झाली. माधुरी दीक्षित येतेय म्हटल्यावर अपेक्षेनुसार घराच्या वर्धापनदिन समारंभास वेगळेच वलय प्राप्त झाले. जोडीला बॉलिवुडची सारा अली खान, सनी देओल, करण जोहर अशी बरीच मंडळी हजर होती. त्यामुळे मागील काही वर्षांच्या तुलनेत यंदाचा उद्घाटन सोहळा बराच भाव खाऊन गेला. त्यानंतरही सलमान खान व अन्य काही प्रसिद्ध अभिनेते हजेरी लावून गेले. चार दिवसात इफ्फीवर वर्षभरासाठी पडदा पडेल आणि वर्षभर हे घर पुन्हा बंद राहील. या कायम घरात मागील अठरा-वीस वर्षे हेच चालत आहे.

इफ्फीला गोव्यात कायमचे घर बांधून देण्यामागे नक्कीच काही तरी उद्दीष्ट बाळगूनच निर्णय झाला असेल. मग या घराला घरपण देण्यासाठी, गोमंतकीयांना हे घर आपलेच वाटावे, वर्षभर तिथे हक्काने वावरता यावे यासाठी काय प्रयत्न झाले? असे अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत. कष्टाने बांधलेले आपले घर सजवण्यासाठी सामान्यातला सामान्य माणूसही सतत प्रयत्न करून काही गोष्टींची भर निश्चितच घालतो, मग इफ्फीच्या घरात मागील वीस वर्षांत असे काय नवीन घडले की ज्याचा आम्हाला अभिमानाने उल्लेख करता येईल. परवा उद्घाटन सोहळ्यात सिनेमा क्षेत्रातील एका मान्यवराशी चर्चा करताना गोव्यात वीस वर्षांत आपल्याला कोणताही बदल दिसला नाही, तो व्हायला हवा असे मत व्यक्त केले. मनोहर पर्रीकर बारा-तेरा वर्षांपूर्वी भव्य अशा परिषदगृहाबद्दल सातत्याने बोलायचे, पण दुर्दैवाने हे परिषदगृह नेमके कधी होईल हे कोणी सांगू शकत नाही. आलिशान परिषदगृहाची चर्चा आता मागे पडली असून फिल्म सिटीने त्याची जागा घेतलेली दिसते. गोव्यातील इफ्फी कार्ल्सच्या दर्जाचा व्हावा आणि आपला गोवा जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचावा हे स्व. मनोहर पर्रीकर यांनी इफ्फीच्या घराचा पाया घालताना बाळगलेले स्वप्न होते. पण दोन दशकात इफ्फीने निदान एक तरी पाऊल पुढे टाकले आहे, असे छातीठोकपणे म्हणता येत नाही.

गोमंतकीय सिनेमाक्षेत्रातील लोकांना इफ्फीचे येथील घर अजून आपले स्वतःचे वाटत नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यासाठी या घराला घरपण देण्याचे प्रयत्न सर्व स्तरांवर होण्याची गरज आहे. पहिले दोन दिवस प्रतिनिधी ओळखपत्रे मिळवण्यासाठी इफ्फीच्या प्रतिनिधींनी मुख्यालयात जो गोंधळ घातला, तो पाहाता असे प्रकार टाळणे का शक्य होत नाही, हा प्रश्न पडतो. उद्घाटन सोहळ्यात आमदारांसाठी राखून ठेवलेल्या खुर्थ्यांवर प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने त्याच्या आठ-दहा नातेवाईकांना हक्काने बसवले, तेव्हा उपस्थित लोकप्रतिनिधीही अवाक झाले. त्यांची व्यवस्था मंत्र्यांसाठी राखून ठेवलेल्या खुर्च्यांवर करण्यात आल्यावर आम्हाला बढती मिळाल्याचा शेरा त्यांनी हसत हसत मारला. आता बहुतेक आमदारांनी इफ्फीच्या उद्घाटन सोहळ्याकडे पाठ फिरवली हे मान्य करूनही असे प्रकार खटकतात आणि घरात सगळेच छान चाललेय या समजाला छेद देतात. 

गोव्यात इफ्फी फुलावा, बहरावा अशी तमाम गोमंतकीयांची इच्छा असली तरी गोव्यातील या घराला जोपर्यंत घरपण येत नाही तोपर्यंत ते कितपत साध्य होईल याची शंकाच आहे. कला अकादमीवर मागील तीन वर्षांप्रमाणे यंदाही इफ्फीत अलिप्त रहाण्याची वेळ आली. घरात नव्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या आघाडीवर सगळी बोंबाबोंब असताना कला अकादमीसारखी वास्तु अलिप्त राहावी आणि उपलब्ध सुविधांवरच हा प्रतिष्ठेचा महोत्सव आयोजित करण्याची वेळ यावी हे दुर्दैवच. इफ्फीचे घर बांधून वीस वर्षे झाली आहेत, आता हे घर सजवण्यासाठी निदान प्राधान्यक्रमाने पावले उचलली जाऊन घराला घरपण मिळेल, अशी आशा अनेकजण बाळगून आहेत.

 

Web Title: international film festival of india iffi in goa and its consequences

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.