इंडिया आघाडीची निदर्शने; अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2024 08:12 AM2024-03-27T08:12:18+5:302024-03-27T08:13:44+5:30

पोलिसांनी प्रवेश रोखला, वातावरण तंग

india alliance demonstrations delhi cm arvind kejriwal arrest protest in goa | इंडिया आघाडीची निदर्शने; अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध

इंडिया आघाडीची निदर्शने; अरविंद केजरीवालांच्या अटकेचा निषेध

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय नेते अरविंद केजरीवाल यांना कथित अबकारी घोटाळ्याप्रकरणी अटक केल्याच्या निषेध करण्यासाठी मंगळवारी पणजी येथील आझाद मैदानावर जमलेल्या इंडिया आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांना पोलिसांनी रोखले. त्यामुळे काही काळ वातावरण तंग बनले; नंतर सर्व नेते, कार्यकर्त्यांना आझाद मैदानात प्रवेश देण्यात आला. तेथे इंडिया आघाडीने आपले शक्तिप्रदर्शन केले.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पक्षाचे गोवा अध्यक्ष अॅड. अमित पालेकर, आमदार कॅप्टन वेन्झी व्हिएगस, आमदार कुज सिल्वा, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार एल्टन डिकॉस्टा, गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व आमदार विजय सरदेसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जुझे फिलीप डिसोझा व अन्य नेते यावेळी उपस्थित होते.

सकाळी पोलिसांनी आझाद मैदानाभोवती कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने परिसराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले. मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने पोलिस तैनात करण्यात आले होते. आमदार, राजकीय पक्षाचे नेते येताच त्यांना अडवण्यात आले. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण देत पोलिसांनी सर्वांना आझाद मैदानात प्रवेश करण्यापासून रोखले. त्यामुळे पोलिस व उपस्थित सर्व पक्षांचे नेते, कार्यकर्ते त्यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. त्यानंतर सर्वांना आझाद मैदानावर प्रवेश देण्यात आला.

यावेळी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, 'अबकारी घोटाळ्याच्या आरोपावरून केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. सरकार विरोधकांचा आवाज दाबत आहे. ही तर हुकूमशाही आहे. आम्ही आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आम्ही आलो नव्हतोतर केवळ पत्रकारांशी बोलण्यासाठी आलो होतो. मात्र, तरीही पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील डबल इंजिन सरकार सर्व स्तरावर अपयशी ठरल्याची टीका त्यांनी केली.

आमदार विजय सरदेसाई म्हणाले, की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एका मुख्यमंत्र्यास अटक करणे चुकीचे आहे. लोकशाहीची ही हत्या आहे. आम्ही इंडिया अलायन्स म्हणून केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करतो. सरकार हुकूमशाहप्रमाणे वागत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पालेकरांचे टीकास्र

मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने बेकायदेशीरपणे अटक केली हे सांगण्यासाठी आम्ही आलो होतो. आंदोलन करण्यासाठी आलो नव्हतो. मात्र, तरीही आम्हाला रोखण्याचा प्रयत्न झाला हे अत्यंत चुकीचे आहे. भाजप घाबरले असल्यानेच ते हे सर्व करीत आहे. आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, इंडिया आघाडी एकत्र आहे. इलेक्ट्रोरल बॉण्ड भाजपला सर्वाधिक मिळाले आहेत हे सत्य बाहेर येऊ नये यासाठी, भाजप विरोधी नेत्यांवर अशा प्रकारे कारवाई करीत आहे, अशी टीका आपचे गोवा अध्यक्ष अॅड. अमित पालेकर यांनी केली.


 

Web Title: india alliance demonstrations delhi cm arvind kejriwal arrest protest in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.