गोव्याच्या खाण भागात उद्या बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 02:15 PM2019-02-25T14:15:01+5:302019-02-25T14:22:11+5:30

राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे.

Goa's mine areas are closed tomorrow | गोव्याच्या खाण भागात उद्या बंद

गोव्याच्या खाण भागात उद्या बंद

ठळक मुद्देराज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे. खाणबंदीमुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवले असून खाणपट्ट्यातील छोटे हॉटेलवाले तसेच अन्य दुकानदारही संकटात आहेत. बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाण पट्ट्यात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे.

पणजी : राज्यातील बंद असलेल्या खाणी पूर्ववत सुरू करण्याच्या बाबतीत राज्य किंवा केंद्र सरकारकडून कोणतीही पावले उचलली जात नसल्याच्या निषेधार्थ मंगळवारी (26 फेब्रुवारी) रोजी थिवीपासून सांगेपर्यंत संपूर्ण खाणपट्ट्यात खाण अवलंबित कामगार, ट्रकमालक, बार्जमालक यांनी बंदची हाक दिली आहे.

मायनिंग पीपल्स फ्रंटचे अध्यक्ष पुती गावकर यांनी या बंदची सर्व तयारी झाली असल्याचे लोकमतशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की वरील खाणपट्ट्यात सर्व बाजारपेठा बंद ठेवण्यात याव्यात असे आमचे आवाहन आहे. सार्वजनिक वाहतूक, शाळा, महाविद्यालये मात्र नेहमीप्रमाणे चालू असतील. उद्याचा बंद बाजारपेठा बंद ठेवून कडकडीत पाळला जावा यासाठी धारबांदोडा,सांगे, डिचोली, साखळी, पाळी, होंडा आदी भागात बैठका घेतलेल्या आहेत. खाणबंदीमुळे लोकांवर आर्थिक संकट ओढवले असून खाणपट्ट्यातील छोटे हॉटेलवाले तसेच अन्य दुकानदारही संकटात आहेत. या सर्वांनी बंदसाठी एकी दाखवावी असे आवाहन करण्यात आले आहे. गावकर म्हणाले की आम्ही बंदसाठी कुणावरही सक्ती करणार नाही. सध्या परीक्षांचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी दक्षता घेतलेली आहे. बंदचा उपद्रव सर्वसामान्य जनतेला होऊ नये हीच आमची इच्छा आहे परंतु त्याचबरोबर खाणबंदीमुळे जी संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडली आहे तो प्रकारही तेवढाच गंभीर आहे. त्यामुळे सरकारच्या निदर्शनास त्या परिणामांची तीव्रता आणून देण्यासाठी  बाजारपेठा तरी बंद ठेवाव्यात.

दरम्यान, बंद काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खाण पट्ट्यात सर्वत्र पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताची व्यवस्था केली असून सांगेपर्यंत तसेच डिचोली सत्तरी भागातही पोलीस रात्रीपासूनच तैनात करण्यात येणार आहे. खाणी सुरू करण्यासाठी संसदेत एमएमडीआर कायद्यात दुरुस्ती करावी किंवा वटहुकूम काढला जावा अशी अवलंबितांच्या मागणी होती परंतु या दोन्ही गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत. तसेच तिसरा मार्गही सरकारने काढला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी अवलंबितांचे शिष्टमंडळ गेले असता केवळ मै देखता हू एवढेच म्हणाले यामुळे केंद्र सरकारचे काहीच केले नाही तसेच खासदार केंद्राकडे हा विषय सोडविण्यात अपयशी ठरले आहेत अशी अवलंबितांची भावना बनली आहे. खाणबंदीनंतर गोव्यात अनेक कंपन्यांनी कामगारांना सेवेतून काढून टाकले आहे त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे  तसेच खनिजवाहू ट्रक, बार्जेस  यांना कोणतेही काम राहिलेले नाही. त्यामुळे या व्यावसायिकांवर संकट ओढवले आहे.

Web Title: Goa's mine areas are closed tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.