मनोहर पर्रीकरांची सुरक्षा वाढवा, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2019 06:07 PM2019-01-05T18:07:54+5:302019-01-05T18:08:21+5:30

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल डीलच्या फाईल्स असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी करणारे पत्र शनिवारी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रपतींना लिहिले आहे.

Goa Congress write to the President of India requesting him to enhance the security of Goa CM Manohar Parrikar | मनोहर पर्रीकरांची सुरक्षा वाढवा, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र

मनोहर पर्रीकरांची सुरक्षा वाढवा, काँग्रेसचे राष्ट्रपतींना पत्र

Next

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे राफेल डीलच्या फाईल्स असल्याने त्यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी करणारे पत्र शनिवारी काँग्रेस पार्टीनं राष्ट्रपतींना लिहिले आहे. राफेल डीलच्या फाईल्स पर्रीकरांच्या बेडरूममध्येच असल्याचे गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या ऑडिओ क्लीपवरून स्पष्ट झाल्याचे काँग्रेसनं म्हटले आहे. 

राफेल डीलनिगडीत माहिती आणि सत्य बाहेर आल्यास भ्रष्टाचार देशासमोर येईल व तो भ्रष्टाचार उघड होऊ नये, म्हणून काही घटक पर्रीकर यांच्याकडील फाईल्स नष्ट करण्यासाठी किंवा त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी सक्रीय होतील. त्यामुळे पर्रीकर यांच्या जीवास धोका संभवतो. या पार्श्वभूमीवरच त्यांचे सुरक्षा कवच वाढवले जावे, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी पत्रात म्हटले आहे.

दोनापावल येथे पर्रीकर यांचा फ्लॅट असून त्या फ्लॅटमधील बेडरूममध्ये राफेल डीलनिगडीत फाईल्स आहेत, असे मंत्री विश्वजित राणे यांच्या कथित ऑडिओ क्लिपमध्ये आढळून आले आहे. राष्ट्रपतींनी याची दखल घ्यावी आणि पर्रीकरांना आणखी सुरक्षा दिली जावी, अशी विनंती चोडणकर यांनी केली आहे. पर्रीकर यांना राफेलशीनिगडीत सत्य भीती किंवा पक्षपाताशिवाय देशासमोर आणण्यासाठी पुरेशी मोकळीक मिळायला हवी.

ज्यांना सौद्यामधील भ्रष्टाचार उघड झालेला नको आहे ते महाठक समस्या निर्माण करू शकतात. म्हणून राष्ट्रपतींनी या विषयात लक्ष घालावे. कारण पर्रीकर यांनी स्वत: त्यांच्या बेडरूममध्ये महत्त्वाच्या फाईल्स असल्याचे सांगितले असे त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्र्याने ऑडिओ क्लीपमध्ये बोलताना नमूद केले आहे, असे चोडणकर यांनी म्हटले आहे. देशाची सुरक्षा व डिफेन्सबाबत कुणाच्या बेडरूममध्ये तडजोड होऊ दिली जाऊ नये, अशी अपेक्षा काँग्रेसने व्यक्त केली आहे.

Web Title: Goa Congress write to the President of India requesting him to enhance the security of Goa CM Manohar Parrikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.