ड्रग्ज, अवैध व्यवसायामुळे गोव्याची प्रतिमा मलिन

By admin | Published: June 19, 2016 03:26 AM2016-06-19T03:26:53+5:302016-06-19T03:26:53+5:30

पर्यटकांचे नंदनवन असलेले गोवा अलीकडे एका बाजूने वाढता ड्रग्ज व्यवसाय आणि शरीरविक्रय व्यवसायामुळे बदनामीच्या फेऱ्यात अडकू लागले आहे. विशेषत: गोव्याच्या किनारपट्टीतच

Drugs, illegal image of Goa due to illegal business | ड्रग्ज, अवैध व्यवसायामुळे गोव्याची प्रतिमा मलिन

ड्रग्ज, अवैध व्यवसायामुळे गोव्याची प्रतिमा मलिन

Next

- सद््गुरू पाटील,  पणजी

पर्यटकांचे नंदनवन असलेले गोवा अलीकडे एका बाजूने वाढता ड्रग्ज व्यवसाय आणि शरीरविक्रय व्यवसायामुळे बदनामीच्या फेऱ्यात अडकू लागले आहे. विशेषत: गोव्याच्या किनारपट्टीतच ड्रग्ज व इतर अवैध व्यवसाय वाढू लागल्यामुळे गोव्याच्या पर्यटनावरही त्याचा परिणाम होत आहे.
वार्षिक सरासरी ६० लाख पर्यटकांनी गोव्याला भेट देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. गोव्यातील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, जुनेगोवे येथे होणारे जगप्रसिद्ध सेंट झेवियर फेस्ट, येथील रूपेरी वाळूचे सागरकिनारे, लॅटीन संस्कृतीचा प्रभाव असलेली येथील पोर्र्तुगीजकालीन वास्तुकलेत आदर्श ठरणारी घरे, येथील पांढरीशुभ्र चर्च आणि सुबक, देखणी मंदिरे पर्यटकांना भुरळ पाडतात. दाबोळी विमानतळावर ‘व्हिसा आॅन अरायव्हल’ची व्यवस्था झाल्यामुळे विदेशी पर्यटकांची संख्या गोव्यात वाढू लागली आहे.
दुसरीकडे पंजाबनंतर गोवा अमली पदार्थांसाठी ओळखले जाऊ लागल्याने, पर्यटन व्यवसायातील विविध घटकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या महिन्यात आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल गोवा दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनीही गोव्याचे पर्यटन म्हणजे ड्रग्ज व शरीरविक्रय असे चित्र उभे राहणे चिंताजनक असल्याचे नमूद केले होते. सत्ताधारी भाजपामधील मंत्री, आमदारही गोव्यातील वाढता ड्रग्ज आणि वेश्या व्यवसाय याबाबत जाहीर कबुली देऊन सरकारवर टीकाही करू लागले आहेत. अमली पदार्थ गोव्यात सहज मिळतात, असे जलसंसाधनमंत्री दयानंद मांद्रेकर म्हणाले होते. अभाविपनेही ड्रग्जबाबत गोव्यात खूप चिंताजनक स्थिती असल्याचे म्हटले आहे.
गोव्यात नेपाळ, हिमाचल प्रदेश अशा भागांतून अमली पदार्थांचा शिरकाव होतो, असा पोलिसांना संशय आहे. हजारो कोटींची अर्र्थव्यवस्था या व्यवसायाने गोव्याच्या किनारपट्टीत उभी केली आहे. गोव्यातील फोंडा अभियांत्रिकी कॉलेजमधील विद्यार्थ्यांकडेही महिन्यापूर्वी पोलिसांना अमली पदार्थ सापडले आहेत. गोव्यातील तारांकित हॉटेलमध्ये कॉल गर्ल्स सर्रास आढळत असल्याने पोलिसांसमोर आव्हान उभे ठाकले आहे.

पोलिसांनी काही बॉलीवूड कलाकार व हायप्रोफाइल व्यक्तींचा समावेश असलेले सेक्स रॅकेट १५ दिवसांपूर्वी पकडले. पोलीस वार्षिक सरासरी ५० छापे टाकून लाखो रुपयांचे अमली पदार्थ जप्त करतात. किमान दहा-बारा व्यक्तींना अटक होते, पण ड्रग्ज व्यवसायाला आळा घालता आलेला नाही.

गोव्यात अलीकडे सेक्स रॅकेट व वेश्या व्यवसाय वाढू लागला आहे. आपल्याकडे याविषयी माहिती असून, पोलिसांना हवी असल्यास आपण ती देऊ शकतो. गोव्याच्या पर्यटनासाठी हे चिंताजनक आहे.
- आ. विष्णू वाघ, साहित्यिक

ड्रग्ज व वेश्या व्यवसायाचे प्रमाण पूर्वीच्या तुलनेत आता कमी झाले आहे. गोव्याचे नाव पर्यटनाबाबत बदनाम होऊ नये, म्हणून सरकार काळजी घेत आहे. पर्यटन वाढले की, काही अपप्रवृत्ती वाढतात, पण गोवा राज्य अजूनही संस्कृती, आदरातिथ्य, सुंदर मंदिरे, चर्च, किनारे, वैशिष्ट्यपूर्ण खाद्यसंस्कृती यासाठीच ओळखले जाते.
- दिलीप परुळेकर, पर्यटनमंत्री

Web Title: Drugs, illegal image of Goa due to illegal business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.