मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण- राष्ट्रवादी 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 06:34 PM2018-10-09T18:34:56+5:302018-10-09T18:37:54+5:30

आझाद मैदानात उपोषणाला बसण्याचा राष्ट्रवादीचा इशारा

cm manohar parrikar should resign or else we will do indefinite hunger strike says ncp | मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण- राष्ट्रवादी 

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अन्यथा आमरण उपोषण- राष्ट्रवादी 

Next

म्हापसा : मागील ९ महिन्यांपासून आजारी असलेल्या मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारपणाचे परिणाम राज्याच्या कारभारावर झाले आहेत. प्रशासन ठप्प झाले आहे. राज्यावर असलेल्या कर्जाची रक्कम वाढत आहे. अशावेळी जनतेचे हित विचारात घेवून मुख्यमंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा अन्यथा पणजीतील आझाद मैदानावर आमरण उपोषणावर बसण्याचा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेश महासचिव संजय बर्डे यांनी दिला आहे. 

सध्या दिल्लीत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यामुळे विविध प्रस्तावांवर निर्णयावर मुख्यमंत्र्यांची मंजुरी मिळवण्यासाठी अधिकारी आणि मंत्र्यांना दिल्लीत जावे लागते. त्यांच्या आजारपणामुळे लोकांकडून विविध कराच्या रुपात जमा झालेल्या पैशांची नाहक उधळपट्टी सुरु आहे. ही उधळपट्टी त्वरित थांबवणे गरजेचे आहे. त्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी गोव्यात येवून उपचार सुरु करावे असाही सल्ला बर्डे यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी १५ दिवसात राजीनामा सादर न केल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला. यासंबंधी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही सादर करणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. 

बर्डे यांच्या आमरण उपोषणाला पक्षाच्या मान्यतेसंबंधी तसेच विधानसभेतील त्यांच्या एकमेव आमदाराच्या सहकार्यासंबंधी विचारले असता पक्षश्रेष्ठींच्या सुचनेवरुन आपण हे विधान करीत असल्याचे ते म्हणाले. आपल्या भूमिकेविषयी पक्षाच्या आमदाराच्या सहकार्याची, प्रदेश राष्ट्रवादीच्या भूमिकेची कसल्याच प्रकारची माहिती आपल्याला नसल्याचेही त्यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केले. 
सरकारने बहुमत सिद्ध करण्यासाठी अधिवेशन बोलवण्यासंबंधी काँग्रेस पक्षाने केलेल्या मागणीचे त्यांनी समर्थन केले. विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी काँग्रेसजवळ योग्य असे संख्याबळ असल्याने अधिवेशन बोलावल्यास आमदारांचे पुरेसे संख्याबळ नसल्याने सरकारचा पराभव होईल, या भीतीपोटी अधिवेशन बोलावले जात नसल्याचे त्यातून सिद्ध होत असल्याचे बर्डे म्हणाले. 

राज्यात काँग्रेस सत्तेवर असताना घेतलेल्या कर्जाचा आकडा ४ ते ५ हजार कोटी रुपयांपर्यंत होता. पण भाजपा सरकारच्या काळात कर्जाची रक्कम १८ हजार कोटी रुपयांवर गेल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. राज्यात विकासासाठी केंद्राकडून ३० हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. तसेच जनतेवर लागू केलेल्या विविध कराच्या रुपातील महसूल सरकारी तिजोरीत जमा होत असतो. त्यामुळे कर्जाची रक्कम वाढण्यामागील कारणावर त्यानी साशंकता व्यक्त केली. 

फॉर्मेलिनच्या प्रश्नावर त्यांनी मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर सुद्धा टिका केली आहे. मासळीची तपासणी करण्याचे काम विदेशी यंत्रणेला देणे चुकीचे असून यावरुन मंत्र्याला आपल्याला अन्न व औषधी प्रशासनावर विश्वास नसल्याचा आरोप त्यांनी केला. गोव्यात येणारे पर्यटक मासळी खाण्यासाठी येत असल्याने पर्यटन व्यवसायावर सुद्धा परिणाम होणार असल्याचा दावा त्यांनी केला. 
 

Web Title: cm manohar parrikar should resign or else we will do indefinite hunger strike says ncp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.