पणजी : गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी पणजी मतदारसंघात गिरीश चोडणकर व वाळपई मतदारसंघात रॉय नाईक यांचे नाव उमेदवार म्हणून मंगळवारी निश्चित केले. ही दोनच नावे मंजुरीसाठी प्रदेशाध्यक्ष शांताराम नाईक यांनी मंगळवारी अखिल भारतीय काँग्रेस समितीकडे पाठवली. भाजपचे उमेदवार असलेले मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर विरुद्ध काँग्रेसचे चोडणकर असा सामना पणजीत होणार आहे.
प्रथम बाबूश मोन्सेरात यांनी काँग्रेसला धक्का दिला व मग अ‍ॅड. सुरेंद्र देसाई, अशोक नाईक या दोघांनी काँग्रेसच्या तिकीटाची आॅफर पणजीत नाकारल्यानंतर काँग्रेस पक्षासमोर उमेदवार निवडीबाबत मोठासा पर्यायच शिल्लक राहिला नव्हता. गिरीश चोडणकर यांना पणजीच्या पोटनिवडणुकीच्या रिंगणात उतरवावे असे काँग्रेसने ठरवले. काँग्रेसचे गोवा प्रभारी चेल्लाकुमार यांनी चोडणकर यांचे नाव अगोदरच विचारात घेतले होते. अखिल भारतीय काँग्रेसकडून बुधवारी सकाळी चोडणकर यांचे नाव मंजूर केले जाईल. उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाºयांकडे सादर करण्यासाठी दि. ५ आॅगस्टपर्यंत मुदत आहे. वाळपई मतदारसंघातून रॉय नाईक यांच्या नावावर गोवा प्रदेश काँग्रेसने शिक्कामोर्तब केले आहे.
चोडणकर यांनी पणजीतून व रॉय यांनी वाळपईमधून यापूर्वी कधीच विधानसभेची निवडणूक लढवलेली नाही. चोडणकर यांचा सामना मुख्यमंत्र्यांविरुद्ध आहे, तर रॉय यांना वाळपईत मंत्री विश्वजित राणे यांच्याशी टक्कर द्यावी लागेल. पणजीत काँग्रेसच्या उमेदवार निवडीबाबत खूप घोळ झाला. वाळपईत काँग्रेसचे तिकीट अगोदरच ठरले. पणजीत एकेकाळी काँग्रेसच्या तिकीटासाठी अनेक दावेदार असायचे; पण यावेळी तिकीट स्वीकारण्यासही कोणी पुढे येईनासे झाले. २०१७च्या विधानसभा निवडणुकीवेळी पणजीत काँग्रेसने उमेदवार उभा केला नव्हता. त्या पक्षाने मोन्सेरात यांना पाठींबा दिला होता व मोन्सेरात हे युजी पार्टीच्या तिकिटावर लढले होते.