Chief Minister Manohar Parrikar returned to Goa from America after three months | मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तीन महिन्यानंतर अमेरिकेहून गोव्यात परतले
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तीन महिन्यानंतर अमेरिकेहून गोव्यात परतले

पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सुमारे तीन महिने अमेरिकेतील इस्पितळात उपचार घेऊन गुरूवारी परतले. मनोहर पर्रीकर यांच्यावरील उपचार यशस्वी झाले असून त्यांची प्रकृती सुधारली आहे, असे त्यांच्या समर्थकांनी सांगितले. मनोहर पर्रीकर परतल्याने गोवा भाजपमाध्ये व मंत्रिमंडळातही उत्साह आहे.

मुख्यमंत्री फेब्रुवारी महिन्यात प्रथम मुंबईतील इस्पितळात दाखल झाले होते. त्यांना स्वादूपिंडाशीसंबंधित त्रस झाल्याने मुंबईत दाखल करण्यात आले होते. नंतर गोव्यात ते सरकारच्या बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयीन इस्पितळात दाखल झाले होते. मुंबईत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्पितळात जाऊन मनोहर पर्रीकर यांची भेट घेतली होती व विचारपूस केली होती. अमेरिकेत उपचारांसाठी जावे असा सल्ला प्रथम नरेंद्र मोदी यांनीच मनोहर पर्रीकर यांना दिला होता. मनोहर पर्रीकर यांनी गेल्या 7 मार्च रोजी गोव्याहून अमेरिकेला प्रयाण केले होते. त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा ताबा कुणाकडेच सोपवला नव्हता. त्यांच्या अनुपस्थितीत गोवा राज्याचा सरकारी कारभार पुढे नेण्यासाठी त्यांनी तीन मंत्र्यांची समिती नेमली होती. त्या तीनपैकी एक मंत्री फ्रान्सिस डिसोझा हे अलिकडेच पोर्तुगालच्या दौ-यावर गेले आहेत.  मनोहर पर्रीकर यांच्यावर तीन महिने अमेरिकेत उपचार झाले. अमेरिकेत असताना त्यांनी फोनवरून गेल्या महिन्यातच काही मंत्री, आमदारांशी संपर्क साधून आपण आता ठिक होत असल्याचे सांगणो सुरू केले होते. मनोहर पर्रीकर यांचा आवाज सुधारल्याचे गेल्या महिन्यात स्पष्ट झाले होते. गोवा घटक राज्य दिनी मुख्यमंत्र्यांनी गोव्याला शुभेच्छा देणारा व्हिडिओ अमेरिकेतून पाठवला होता. तत्पूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या गोवा भेटीवेळी पार पडलेल्या भाजपा संमेलनावेळीही मनोहर पर्रीकर यांनी अमेरिकेतून व्हिडिओद्वारे संदेश पाठवला होता.

दरम्यान, मनोहर पर्रीकर हे अमेरिकेहून भारतात येण्यास बुधवारी विमानाने सुटले व गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास ते मुंबईत दाखल झाले. आरोग्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव गोवा भाजपाने मनोहर पर्रीकर यांच्या स्वागतासाठी गोव्यात गुरुवारी कोणताच कार्यक्रम आयोजित केला नाही. मनोहर पर्रीकर मुंबईत कधी पोहचतील याबाबत गुप्तता ठेवली गेली होती. मनोहर पर्रीकर मुंबईत दाखल झाल्यानंतर मग एका तासाने त्यांनी गोव्याकडे येणारे विमान धरले. मनोहर पर्रीकर हे शुक्रवारी 15 रोजी मंत्रिमंडळातील आपल्या सर्व सहका-यांना भेटणार आहेत. 


Web Title: Chief Minister Manohar Parrikar returned to Goa from America after three months
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.