गोव्यातील 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांचे इतर धंदे, चौकशी करणार - रोहन खंवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 04:43 PM2019-06-14T16:43:16+5:302019-06-14T16:43:31+5:30

गोवा सरकारचे नवे रोजगार धोरण तयार होत आहे. त्या धोरणासाठी उद्योजक, कामगार, उद्योगांमधील एचआर विभागाचे अधिकारी यांची मते जाणून घेण्याच्या हेतूने मजुर खात्याने संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

30% government employees due to other businesses in Goa, investigators - Rohan Khanwate | गोव्यातील 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांचे इतर धंदे, चौकशी करणार - रोहन खंवटे

गोव्यातील 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांचे इतर धंदे, चौकशी करणार - रोहन खंवटे

googlenewsNext

पणजी : राज्यात एकाबाजूने सरकारी नोकरीसाठी हजारो शिक्षित युवक रांगेत उभे आहेत आणि दुस-या बाजूने गोव्याच्या प्रशासनातील किमान 30 टक्के कर्मचारी तरी सरकारी सेवेत राहूनही विविध प्रकारचे अन्य धंदे करत असतील, असे मजूर खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी येथे सांगितले व एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले. अशा कर्मचा-यांची चौकशी करून घेतली जाईल व त्यासाठी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लवकरच पत्र लिहिन असेही खंवटे यांनी जाहीर केले.

गोवा सरकारचे नवे रोजगार धोरण तयार होत आहे. त्या धोरणासाठी उद्योजक, कामगार, उद्योगांमधील एचआर विभागाचे अधिकारी यांची मते जाणून घेण्याच्या हेतूने मजुर खात्याने संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणो या नात्याने मंत्री खंवटे बोलत होते. जे कुणी विविध व्यवसाय-धंदे करतात, त्यांनी ते करावेच. त्यांच्या स्वयंरोजगार कौशल्याची मी प्रशंसा करतो पण सरकारी सेवेतील जागा अडवून हे करता येणार नाही. अनेकदा कर्मचारी व अधिकारी सरकारी सेवेला व स्वत:च्या पदाला न्यायच देत नाहीत. ते महत्त्वाचा वेळ खासगी धंद्यांसाठीच देतात. अशा कर्मचा-यांनी सरकारी नोकरी सोडावी व त्यांचे साईड बिझनेस सांभाळावेत, असे मंत्री खंवटे म्हणाले.

मोठ्या संख्येने असे कर्मचारी असतील. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे पर्सनल खाते असल्याने आपण त्यांना चौकशी करण्याची विनंती करणारे पत्र लिहीन. वार्षिक हजारो पदवीधर व अन्य कौशल्ये असलेले मनुष्यबळ तयार होत असते. प्रशासनात नव्या रक्ताला वाव मिळू द्या, असे खंवटे म्हणाले.

परप्रांतीयांचा डेटा द्या 
राज्यातील उद्योगांमध्ये सध्या गोमंतकीय किती काम करतात व परप्रांतीय किती आहेत याविषयीचा डेटा उद्योगांनी सादर करावा. काही उद्योजक याविषयी सहकार्य करत नाहीत. आम्ही डेटा कुणाची सतावणूक करण्यासाठी मागत नाही. गोमंतकीयांमधील बेरोजगारीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी हा डेटा हवा आहे. कोणत्या उद्योगाला कशा प्रकारचे मनुष्यबळ हवे, कौणते कौशल्य युवकांमध्ये विकसित व्हायला हवे हे आम्हाला डेटामुळेच कळेल. उद्योगांनी यापुढे डेटा दिला नाही तर खास पथके नियुक्त करून डेटा मिळविण्यासाठी ही पथके उद्योगांमध्ये पाठविता येतील. गोव्यातील उद्योग अनेकदा परप्रांतांमधील मनुष्यबळ आणतात. गोव्यात मनुष्यबळ तयार आहे. गोव्यातील माणसाला जर बाहेरील राज्यात नोकरी मिळते तर, ती गोव्यात का मिळत नाही असा प्रश्न निर्माण होतो, असे खंवटे म्हणाले. 

Web Title: 30% government employees due to other businesses in Goa, investigators - Rohan Khanwate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.