पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून तरुणाची हत्या; मृतदेहाजवळ पत्र

By संजय तिपाले | Published: March 29, 2024 12:33 PM2024-03-29T12:33:13+5:302024-03-29T12:33:49+5:30

अशोक तलांडी असे मृताचे नाव आहे

Youth killed by Maoists on suspicion of being a police informer; Letter near the dead body | पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून तरुणाची हत्या; मृतदेहाजवळ पत्र

पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून माओवाद्यांकडून तरुणाची हत्या; मृतदेहाजवळ पत्र

संजय तिपाले, गडचिरोली: पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून माओवाद्यांनी एका आदिवासी तरुणाची गळा आवळून हत्या केली. अशोक तलांडी ( ३०, रा.दामरंचा ता. अहेरी) असे मृताचे नाव आहे. २९ मार्च रोजी सकाळी भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ ही घटना घडली. यामुळे जिल्हा हादरुन गेला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पुन्हा एकदा माओवादी सक्रिय झाल्याचे चित्र आहे. काही दिवसांपूर्वी रेपनपल्ली हद्दीत झालेल्या चकमकीत पोलिसांनी चार नक्षल्यांना कंठस्नान घातले होते. गुरूवारी देखील छत्तीसगड सीमेवर मध्यरात्री सहा तास चकमक चालली. दरम्यान, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास अहेरी तालुक्यातील अतिदुर्गम दामरंचा गावातील रहिवासी असलेल्या अशोक तलांडी या आदिवासी तरुणाच भामरागड-आलापल्ली मार्गावरील ताडगावजवळ मृतदेह आढळून आला. पोलिस अधीक्षक नीलोत्पल म्हणाले, मृत तरुण पोलिसांचा खबऱ्या नाही. प्रकरणाची चौकशी सुरु आहे. तपासात सर्व बाबी समोर येतील.

पत्रक आढळले

मृतदेहाजवळ माओवाद्यांचे पत्रक आढळले. त्यात अशोक हा पोलिस खबऱ्या असल्यामुळे त्याची हत्या करीत असल्याचे म्हटले आहे. माहिती मिळताच ताडगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आहे. या हत्येमुळे परिसरात दहशतीचे वातावरण आहे.

 

 

Web Title: Youth killed by Maoists on suspicion of being a police informer; Letter near the dead body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.